स्पर्धा
अकस्मात _
अनामिका भाग ४ (अंतिम)
अनामिका भाग ४ (अंतिम)
आईने जरी ताकीद दिली असली तरी शेखरला माहिती होतं की आई जबरदस्तीने त्याला इतर कोणत्याही मुलीशी लग्न करायला भाग पाडणार नाही. काही दिवसांनी आईने त्याला दोन-चार मुलींचे फोटो दाखवले. आईने सर्व मुलींवर स्तुतीसुमने उधळीत त्यांची तारीफ केली परंतु शेखरला त्यातला एकही फोटो पसंत करायचाच नव्हता. शुभदाच्या लग्नाची तारीख जवळ येत चालली होती तेव्हा आई त्याला म्हणाली,
"हे बघ एक साताऱ्याहून खूपच चांगलं स्थळ चालून आलं आहे. हे स्थळ पण तुझ्या मामाने सुचवलं आहे. मुलगी खूपच शालीन आणि नम्र आहे. मामाने शब्द टाकल्यामुळे आपल्याला त्या मुलीला बघायला जावंच लागेल."
"मुलगी बघण्यासाठी एवढ्या लांब जाण्याची काय गरज. उगाच वेळ आणि पैसा दोन्हीचाही अपव्यय."
"पैशाचा तू कधीपासून एवढा विचार करायला लागलास!"
हो ना करता शेखर त्या मुलीला पाहायला तयार झाला. शेखरला मनोमन वाटत होतं त्या मुलीनेच आपल्याला नकार द्यावा म्हणून तो काहीही जास्ती तयारी न करता मुलगी बघायला गेला. त्यांचं घर म्हणजे एक छोटासा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला टुमदार बंगला होता. समोर सुंदर शोभेची रोपं आणि फुलझाडे लावली होती. ओसरीवर सागवानी झोपाळा होता. मुलीकडे गेल्यावर सगळ्यांचे यथोचित स्वागत झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या सर्वांना त्यांनी थंडगार लिंबू सरबत दिलं.
शेखरला कशातच रस वाटत नव्हता. तो असाच इथेतिथे बघत होता. मोठी माणसे आपापसात काही बोलत होते त्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. थोडा वेळ झाल्यावर मुलीच्या वडिलांनी मुलीला बाहेर घेऊन येण्यास सांगितले. आई आणि मामा उत्सुक झाले होते. उपवर मुलगी तिच्या वहिनी बरोबर पोह्यांचा ट्रे घेऊन बाहेर आली. आई तिला म्हणाली,
"शालिनी सर्वांना पोहे दे."
बाकीच्यांना पोहे दिल्यानंतर ती खाली बघत असलेल्या शेखर जवळ आली आणि म्हणाली,
"पोहे घ्या ना."
पोह्याची डिश घेताना औपचारिकता म्हणून त्याने शालिनी नावाच्या त्या मुलीकडे पाहिले आणि तो डिशसकट उठून उभा राहिला.
"तूsssतुम्ही!" शेखरचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो मनातल्या मनात म्हणत होता शालिनी तुला काय माहिती तू माझी झोप उडवली आहेस. जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी मला तूच दिसत आहेस. त्याच्या लक्षात आलं तो एकटक तिच्याकडे पाहत उभा आहे. लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि तो खाली बसला. त्याच्या आईच्या लक्षात आलं की शेखरला आवडलेली मुलगी अचानक त्याच्यासमोर आल्यामुळे त्याला काही सुचत नाहीये.
"शेखर आपण योग्य ठिकाणी येऊन पोहोचलो बरोबर ना."
"हो आई अगदी योग्य पत्त्यावर येऊन पोहोचलोय. तू पण वाचलं असशीलच ना, "अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है". आज हे मला अगदी तंतोतंत पटलं आहे. आई माझा होकार आहे या लग्नाला."
"ए बाबा तुझी कायनात म्हणजे मी आणि तुझा मामाच आहोत बरं का! तू अगदी पण केला होतास ना लग्न केलं तर ह्या मुलीशीच करेन. मग मी रागिणीकडे चौकशी केली. तेव्हा कळलं की रागिणीची एक मैत्रीण शिल्पा लग्नानंतर इथे राहतेय. शिल्पाला सोबत म्हणून शालिनी तिच्याबरोबर आली होती. कळलं का!" शालिनीकडे बघून आई म्हणाली,
"शालिनी तू बस ना. आमच्या शेखरला तू राजेशच्या लग्नातच पाहिल्याबरोबर आवडली होतीस. तुला पाहिल्यावर कळतंय की तू शेखरला एव्हढी का आवडलीस."
"आई तू आणि मामाने मला अगदी ताकास तूर लागू दिला नाही. माझ्या डोक्यावर टांगती तलवार ठेवली. आधीच सांगितलं असतं तर मी जास्त तयार होऊन आलो असतो."
"पुरे आता. असाही तू छान दिसतोस."
शेखरच्या आईला कळत होतं की शेखरला हिच्याशी आता खूप काही बोलावसं वाटतंय म्हणून ती म्हणाली,
"शेखर तुला आणि शालिनीला काही बोलायचं असेल तर तुम्ही बाहेर ओसरीवरील झोपाळ्यावर बसून बोला."
"शालिनी मला तुझं नाव सुद्धा माहित नव्हतं. मी तुला मनातल्या मनात अनामिका म्हणत होतो. तू अशी अकस्मात माझ्यासमोर येशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. पण मला मनोमन खात्री होती की एक ना एक दिवस तू मला भेटशीलच. तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल ना!"
"माझा या लग्नाला नकार असण्याचं कारणच नाही. जी व्यक्ती मला एकदाच पाहून माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते ती नक्कीच मला आयुष्यभर सुखात ठेवेल." तिच्याकडे पाहत शेखर म्हणाला,
"तुझा हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन शालिनी."
समाप्त
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा