स्पर्धा
अकस्मात _
अनामिका भाग ३
अनामिका भाग ३
शेखरला प्रश्न पडला होता की आता आईला कसं सांगायचं की आपल्याला एक मुलगी आवडली आहे. हा तिढा आईनेच सोडवला. आईने स्वतःच शेखरला विचारले,
"काय रे तू एवढा छान तयार झाला होतास तुला राजेशच्या लग्नात कोणी मुलगी आवडली की नाही."
"आई खरं सांगू का मला एक मुलगी आवडली परंतु ती आपल्या बाजूने आली नव्हती असं मला वाटतंय."
"कशी होती ती मुलगी थोडं वर्णन तर कर."
"मुलगी साधीसुधी, गुडघ्यापर्यंतच्या लांब केसांची एक वेणी घातली होती तिने. छान दिसत होती ती."
"छे छे!अशी मुलगी तर आपल्या बाजूने कोणी नव्हतीच. आता रागिणीच्या घरच्यांकडे चौकशी करावी लागेल."
"हो राजेश पण म्हणाला आहे तो रागिणीला विचारेल म्हणून"
"अरे लबाडा राजेशला पण सांगून झालं वाटते."
आईने आपली चोरी पकडली म्हणून शेखर थोडासा लाजला. शेखरला वाटत होते की मामाच्या घरी फोन करून राजेशला काय झाले ते विचारावे. परंतु घरी फोन केल्यावर तोच फोन उचलेल याची खात्री नव्हती. त्यामुळे राजेशचा फोन येईपर्यंत धीर धरण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्याची अवस्था "ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला" अशी झाली होती. अपेक्षेप्रमाणे राजेशचा फोन आला तो आधी आईने घेतला. आईशी जुजबी बोलणं झाल्यावर राजेशने फोन शेखरला द्यायला सांगितला. त्या दोघांना निवांत बोलू देऊया म्हणून आई तिथून निघून गेली.
"हॅलो राजेश काय झालं रे काही कळलं का."
"अरे हो हो! किती उतावीळ झाला आहेस. मी रागिणीला विचारलं पण ती म्हणाली की त्यांच्याकडे पण अशी कोणीही मुलगी नाहीये. शिवाय तिच्या मैत्रिणींपैकी पण कोणाचेही केस लांब नाहीत. मला वाटते की ती मुलगी कुणाला तरी सोबत म्हणून आली असेल. अशा अगंतुक मुलीला शोधणे जरा कठीणच आहे."
"नाही नाही कठीण असलं तरी आपण शोधतच राहायला हवं. मी लग्न केलं तर त्याच मुलीशी करेन इतकं मात्र नक्की."
"बापरे एकदाच बघून तू तिच्या प्रेमात एवढा पागल झालास. आता तुझ्यासाठी जंग जंग पछाडावं लागलं तरी बेहत्तर."
"अरे यार तुझ्याकडून थोडी हिंट मिळाली असती तरी मी पुढचं शोधकार्य पूर्ण केलं असतं. ठीक आहे. बरं आमची वहिनी कशी आहे. तुझं नवीन लग्न झालंय आणि मी तुला डिटेक्टिव बनवतोय."
"वहिनी बरी आहे. चल ठेवतो आता तिच्याबरोबर बाहेर जायचंय."
फोन ठेवल्यावर शेखर उदासपणे बसला होता. त्याला असं बसलेला बघून आई म्हणाली,
"काय रे काहीच कळलं नाही का त्या मुलीबद्दल. पण शेखर आता आपल्या शुभदाचे लग्न ठरलं आहे आणि मी आणि बाबांनी ठरवलं आहे की तुझं आणि तिचं लग्न एकाच दिवशी करायचं आहे. त्यामुळे आता तू दुसरी एखादी मुलगी पाहायला तयार राहा."
"इतकी काय घाई करतेस. थोडंस थांबूया ना आपण. कुठेतरी तिचा पत्ता नक्कीच मिळेल. माझं मन मला सांगतय की माझी लग्नगाठ तिच्याशीच बांधली आहे."
"म्हणे तिच्याशीच बांधली आहे. कसा शोधणार आहेस तू तिला. तिच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. कोणाबरोबर आली होती काही कळतही नाही."
"आपण शुभदाचे लग्न आधी करूया मी नंतर करेन ना लग्न."
"नाही ते काही चालणार नाही. आपलं जीवन म्हणजे काय हिंदी सिनेमा नाहीये की एकदा जत्रेत पाहिलेली मुलगी योगायोगाने तुला पुन्हा भेटेल."
(आईने ताकीद दिल्यामुळे आता शेखर काय करेल दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार होईल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा