Login

अकस्मात_ अनामिका भाग १

एका लग्नाळू मुलाला आवडलेली मुलगी शोधताना केलेली धावपळ
स्पर्धा

अकस्मात _
अनामिका भाग १

शेखर अस्सल सागवानी लाकडाच्या कपाटाच्या लंबगोल आरशात पाहून बराच वेळ केस विंचरत होता. त्याच्या नागमोडी केसांचा मनासारखा भांग पडत नव्हता. इतक्यात त्याचा धाकटा भाऊ शंतनू तिथे आला आणि म्हणाला,

"अरे दादा अजून किती वेळ केस विंचरणार आहेस! अगदी राजेश दादाच्याच लग्नात तुझं लग्न जमेल असं नाही आणि तू तर जातीचा सुंदर आहेस. तुला आवडलेली मुलगी तुला नक्कीच पसंत करेल. चल आता लवकर. बाहेर गाड्या तयार आहेत. राजेश दादा तुझी वाट बघतोय."

"हो रे चल आलोच. शहाण्या मी आधी राजेशला तयार केलं आणि मग माझी तयारी करायला आलो. बघतो तू तुझी वेळ आल्यावर किती वेळ लावतोस तयारीला."

शेखरच्या मामेभावाचं राजेशच लग्न होतं म्हणून तो आणि त्याचे कुटुंबीय सांगलीला आले होते. मामाकडचे कार्य म्हणून सर्व चार दिवस आधीच आले होते. शेखरच्या आईने खास आग्रह करून त्याला इथे आणलं होतं कारण ह्या वर्षी शेखरचं लग्न करायचं होतं. पूर्वी बरीच लग्न एखाद्या लग्नातच जमवली जायची. तेव्हा विवाह मंडळ ही संकल्पना जास्त आढळत नव्हती. मध्यस्थ तेव्हाही होतेच. पावणेसहा फूट उंचीचा शेखर दिसायला देखणा होता. सावळा वर्ण, भव्य कपाळावरील नागमोडी वळणाचे केस, तरतरीत नाक ह्यामुळे त्याचा चेहरा शोभून दिसायचा. आज त्याने परिधान केलेल्या नेव्ही ब्लू रंगाचा सदरा आणि क्रीम रंगाची पैरण या वेशात तो रुबाबदार दिसत होता. आरशात त्याच्या प्रतिमेवर तो खुश झाला होता.

नवरा मुलगा विवाह स्थळी आल्यावर सुरेल सनईच्या सुरात सर्वांचे रीतसर स्वागत झालं. शेखर राजेशच्या जवळपास राहून त्याला काही हवं नको ते पाहत होता, मामाला मदत करत होता. अधूनमधून तो आलेल्या पाहुण्यांवर नजर फिरवत होता. असे पाहत असताना त्याची नजर एका साध्यासुध्या परंतु सुंदर मुलीवर स्थिरावली. तिने अबोली रंगाची सिल्कची साडी नेसली होती जी तिच्या निमगोऱ्या वर्णावर खुलून दिसत होती. केसांच्या नैसर्गिक बटा तिच्या भालप्रदेशावर रुळत होत्या. तिचे हरणासारखे डोळे चहूबाजूला भिरभिरत होते. शेखरला ती पहिल्याच नजरेत आवडली. इतक्यात ती पाठमोरी झाली आणि तिची गुडघ्यापर्यंत केसांची लांबसडक वेणी त्याच्या डोळ्यात भरली. तिला पाहून त्याने मनोमन निश्चय केला की हिच्याशीच लग्न करायचं. परंतु त्या काळी एखादी मुलगी आवडली म्हणून कोणाच्या ओळखीने मुलं लगेच जाऊन मुलींची ओळख करून घेत नसत.

आता मुहूर्ताची वेळ झाली होती. शेखर काम करत करत अधूनमधून तिच्याकडे पहात होता. शेखरच्या मनात आलं की आपल्याला ती आवडली हे खरं पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही हे सुद्धा बघायला हवं. ती संधी त्याला लगेचच मिळाली. लग्न लागल्यावर उपस्थिताना वराकडून पेढे वाटण्यासाठी मामा कोणालातरी हाक मारत होता. शेखर लगबगीने मामाकडे गेला,

"अरे मामा कशाला कोणाला हाक मारतोस. दे मी पेढे वाटतो."

"अरे हे काम कोणीही करेल तू महत्वाच्या ठिकाणी लक्ष दे."

"पेढे लगेच वाटून होतील." असं म्हणून शेखरने मामाच्या हातातील ताट घेऊन पेढे वाटायला सुरुवात केली.

(शेखरला त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसेल की नाही पाहूया पुढील भागात)