जलद ब्लॉग लेखन – ऑक्टोबर २०२५
विषय- अकस्मात
शिर्षक – अकल्पित क्षण. भाग - ३
मेधा रमणला म्हणाली, “अहो आईबाबांना व माझ्या मम्मी पप्पांना कळवले ना तुम्ही. ते पण आपल्यावर हसतील. आपण पूर्वी त्यांच्यावर हसायचो. आपल्या भावंडांमध्ये एवढं अंतर ठेवले म्हणून. त्यांच्या वेळी आता एवढी साधने पण नव्हती. आपल्या आया शिकलेल्या पण नव्हत्या. पण मी एवढी शिकलेली. सोशल मिडिया वापरणारी. नेहमी आरोग्याची काळजी घेणारी. वेळच्या वेळी सर्व तपासणी करुन सुद्धा जे घडायचं ते अकस्मात घडलेचं. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती मला नीट हाताळता येईल ना. रमण तू आहेस ना माझ्या सोबत.”
“मेधा तू अजिबात काळजी करु नकोस. मी आहे तुझ्यासोबत. आपण दोघं ह्या येणाऱ्या बाळाचे स्वागत करु या. तू आता फक्त आराम कर. आनंदीत रहा. तुला शक्य असेल तर बॅंकेत जा नाही तर नाही गेलीस तरी चालेल. रीटायरमेंट घ्यायची असेलतर घे. पण आता फक्त तू तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे.”
रमणचे व मेधाचे आईवडील दोघेही आले. त्यांना बघून मेधाला लाजल्यासारखे झाले. मेधाच्या सासूबाई तिला म्हणाल्या, “मेधा ह्या वयात आई होणार आहे. त्यामुळे तुला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. मी आणि तुझी आई आहोत. पण आता आमची पण वय झाली आहेत. त्यामुळे आता पूर्वीसारखी धावपळ होणं शक्य नाही. आपण सगळ्या कामासाठी बाई लावू या आणि तू मनात काही ठेऊ नकोस. मुख्य म्हणजे लाजू नकोस. तू काही गुन्हा नाही केलास. त्यामुळे स्वतःला, रमणला दोष देऊ नकोस. पण ह्यानंतर ऑपरेशन करून घे बाई. मी पूर्वीच म्हणाले होते ऑपरेशन करून घे. पण तुच म्हणालीस एका मुलावर डॉक्टर लगेच ऑपरेशन करत नाही. नंतर ते राहिले ते राहिलेच.”
मेधा तिच्या आईसोबत एकटी खोलीत असताना आईला म्हणाली, “आई मला माफ कर. मी तुला आणि आजीला नेहमी हसायचे आणि म्हणायचे, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेता आली नाही. साधन वापरता आली नाही. नुसतं मुलं जन्माला घातली तुम्ही. दोन मुलांमध्ये किती जास्त अंतर ठेवले तुम्ही? पण आज स्वतः ह्या परिस्थितीतून जात असताना माझी मुलगी मी जे तुम्हाला बोलली तेच मला बोलली तेव्हा मला कळले तुला मी बोलले तेव्हा तुला व आजीला काय वाटले असेल?”
“मेधा, अगं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू वाईट नको वाटून घेऊस. रीमाला मी समजावते. अगं तिला एकटं राहायची सवय झाली आहे. आता वाटेकरी कसा सहन होईल तिला आणि तिचे मित्रपरिवार हसणार ह्यामुळे ती बोलली.”
तेवढ्यात तिथे रीमा आली आणि आजीला म्हणाली, “आजी खरं आहे अगदी. मला जेव्हा कळलं आई परत आई होणार आहे. आमच्या घरी नवीन बाळ येणार आहे. तेव्हा सर्व प्रथम माझ्या मनात हाच विचार आला. आता मी एकुलती एक राहणार नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत कोणीतरी वाटेकरी येणार. साहजिकच आहे ना आजी. बावीस वर्ष मी एकटी ह्या घरातील राजकुमारी होते. माझे सर्व लाड करायचे आता त्यात कोणीतरी वाटेकरी येणार म्हटल्यावर मला राग येणारच ना. पण मनापासून सॉरी आई. मी तुला आणि बाबांना खूप बोलले. हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. माझा त्यात बोलण्याचा काहीच अधिकार नाही.”
“चला आता सॉरी वगैरेला मारा गोळी आपल्या घरात नवीन बाळं येणार म्हणून मस्तपैकी आइस्क्रीम पार्टी होऊन जाऊ दे. रमण खोलीत येऊन रीमाला जवळ घेऊन म्हणाला.”
३१/१०/२०२५
©️®️ ज्योती सिनफळ.
