Login

अकल्पित..!१०

"sar he saral saral black mailing aahe,mazya aajaracha gairfayada ghet aahat sar tumhi...!"tashahi avsthet Chaitali ne pratyuttar dile

राज्य स्तरीय करंडक कथा मालिका
अकल्पित...!१०
विषय - रहस्य कथा

इन्स्पेक्टर विजय च्या सूचनेनुसार चैताली ला संपूर्ण ग्रुप पासून वेगळे ठेवण्यात आले. स्पेशल महिला पोलिस तिच्या  कस्टडी च्या बाहेर तैनात होत्या. 

पुणे पोलिसांना जेव्हा या चौघांना अटक केल्याची सूचना दिली गेली तेव्हा त्यांच्या रेकॉर्ड वर हे चौघेही वॉन्टेड म्हणून आधीच होते. अनेक छोटे मोठे गुन्हे आधीपासूनच त्यांच्या नावावर असल्याची नोंद आधीच पोलिसांपाशी होती.म्हणजे एकप्रकारे सराईत गुन्हेगारांना च त्यांना आता एकप्रकारे सांभाळायचे होते. चैताली चा आवाका लक्षात घेता तिला एक दोन महिला पोलिसांच्या भरोशावर सोडून चालणार नव्हते तिच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते.


एक दोन दिवसातच एक गोष्ट लक्षात आली होती की एक विशिष्ट वेळ झाली की चैताली फार अस्वस्थ व्हायची अन् तिथल्या दिमतीला असलेल्या महिला पोलिसांना आर्जव करून तिच्या बॅग मध्ये असलेले औषधं खूप आर्जवं करून मागायची. ही गोष्ट जेव्हा विजय ला समजली तेव्हा त्याचे विचारचक्र अतिशय वेगाने फिरू लागले. चैताली च्या ही नकळत त्याने  ते संपल्स तपासायला पाठवले आणि त्याचा संशय अगदीच खरा निघाला. 


हो, चैताली ड्रग ॲडिक्ट होती. औषधांच्या नावावर ती जे काही मागायची ते दुसरे तिसरे काही नसून ड्रग्ज च होते.
चैताली चा हाच विक पॉइंट नेमका हेरायचा आणि याचाच फायदा घेत तिच्याकडून माहिती काढून घ्यायची .विजय च्या डोक्यात पटकनच मास्टर प्लॅन तयार झाला चैताली ला बोलते करण्याचा....!

एक लेडीज पोलिस कॉन्स्टेबल चैताली शी फारच छान वागायची.तिच्या सगळ्या मागण्या पुरवण्याचा तिचा प्रयत्न असायचा .हळूहळू तिची आणि चैतलीची जवळीक वाढू लागली.चैताली ला ती खूपच विश्वासाची वाटू लागली. हळूहळू कामा व्यतिरिक्त इतरही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. काही सुखदुःख अन् वैयक्तिक गोष्टीही शेअर होऊ लागल्या.


"काय ग चैताली,हा अशा मार्गाला तुला कां जावेसे वाटले ग,आणि चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट कां बरं नाही घेत तू? गोळीची वेळ झाली की किती अस्वस्थ होते तू???काहीतरी कर बाई याचं. " लेडी कॉन्स्टेबल


"हातून सुटणं इतकं सहज सोपं नाही ग,कितीही डॉक्टर्स बदलले तरी यातून सुटेल असे वाटत नाही. एकदा का याच्या विळख्यात तुम्ही सापडले की संपले सारे...! असा हा आजार आहे. " चैताली.


" असा कोणता विचित्र आजार ग चैताली हा की जो डॉक्टर्स पण बरा करू शकत नाहीत."समजत असूनही ती कॉन्स्टेबल न समजल्याचा बहाणा करत बोलली.


"कसं ग सांगू तुला आता..! तू खूप खास आहेस म्हणून सांगते ,हा आजार नाही हे ॲडिक्शन आहे ड्रग्ज चे." चैताली


"अगं काय सांगतेस काय तू,मला तर खरंच वाटत नाही हे." कॉन्स्टेबल


" पण हे वास्तव आहे.जळजळीत वास्तव..!" चैताली

जय ने रचलेल्या सापळ्यात चैताली पूर्णपणे फसली होती.

दुसऱ्या दिवशी पासूनच त्या लेडी कॉन्स्टेबल च्या जागी दुसरी कॉन्स्टेबल रुजू झाली. 


" कालच्या मॅडम आल्या नाही का आज?" चैताली चा नवीन कॉन्स्टेबल ला प्रश्न.


"दुसऱ्या डिपार्टमेंट ला गेली ती. आता इथे माझी ड्युटी लागलीय,जे काही विचारायचं अन् सांगायचं ते मला. अन् बिनकामाच्या गोष्टी मला आवडत नाहीत,आपल्या कामाशी काम ठेवायचं काय." नवीन कॉन्स्टेबल.

तिचा एकंदरीत आविर्भाव पाहून खरं तर चैताली मनातून चारकलीच होती पण तिच्याशी जुळवून घेण्याशिवाय तिला काही पर्याय नव्हता.
जशी चैतली च्या औषधांची वेळ झाली चैताली अस्वस्थ होऊ लागली.
हीच ती वेळ अन् हाच तो क्षण हे त्या कॉन्स्टेबल च्या लक्षात यायला वेळ लागला नाही.


" काय झालं ग,अशी कां करतेस?"  लेडी कॉन्स्टेबल.


" मॅडम  माझी औषधांची वेळ  झाली. मला माझे औषधं द्या न प्लीज?" चैताली.


चैताली ची आर्जवं सुरू झाली पण तिकडे लक्षच द्यायचं नाही हे जणू ती पोलिस शिपाई ठरवूनच आलेली. 


"थांब माझी दोन तीन कामं पडली आहेत ती करू दे ,मग देते तुला तुझी औषधं.थोडा वेळ झाला तर काही एवढा पहाड नाही तुटून पडणार तुझ्यावर...! " म्हणत ती पुन्हा आपल्या कामात वेळ घालवू लागली.


जसजसा वेळ होऊ लागला तशीतशी चैताली अस्वस्थ होऊ लागली. तिची बेचैनी अजून वाढू लागली.
" मॅडम मला द्या न माझी औषधं प्लीज...!" चैताली.


"मी एवढ्या कामात आहे ,दिसतेय न तुला...!" थोड्या जोरातच ती बोलली.

काहीवेळ तसाच गेला आता मात्र चैताली ला राहवेना...!

"मॅडम प्लीज द्या हो माझी औषधं,नाहीतर मी कंप्लेंट करेन...!" चैताली

" कंप्लेंट करणार तू माझी, कर...,काय सांगणार सांग......!" 

त्या लेडी कॉन्स्टेबल चा तो आविर्भाव बघून चैताली ही चरकलीच होती मनातून. तिला चांगलीच अद्दल घडवायचा विचार करत होती पण सध्या तिचे औषधं मिळणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी थोडं नमतं घ्यायची तिची तयारी होती.


"औषधं हवी ना तुला तुझी, चल देते मी...! अरे, पण त्यासाठी मला आमच्या सरांची परमिशन घ्यावी लागेल." चैताली कडे बघत हसत ती बोलली.


"अहो,औषध द्यायला कुठे परमिशन लागते का? याआधीच्या मॅडम द्यायच्या मागितली की औषधं,तुम्ही फार त्रास देताय..!" चैताली

"म्हणूनच तर तिची उचलबांगडी झाली ना इथून,मला तर बाई माझ्या नोकरीवर परिणाम होईल असं काही करायचं नाही आहे.आमच्या सरांचं बारीक लक्ष असते हो फार...! मी त्यांनाच बोलावून विचारते की.." म्हणत तिने इन्स्पेक्टर विजय ला फोन लावला.


इकडे चैताली ची बेचैनी वाढत चालली होती आणि इथे हे नवीनच प्रकरण अजून..!चैताली मनातल्या मनात विचार करत होती. ते सर परमिशन देतील तर फार बरं होईल म्हणत तिनी मनोमन देवाला आळवले.


काही वेळातच इन्स्पेक्टर विजय तिथे हजर झाला.

लेडी कॉन्स्टेबल आणि चैताली दोघींनी ही आपापली गाराणी मांडली.


"मिस....! काय नाव म्हणालात ते..?"

" चैताली...!"

" मिस चैताली मी तुम्हाला तुमची औषधं देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला आधी आमची मदत करावी लागेल....! काय म्हणता आहे का मंजूर...?" विजय


" मी तुमची काय मदत करणार सर,मला कळलं नाही काही..." अस्वस्थ चैताली अजूनच अस्वस्थ होत बोलली.


"आम्ही काही प्रश्न विचारणार ,त्याची योग्य अशी उत्तरं आम्हाला तुम्ही द्यायची...!तुम्ही आपलं काम चोख केलं की आम्ही तुम्हाला तुमची औषधं देऊ.काय मग मंजूर का...?" विजय


"सर हे सरळ सरळ ब्लॅक मेलिंग आहे माझ्या आजाराचा गैरफायदा घेत आहात सर तुम्ही...! तशाही अवस्थेत चैताली ने प्रत्युत्तर दिलं."


"तुम्ही औषधं म्हणून घेताय ते अमली पदार्थ आहेत हे आम्ही सिद्ध केलं तर....! तरी पण तुम्ही आमच्यावर हाच आरोप करणार का चैताली मॅडम...! बऱ्या बोलाने आम्ही विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं द्या अन्यथा थर्ड डिग्री चा अनुभव घ्यायची तयारी ठेवा...! विजय


आता चैताली समोर फारच बाका प्रसंग उभा राहिला होता. तिची अवस्था एक तर पाण्याबाहेर काढलेल्या मासळी सारखी झाली होती. काही सांगायची इच्छा तर अजिबातच नव्हती तिची पण तिची अवस्था सध्या अशी होती की सध्या तिला काहीही करून तिचा डोस मिळवणे गरजेचे होते. थर्ड डिग्री म्हटल्या बरोबर तर तिचे अवसान अजूनच गळाले होते कारण अनेक जणांच्या तोंडून गुन्हा वदवून घेण्यासाठी किती अनन्वित अत्याचार केले जातात याच्या अनेक कथा याआधी ती ऐकून होती. आता यावर विचार करावा अशी सुद्धा तिची अवस्था नव्हती तर हे सारे सहन करणे दूरच....!


"मी तुम्हाला विचार करायला अजून पंधरा मिनिटं देतो मिस चैताली काय ते नीट विचारपूर्वक ठरवा अन् मला सांगा.मी येतो लगेच दहा पंधरा मिनिटात..!" अन्  इन्स्पेक्टर विजय तिथून लगेच निघाला.


काय झालं असेल पुढे? चैताली ने विजय चा प्रस्ताव स्वीकारला असेल की पुढच्या परिणामांना तोंड द्यायला ती सज्ज झाली असेल? हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग..!

टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे
     मुक्तमैफल