Login

अकस्मात_अनामिका भाग २

एका लग्नाळू मुलाला आवडलेली मुलगी शोधताना होणारी धावपळ
स्पर्धा

अकस्मात_
अनामिका भाग २

शेखर पेढे वाटत वाटत त्या मुली जवळ आला. पेढा देताना क्षणभर दोघांची नजरा नजर झाली. हळूच शेखरने तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही हे पाहून घेतलं. तो मनोमन खुश झाला कारण तिचं लग्न झालं नव्हतं. त्याने ठरवलं आता दिवसभरात पुढची पायरी म्हणजे ती मुलगी कोण हे शोधून काढायचं त्यानंतर बाकी पुढच्या गोष्टी होतीलच. खरंतर एरव्ही दिवसभरच्या लग्नात शेखर खूप कंटाळून जायचा पण आज त्याच्यात ठासून उत्साह भरला होता. तो सर्व नातेवाईकांशी, आल्यागेल्यांशी सगळ्यांशी बोलत होता तरी त्या मुलीवर मधून मधून त्याची नजर जातच होती. त्याला मनोमन असं वाटत होतं की तिने सुद्धा त्याच्याकडे पाहावं. तो तिच्याकडे पाहतोय हे तिच्या गावीही नव्हतं.

लग्नानंतरचे विधी झाल्यावर पंगती उठायला सुरुवात झाली. शेखरने तिथेही पुढाकार घेऊन पंक्तीत वाढायचा चान्स घेतला. त्यानिमित्ताने त्या मुलीला पुन्हा जवळून बघता येईल. ती ज्या बाजूला जेवायला बसली होती तिथे शेखर मुद्दाम दोन वेळा फिरला. तिला त्याने जिलेबी घेण्याचा आग्रह केला. तिने गोड आवाजात नको म्हटलं. जेवण झाल्यावर काही पाहुणे निघून गेले तर काही हॉलमध्ये रेंगाळत होते. शेखरची भिरभीर फिरणारी नजर तिला शोधत होती. परंतु जेवण झाल्यावर ती मुलगी कुठेच दिसली नाही. शेखरला कळेच ना आता काय करायचं. ती नक्की कोणाच्या बाजूने आली होती हेही माहित नव्हतं. शेखरचे मन खट्टू झालं. उरलेल्या समारंभात तो एक कर्तव्य म्हणून वावरला. संध्याकाळी रिसेप्शनला नवीन शिवलेला सूट घालण्यात पण त्याला काही रस वाटत नव्हता. त्याची आई त्याला म्हणाली,

"काय रे शेखर सकाळपासून एकदम उत्साहात होतास आता एवढा चेहरा पडला का? काय झालं कोणी तुला काही बोललं का!"

"नाही गं आई सकाळपासून जरा दगदग झाली ना म्हणून तुला असं वाटत असेल."

पुन्हा संध्याकाळच्या रिसेप्शन साठी शेखर राजेशला तयार करायला गेला तेव्हा राजेशने त्याला विचारले,

"काय रे शेखर तुला एखादी मुलगी आवडली की नाही. आवडली असेल तर लगेच सांग आपण चौकशी करू."

"अरे आता तुझ्यापासून काय लपवायचं. मला एक मुलगी आवडली खरी पण ती बहुदा आपल्या साईडने नसावी. बहुतेक वहिनीच्या बाजूची असेल तिची एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक."

"असं असेल तर मी रागिणीला विचारेन ना तू काळजी करू नको."

राजेश आणि रागिणीचा रीतसर गृहप्रवेश झाल्यावर दुसऱ्या दिवशी वधूच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. शेखरला आशा होती की कदाचित ती मुलगी पूजेला येईल. संध्याकाळी पूजेसाठी पाहुणे येऊ लागल्यापासून ते रात्र होईपर्यंत शेखर आशाळभूतपणे तिची वाट बघत होता परंतु ती काही आलीच नाही. दुसऱ्या दिवशी शेखरचे कुटुंबीय, मामा-मामीचा आणि नवदांपत्याचा निरोप घेऊन घरी यायला निघाले. निघताना राजेशने त्याला दिलासा दिला,

"मी लवकरच रागिणीला विचारून घेतो आणि तुला कळवतो."

शेखरने घरी येऊन आईला सगळं सांगायचं ठरवलं म्हणजे आई पण त्या दृष्टीने मामाला विचारून चौकशी करू शकेल.

(शेखरला आवडलेली मुलगी पुन्हा त्याला दिसेल का पाहूया पुढील भागात)