अकल्पित...!१

To sangat hota Ani Aditi la agdi bharun ale hote. Kiti jivavarcha prasang aala hota aaj tichyavar!!! Pan aaj agdi devach ya mulachya rupat tichya madatila aala hota.

राज्यस्तरीय साहित्य करंडक

फेरी ३- राज्यस्तरीय कथा मालिका
विषय - रहस्य कथा
शीर्षक - अकल्पित..!





" बापरे! कुठे आहे मी??" भानावर येताच आदितीच्या मनात विचार आला.       

"मी इथे कशी? काय झालं नेमकं???"

तिला एकदम कशाचीच लिंक लागेना...



कपाळाला नकळत हात लावला तीने, "अरे हे काय? हात लाल झालाय, म्हणजे रक्त वाहते आहे कुठून तरी आणि डोकं सुद्धा जड वाटतेय! नेमकं काय झालंय मला???" मनातच विचार करू लागली ती...!





विचार करत डोक्यावर ताण दिला अन् डोकं अजूनच जड वाटायला लागलं तिला.म्हणजे एकंदरीत आपण कुठेतरी पडलोय आणि आपल्याला चांगलंच लागलंय याची तिला जाणीव झाली.



"पण मी अशी पडली कशी? आणि ते ही इथे या अनोळखी अन् निर्जन ठिकाणी..???"



थोडा अजून ताण द्यायलाच हवा डोक्याला...!!

त्रास होतोय पण खूप.....,डोकं खूप भारी वाटतेय...

 विचार कर करून अन् तसंच डोकं हातात  धरून ती थांबली. काही वेळ तसेच डोळे घट्ट मिटून पडून राहिली.



" डोकं अगदी घणाचे घाव घातल्यागत ठणकत आहे....!

पण मी इथे कशी??? याचा छडा लावायला च हवा. मला त्रास झाला किंवा  डोकं अजून दुखायला लागलं तरी चालेल पण नेमकं हे असं कसं झालं ते मला आठवून बघायलाच हवं?"



"आपण  कुठे आहोत ? पुढे समोर आजुन काय ??" काहीच तिला कळत नव्हतं.





डोकं खूप भारी वाटत असतानाही तीनी डोक्याला ताण दिलाच..! थोडं थोडं चित्र आता तिला स्पष्ट होऊ लागलं...



अरे! काल तर आपण ट्रेकिंग ला गेलो होतो ना,आपली संपूर्ण टीम! किती आनंदात होती ना मी,खूप दिवसांनी ट्रेकिंग ला जायचं म्हणून...! जय पण असणार होता सोबतीला ,म्हणून अगदीच आश्र्वस्त वाटत होतं.

सगळ्यांसोबत खूप दिवसांनी जायला भेटणार म्हणून आनंदाला उधाण आलेलं खरं तर..!





थोडं आठवून ती पुन्हा शिणली. पुन्हा तसेच डोळे मिटून पडून राहिली.  पण मन काही मानेना..! पुन्हा डोक्याला ताण देत आठवणं सुरू झालं..!





काल मात्र जयसोबत नव्याने ट्रेकिंग ग्रुप मध्ये जॉईन झालेली ती मुलगी अन् त्यांचा दोन चार जणांचा ग्रुप पण होता. काय नाव तिचं??.... हां चैताली!

कां कोण जाणे पण आवडला नाही तीला ही चैताली अन् त्यांचा ग्रुप.  त्यांचे वागणे, त्यांचा ॲटिट्युड , त्यांची शेरेबाजी नकोशी वाटायची तिला.  दहा बारा दिवस झाले होते त्यांना ग्रुप मध्ये येऊन पण कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल आपुलकी नव्हती निर्माण झाली. 





तिने जय जवळ त्यांच्याबद्दल नापसंती दर्शवली होती पण "त्यांना असलेल्या ट्रेकिंग च्या अनुभवाचा आपल्या ग्रुप ला फायदाच होईल." म्हणत त्यानी तिचं म्हणणं खोडून काढलं होतं.



तरीही कां कोण जाणे तिला अजिबातच आवडली नव्हती ती....!एवढी लोकं पाहिली होती आजवर पण तिचं वागणं मात्र वारंवार खटकत होतं.

जाऊ दे ना! त्याचा कशाला विचार करत बसलीय मी!" असं म्हणत पुन्हा डोळे मिटून पडून राहत तिनी डोक्याला विश्रांती दिली.



" अरे! पण मी इथे कशी??" आदिती ने पुन्हा डोक्याला ताण दिला...



" आठवलं ..! त्या अवघड कड्यावर सर्वात आधी जय,मी आणि चैताली च पोहोचलो होतो की. समोर जय  मागे मी  आणि नंतर चैताली. बस आता फक्त थोडीच चढण बाकी होती..!



जय समोर होऊन वर चढला. मी पण कपारिंचा, झाडांचा आणि दोराचा आधार घेत वर आली होती. चैताली थोडी खालीच मधात राहिली होती. तिला जमत नव्हतं म्हणून तिनी मला मदत मागितली होती. मी खाली वाकून एका झाडाच्या फांदीचा आधार घेत तिला हात देऊन वर ओढलं. ती पण वर आली माझ्या आधाराने....

आणि हे काय..? चैतालीने अक्षरशः वर आल्यावर मला ढकलून दिलं होतं की खाली..! कां पण..?????





मी अगदीच अधांतरी ..,कुठेतरी जात होते ....!"



समोरचं अदितीला काहीच आठवत नव्हतं.ती कुठे आहे...? आता पुढे काय...? काहीच कळत नव्हतं अन् काही संदर्भ सुद्धा लागत नव्हते. चैताली ने तिला ढकलावे का?? काहीच कळत नव्हतं..!





नकळतच तिने पाय हात हलवून पाहिले. त्रास होत होता पण अवयव सध्या तरी जागेवर दिसत होते.डोकं मात्र अतिशय भारी वाटत होतं. संपूर्ण अंग सुद्धा अगदीच ठणकत होते.





तेवढ्यात कुणाची तरी चाहूल लागली. तशाही अवस्थेत ती सावध झाली. कोण असावं आता??





स्वतः ला शक्य तितके गवताच्या आड लपवून घेत ती त्यांचा वेध घेऊ लागली.एक मध्यम वयाचा गावातला मुलगा अन् सोबत गाड्यांवर गावातील पाच सहा माणसं..!कोण असतील हे??? आधीच  धसका घेतलेले तिचे मन अजूनच साशंक झाले.



"अरे, ही तर इकडेच येत आहेत,बरे लोकं असतील ना???" पुन्हा तिच्या मनात विचार डोकावला.





शोधत तो मुलगा तिच्याच दिशेने आला...

" ह्या बघा इथेच पडल्या आहेत ह्या ताई.."  त्या मुलाच्या शब्दांमध्ये जाणवणाऱ्या आपुलकी अन् काळजी ने मात्र तिला  आता धीर आला होता.



तो मुलगा समोर होऊन सगळ्यांना सांगत होता अन् बरोबर असणारे लोकं तिकडेच पोहचत होते. त्यांच्या बोलण्यावरून पाठोपाठ एक ॲंबुलन्स सुद्धा पाठवलेल्या लोकेशन वर येणार होती.



सगळे तिच्याजवळ आले होते.तिला शुद्धीवर आलेली बघून  त्या मुलाला आनंद झाला होता.त्याने तिला उठवून बसवलं. सोबत आणलेलं पाणी आणि चहा तिला दिला.



चहा पोटात जाताच तिला तरतरी वाटू लागली.



तो मुलगा पुढे बोलू लागला..

" किती वरून पडल्या ताई तुम्ही!! तुमचं नशीब चांगलं म्हणून इथे असलेल्या या मोठमोठ्या गवताच्या गंज्यांवर तुम्ही पडल्या.नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं.पण पडतांना मधे मधे आपटला असाल हो तुम्ही, डोक्याला खोक पडून खूप रक्त वाहत होतं. बघा माझा मोठा रुमाल पूर्ण माखून गेला रक्तानी आणि  बेशुद्ध सुद्धा झालात की..! मग मी तसाच गावात गेलो अन् सगळ्यांना घेऊन आलो."



तो सांगत होता आणि अदितीला अगदी भरून आलं होतं. किती जीवावरचा प्रसंग आला होता आज तिच्यावर!!!

पण आज अगदी देवच या मुलाच्या रुपात तिच्या गमदतीला आला होता.रक्त वाहणे दाबून धरल्याने कमी झाले होते पण पूर्णतः बंद झाले नव्हते. पुन्हा तिची शुद्ध हरपू पाहात होती.पण आता तिला त्याची तमा नव्हती.

कारण त्या मुलाच्या आणि गावकऱ्यांच्या रूपाने एक आशेचा किरण या क्षणी तिच्या मदतीला होता.



सगळं देवावर सोडून ती पुन्हा निर्धास्त झाली होती. जड झालेल्या डोक्यामुळे तिचे डोळे आपोआप बंद होऊ लागले होते.





टीम - भंडारा



©® मुक्ता विनय आगाशे

      मुक्तमैफल



पुढे काय झाले अदितीचे?? हे जाणून घेऊ या कथेच्या पुढच्या भागात....!









    


🎭 Series Post

View all