Login

कथेचे नाव - अक्षम्य अपराध

एका स्त्रीकडून आपल्या मुलाला मारण्याचा नकळतपणे घडलेला अपराध
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
कथेचे नाव - अक्षम्य अपराध

न्यायालयात जो तो त्या महिलेच्या गुन्ह्यावर भाष्य करत होता. भले त्या महिलेकडून नकळतपणे अपराध घडला होता तरीही सर्वांच्या बोचऱ्या नजरेने विजयाला ताबडतोब मरण येईल तर बरे होईल असे वाटत होते.

"तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे ना?" जजसाहेबांनी आरोपी विजयाला विचारले.

"हो." खालच्या मानेने विजयाने उत्तर दिले. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. नकळतपणे तिच्या हातून खूप मोठा गुन्हा घडला होता.

"तुमच्या गुन्ह्यासाठी तुम्हाला सात वर्षांची शिक्षा मी सुनावतो आहे." जजसाहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. महिला पोलिसांनी तिला बेड्या घालून तिची रवानगी तुरुंगात केली. आईला तुरुंगात नेत असताना तिच्या मोठ्या मुलीने आक्रोश केला. तिच्या आक्रोशाने खरंतर तिथे असलेल्या लोकांचे हृदय पिळवटले; पण त्या क्रूर बाईला शिक्षा मिळाली ही भावना देखील लोकांच्या मनात होती.

विजया सुन्न होऊन बसली होती. 'काय झालं हे आपल्या हातून?' तिच्या मनात हा सारखा विचार चालू होता. कालचा भयंकर प्रसंग अजूनही तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता.

विजया खूप साधी मुलगी होती. घरची परिस्थिती अतिशय गरीब असल्याने तिला शिक्षणाची आवड असून देखील तिच्या आईवडिलांनी कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण तिला दिले होते. तिचा धाकटा भाऊ जय सातवीत शिकत होता. तिची मोठी बहीण जया जेमतेम आठवीपर्यंत शिकली होती. विजयाच्या आईवडिलांनी वयाच्या सोळाव्या वर्षीचं जयाचे लग्न करून दिले होते. जयाचा नवरा एका कंपनीत सुपरवायझर होता. जया खाऊनपिऊन सुखी होती.

विजयासाठी तिच्या भाऊजींने त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सूर्यकांतचे स्थळ सुचवले. सूर्यकांत बारावी शिकला होता. त्याचे आईवडील गावी शेती करत होते. मुंबईमधे भाड्याच्या घरात तो राहत होता. विजयाच्या आईवडिलांना तसेच विजयाला तो पसंत पडला. विजयाचे सूर्यकांतशी लग्न झाले.

विजयाने संसाराला हातभार लागावा म्हणून शिलाईकामाचे प्रशिक्षण घेतले. आजूबाजूच्या बायकांचे ब्लाउज, पंजाबी ड्रेसेस सफाईदार आणि माफक दरात शिवून देत असल्याने तिच्याकडे शिलाईची भरपूर कामे येत होती. विजयाच्या संसारात दोन फुले उमलली होती. तिला पहिल्या मुलीनंतर दुसरा मुलगा झाला होता. सगळं काही सुरळीत चालू होतं. विजयाच्या बारा वर्षांच्या सुखी संसाराला जणू कोणाची तरी दृष्ट लागली आणि तिचा नवरा सतत दारू पिऊन यायला लागला. विजयाला अर्वाच्य शिव्या देऊ लागला. बाईचे देखील त्याला व्यसन लागले होते. सूर्यकांत सगळा पैसा बाई आणि बाटलीमध्ये उडवू लागला होता. विजया कधी गोडीगुलाबीने तर कधी भांडून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती; पण सूर्यकांत सुधरण्यापलीकडे गेला होता. शेवटी हताश होऊन तिने सूर्यकांतबद्दल तिच्या भाऊजींच्या कानावर घातले. विजयाच्या भाऊजींनी देखील सूर्यकांतला खूप समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु सूर्यकांत कोणाचेही ऐकून घेत नव्हता. शेवटी सूर्यकांतच्या घरच्यांच्या तसेच विजयाच्या घरच्यांच्या संमतीने विजयाने सूर्यकांत सोबत घटस्फोट घेतला.

विजयाच्या डोळ्यांसमोर तिच्या दोन मुलांचे भवितव्य दिसत होते. पदरात दहा वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असल्याने मुलांना घेऊन आईवडिलांकडे जावे तर त्यांच्याकडे गरिबी पाचवीला पुजली होती. शेवटी जया आणि तिच्या नवऱ्याने विजयाला आपल्या घरी आसरा दिला. आपला आणि आपल्या दोन मुलांचा भार बहिणीवर पडू नये म्हणून विजयाने शिलाई कामाबरोबर लाडू, चकली, शंकरपाळी, मसाले यांचा घरगुती व्यवसाय सुरू केला. विजयाला तिच्या व्यवसायात जयाची उत्तम साथ लाभली होती. जयाची दोन्ही मुले कॉलेजमध्ये जात असल्याने ते विजयाच्या मुलांचा अभ्यास घेत असत. त्यामुळे विजया आपल्या मुलांच्या बाबतीत निश्चिन्त झाली होती.

नवरात्र उत्सव सुरू झाला असल्याने जयाने घट बसवले. जया आणि विजया दोघीही भक्तिभावाने देवीची पूजाअर्चा करत होत्या. विजया देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी पुरणपोळी करत होती तितक्यात तिची दोन्ही मुले तिच्याकडे हट्ट करू लागली.

"ए आई! आम्हाला पुरणपोळी नको ना ग. सारखे सारखे गोड खाऊन कंटाळा आला आहे. आम्हाला चिकन लॉलीपॉप करून दे ना." विजयाची दोन्ही मुले यामिनी आणि यश हट्ट करत होते.

"नाही बाळांनो! आज नाही करून देणार मी तुम्हाला लॉलीपॉप. आपल्याकडे देवी बसली आहे ना? मग मी तुम्हाला दसऱ्यानंतर करून देईन हां. आता फक्त चारच दिवस उरले आहेत दसऱ्याला. मी शुक्रवारी नक्की करून देईन हां."

विजया दोन्ही मुलांना समजावत होती तरीही मुले हट्ट करतच राहिली. विजया त्यांना सारखी सांगत होती की, आपल्याकडे देवीची पूजा आहे तर आपण नाही खाऊ शकत तरीही मुले ऐकत नव्हती. शेवटी विजयाने रागाच्या भरात हातातल्या लाटण्याने दोन्ही मुलांना बदडवायला सुरुवात केली. तिने यशच्या डोक्यात जोरात लाटणे मारले त्यामुळे यशच्या डोक्याला आघात होऊन तो तिथल्या तिथेच गतप्राण झाला. थोड्या वेळाने विजयाचा राग शांत झाल्यावर तिने पाहिले की, यश काहीच हालचाल करत नव्हता.

"यश! काय झालं तुला? उठ ना यश. तू काहीच हालचाल का करत नाहीस? ए बाळा! उठ ना. आईसाठी उठ ना. मी हॉटेलमध्ये नेऊन तुला खायला घालते लॉलीपॉप. आता तरी उठ ना." विजया यशला हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती; परंतु यश कधीच मृत पावला होता. विजया तिचा उर बडवून घेत होती; पण तिचा यश आता परत येणार नव्हता. तिच्या हातून नकळतपणे अक्षम्य अपराध घडला होता.

विजया तुरुंगामध्ये बसून आपल्या अतिरागामुळे घडलेल्या अपराधाबद्दल आक्रोश करत राहिली होती.

©® सौ. नेहा उजाळे
ठाणे
0