Login

शेती

Alak Sheti
*विवेक चंद्रकांत.....

1) "हैं देख बंडूभाऊ, तुनं जेमतेम दोन एकर वावर. त्यामाबी दोन वरस व्हई गयात काही पीकी नाई ऱ्हायन. इहीरले पाणी बी नाई.काय पिकवशी तू?चांगल गिर्हाईक येल शे. मालदार पार्टी शे शहरनी. इतला सांगी ऱ्हायनात." इथे सोनुने बंडूच्या कानात आकडा सांगितला.
" त्यांनापेक्षा बी 1-2लाख जास्तच काढसू. "

आकडा ऐकून बंडूला धक्काचं बसला. एवढी रक्कम कमवायची तर सोडा त्याने पाहिलीही नव्हती. तो होच म्हणणार होता. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर त्याचे शेत आले. आता दुष्काळामुळे भकास झालेले पण त्याच्या लहानपणी हिरवेगार असलेले. त्याच्या वडिलांबरोबर किती वेळा तो शेतात राबला असेल, विहिरीत डुंबला असेल, औत धरून बैलांबरोबर चालला असेल, खळ्यात चांदण्या बघतांना झोपला असेल. त्याच मन कातर झाले.
त्याला गप्प बसलेला पाहून सोनू पुन्हा म्हणाला

" काय इचार करी ऱ्हायना? फोन करा कि पार्टी हजर व्हई जाई. अरे तू फक्त बेणं ली ले. त्यामच तुन सोसायटीनं कर्ज नील व्हई जाई. "

तरीही बंडू काही बोलला नाही. त्याच्या नजरेसमोर बाप मरतांना चे शब्द आठवले. " वावर ना ध्यान ठेव जो रे बंडया "
त्याने एक आवंढा गिळला आणि म्हणाला

" सोनूभाऊ... ह्या सालले पाणी चांगला सांगी रायनात हवामान वाला. हौ वरस सौ म्हहीना देखी ल्यू. नाहीतर पार्टीले हा सांगी दिसू "

2.) अण्णा आबा आणि तात्या ह्या तिघी भावांचे मिळून एक शेत होते. अण्णाच कसायचा ते. कारण आबा आणि तात्या नोकरी धंद्यासाठी शहरात गेलेले. पण आता अण्णा ही थकला होता. त्यात जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने इतर दोघी भावांचा शेती विकण्याकडे कल होता. अण्णाला शेती विकायची नव्हती पण अण्णाचा शहरातल्या मुलाचाही फोन आला.
"आते बस व्हई गय अण्णा. तुमनबी वय व्हई गय. इकी टाका ती शेती आणि बँक मा पैसा ठीसन अराम करा. कितलक राबश्यात ?"

पोराने सांगितल्याने अण्णाचा नाईलाज झाला.
लगेच चक्रे फिरली. गिर्हाईक आले सौदा होऊन लगेच आठ दिवसात शेती विकलीही गेली. त्या दिवशी सह्या झाल्यावर. दलाल घरी येऊन पैसे तीन हिश्यात वाटून गेला. तात्या आबा चहापाणी करून पैसे घेऊन निघूनं गेले. आबाच्या बायकोनेही पैशांच्या गड्डीने भरलेली ती बॅग व्यवस्थित कपाटात ठेवली. अण्णा उतरलेल्या चेहऱ्याने ते सगळे पाहत होता.
थोड्या वेळाने तो बायकोला म्हणाला

" लक्षमे दरवाजा लाई ले. "

अण्णाच्या बायकोला आश्चर्य वाटले. संध्याकाळी दरवाजा बंद करायला का सांगत आहेत? कदाचित पैसे मोजायचे असतील. ती दरवाजा लावून वळत नाही तोच अण्णाने तिला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. सुरुवातीला गांगरलेल्या लक्ष्मीने अण्णा च्या पाठीवरून हात फिरवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. त्यात आपण इतकी वर्षे सावलीसारखे राहूनही नवऱ्याला ओळखू शकलो नाही याचा पश्चातापही होता....

3)नानासाहेब हे त्या छोट्याश्या गावात आदराने घेतले जाणारे नाव. मार्केट कमिटीचे सदस्य, शांतता कमिटीचे सदस्य, गावाच्या भल्यासाठी झटणारा म्हणून त्यांची ख्याती होती पण प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ते ओळखले जायचे. वय होत गेले तसें नानासाहेबांनी सगळ्या गोष्टीतून अंग काढून घेतले. रोज शेतावर चक्कर टाकून येणे एवढेच काम. पण तब्येत ढासळतच गेली. एका संध्याकाळी त्यांनी तिन्ही मुलांना जवळ बोलावले.
" हैं देखा. मले काही आते मना भरोसा वाटत नई "

" कायबी नका बोलू नानासाहेब. काल्दीन मी शहरतून मोठा डॉक्टरले बोलायलें शे. तुमले नक्की आराम पडी " मोठा मुलगा भावुक होत म्हणाला.

"त्यांनापुढे कोण काही चालस का?" नानासाहेबांनी वरती हात दाखवला. "आते मन ऐका. प्रॉपर्टीना बठ्ठा हिस्सा व्हई ग्यात. फक्त एक करान, मी मरा नंतर मले श्मशानमा नई बाळानं. मले आपले वरणखेडा रस्ताले जे वावर शे दोन बिघान. तठे बाळा.
रस्ताना बाजूमा. आणि चितानी राख बठ्ठा वावरमा टाकी द्या. ते वावर मनी पहिली कमाईन शे. आणि अस्थी तापीमाचं टाकी द्या. काय इतला दूर गंगा बिंगा जावानी जरूर नई."
मुलांनी अश्रू पुसत माना डोलवल्या.

त्याच रात्री नानासाहेबांनी देह ठेवला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे पार्थिव शेतात जाळण्यात आले आणि रक्षा त्याच छोट्याश्या वावरातल्या मातीत टाकली गेली. नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक चबूतरा बांधला गेला. नानासाहेबांच्या अंत्यसंस्कारंनंतर काही दिवसांनी त्या चबूतऱ्याच्या बाजूला एक औदुंबराचे झाड उगवले आणि काही महिन्यातच ते भले मोठे झाले. उन्ह्याळ्यात अंगाची काहीली होत असतांना कोणी पांथस्थ त्या रस्त्याने गेला तर त्या चबुतर्यावर बसतो. औदुंबराची शीतल छाया घेतो आणि मग नव्या उभारीने पुन्हा चालू लागतो.

आजूबाजूला प्लॉट पडले तरी नानासाहेबांच्या मुलांनी ते शेत विकले नाही......
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.