अलार्म से अफेअर तक !

.
सकाळचा प्रहर होता. अधिक ऑफीसला जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यात तिथे पाखी आली. तिच्या मुखावरचे हावभाव बघून अधिकला समजायचे ते समजले.

" काय झाले पाखू ? आज मूड ऑफ दिसतोय. " अधिक म्हणाला.

" अधिक , तुझे अलार्म रोज वाजत असतात. माझी झोप मोडते त्याने. " पाखी म्हणाली.

" मग बंद करत जा ना. " अधिक म्हणाला.

" किती बंद करणार ? तू वीस अलार्म लावतोस. " पाखी म्हणाली.

" मग तू माझा अलार्म बन. तू उठव मला. " अधिक म्हणाला.

" मला आयुष्यात अजूनही महत्वाची कामे आहेत. " पाखी म्हणाली.

" मिसेस पाखी , कॅन आय आस्क यु कोणती महत्वाची कामे असतात तुम्हाला ?" अधिक म्हणाला.

" सकाळी दहाला उठायचं. दुपारी वेब सिरीज बघायच्या. मग ईरा ब्लॉगवरच्या कथा वाचायच्या. मैत्रिणींना व्हिडीओ कॉल , मेकअप , ऍमेझॉनवर विंडो शॉपिंग मग संध्याकाळी " ये रिश्ता कुछ केहलाता भी है की नहीं " सिरीयल बघायचं आणि रात्री स्पॉटीफायवर गाणी ऐकायची. " पाखी म्हणाली.

" वाह ! तू तर एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओपेक्षाही बिझी आहेस. " अधिक म्हणाला.

" बाय द वे. लग्न होण्याच्या आधी तू मला स्पॉटीफायचे सबस्क्रिप्शन दिले होते. तू किती काळजी घ्यायचा माझी. " पाखी म्हणाली.

" अच्छा ते. ते तर मला एका रिचार्जवर ऑफर मिळाली होती. एक रुपयाला सबस्क्रिप्शन मिळत होते. मी स्पॉटीफाय वापरत नाही जास्त म्हणून मी तुला कुपन कोड दिले होते. " अधिक म्हणाला.

" ओह. मी तेच म्हणले तू माझ्यासाठी कशाला खर्च करशील. " पाखी म्हणाली.

" ओके. मी ऑफीसला लेट होतोय. बाय. " अधिक म्हणाला.

अधिक निघून गेला. थोड्या वेळाने दीपिका आली. पाखी डोक्यावर झंडू बाम चोळत होती.

" काय झाले मॅडम ?" दीपिका म्हणाली.

" काही नाही. अधिक रोज अलार्म लावतो ना. त्यामुळे डोके दुखत आहे. " पाखी म्हणाली.

" मॅडम , मी परवाच ईरावर एक कथा वाचली होती. अलार्म से अफेअर तक. " दीपिका म्हणाली.

" हो का. कुणाची ?" पाखी म्हणाली.

" रसिका मॅडमची. तुम्हाला माहित आहे ना त्या नेहमी सत्य घटनेवर आधारित कथा लिहितात. " दीपिका म्हणाली.

" मला सांग ना स्टोरीलाईन. " पाखी म्हणाली.

" पण मला जेवण बनवायचे आहे. " दीपिका म्हणाली.

" मी झोमॅटोवरून ऑर्डर करेल. तू स्टोरी सांग. " पाखी म्हणाली.

" ठीक आहे. त्यात नायक रोज सकाळचे अलार्म लावत असतो. बायकोला वाटते की घाईघाईत तो त्याच्या ऑफीसला जातोय पण तो ऑफिसला जात नसतो. " दीपिका म्हणाली.

" मग ?" पाखी म्हणाली.

" त्या टवळीला भेटायला जात असतो. " दीपिका म्हणाली.

" बापरे. " पाखी म्हणाली.

दीपिकाने पूर्ण कथानक सांगितले.

***

रात्री अधिक घरी आला. पाखी आणि अधिक डिनर करायला बसले.

" अधिक , तू आधी तर इतक्या लवकर जात नव्हतास ऑफीसला ?" पाखी म्हणाली.

" हो. नवीन बॉसने लवकर यायला सांगितले आहे. स्पेशल प्रोजेक्ट आहे. " अधिक म्हणाला.

" हा नवीन व्यक्ती बॉस आहे की बॉसिन ?" पाखी म्हणाली.

" बॉसिन ?" अधिक म्हणाला.

" म्हणजे जेन्ट्स की लेडीज ?" पाखी म्हणाली.

" लेडी बॉस. मिस कोमोलिका. " अधिक म्हणाला.

" नाव तर अगदी खलनायिकेसारखे. " पाखी मनातल्या मनात म्हणाली.

" तुला सांगतो पाखी , त्या मॅडमचे व्यक्तिमत्त्व खूप छान आहे. सॉफ्ट स्पोकन , वेल मॅनर्ड. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात. " अधिक म्हणाला.

" लग्नाला इतके दिवस झाले पण माझे कधी इतके कौतुक केलं नाही. " पाखी मनातल्या मनात म्हणाली.

" काय झाले ? जेवण कर ना. " अधिक म्हणाला.

" नाही. माझे पोट भरले. " पाखी म्हणाली.

" ओके. माझेही झाले. चल लवकर झोपतो. म्हणजे उद्या सकाळी लवकर उठता येईल. " अधिक म्हणाला.

" लवकर उठून नक्कीच त्याला टवळीला भेटायला जाणार असेल. या लोकांना जीवनसाथी डॉट कॉम वर जोडीदार मिळत नसतील का ? लग्न झालेल्या मुलांना का जाळ्यात ओढतात. " पाखी मनातल्या मनात म्हणाली.

" ओय पाखू !" अधिक म्हणाला.

" काय झाले ?" पाखी म्हणाली.

" कुठे हरवली आहेस ?" अधिक म्हणाला.

" कुठे नाही. ते अनुपमा सिरीयलमध्ये अनुज अनुपमाला सोडून मायाच्या नादाला लागलाय. त्याचा विचार करत आहे. " पाखी म्हणाली.

" लागणारच ना. अनुपमा किती रडकी ! एकच साडी दहा-दहा दिवस घालते. याउलट माया किती स्टायलिश राहते. चल मी झोपतो. तू तुझे डेली सोप बघून ये. " अधिक म्हणाला.

थोड्या वेळाने सिरियल्स बघून पाखी बेडरूममध्ये गेली. अधिक झोपी गेला होता.

" हा मस्त घोरतोय. सकाळी वीस अलार्मने उठत नाही मग आता काय उठेल. हीच वेळ आहे. " पाखी म्हणाली.

पाखीने अधिकच्या पॅन्टचे खिशे तपासले. मग शर्ट तपासला.

" हा दाग लिपस्टिकचा तर नसेल ? अरे नाही. परवा मीच चहा सांडला होता. " पाखी म्हणाली.

पाखीने खूप शोधूनही तिच्या हाती काहीच लागले नाही. अधिक झोपीत काहीतरी बडबडत होता. पाखी लगेच अधिकजवळ गेली.

" नक्कीच त्या मुलीचे नाव घेत असेल. " पाखी म्हणाली.

" दीपिका.." अधिक म्हणाला.

" बापरे ! काघेत कळसा नि गावाला वळसा. याचे तर चक्क दीपिकासोबत म्हणजे कामवाली बाईसोबत अफेअर आहे. दीपिका , मी तुला कधीच कामवाली समजले नाही. तुला लहान सॉरी मोठ्या बहिणीसारखे मानले. तू अशी परतफेड केलीस. " पाखी रडत म्हणाली.

" दीपिका पादूकोन , तू रणवीरसोबत लग्न का केलं ? माझे किती प्रेम होते तुझ्यावर. रणवीरसोबत लग्न केले ते केले त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तू दुसऱ्यांना डेट करत होतीस ? डेट केले तर केले पण त्या करन जौहरसमोर सांगण्याची काय गरज होती ? त्या करण्याला तर सवयच आहे भांडणे लावून द्यायची. " अधिक म्हणाला.

" हुश्श. हा दीपिका पादुकोणबद्दल बोलतोय. मी पण झोपते आता. बाकीचे मिशन उद्या पूर्ण करते. " पाखी म्हणाली.

पाखी झोपी गेली.

***

सकाळी नेहमीप्रमाणेच अधिक लवकर ऑफिसला गेला. पण त्याची एक महत्वाची फाईल तो घरीच विसरून गेला. पाखी ती फाईल घेऊन ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये कुणीच नव्हते. फक्त एक व्यक्ती सफाई करत होता.

" कोण पाहिजे मॅडम ?" तो स्टाफ म्हणाला.

" अधिक. तो एक महत्वाची फाईल घरी विसरून गेलाय. त्याचा फोन लागत नव्हता म्हणून मीच ती फाईल घेऊन आले. " पाखी म्हणाली.

" अधिकसर तर.." स्टाफ म्हणाला.

" काय झाले ? आणि ऑफिसमध्ये कुणीच कसे नाही. " पाखी म्हणाली.

" ऑफिस अकराला सुरू होते. आता तर नऊच वाजले आहेत. " स्टाफ म्हणाला.

" पण अधिक म्हणाला की स्पेशल प्रोजेक्टवर काम सुरू आहे. त्यामुळे सर्वजण लवकर येतात कामाला."
पाखी म्हणाली.

" तुम्ही मला फाईल द्या. मी देतो सरांना. " स्टाफ म्हणाला.

" नाही. मी देते. मी खूपदा सिरीयलमध्ये बघितले आहे. स्टाफ फाईल्सची अदलाबदल करतात आणि हिरोची नोकरी जाते. " पाखी म्हणाली.

" हे बघा , प्लिज समजून घ्या. " स्टाफ म्हणाला.

" अधिक.. अधिक.." पाखी हाका मारत म्हणाली.

पाखी अधिकला शोधत शोधत बॉसच्या केबिनजवळ पोहोचली. तिथे अधिक आणि नवीन बॉस कोमोलिका एकमेकांच्या मिठीत होते.

" तुझ्या बायकोला संशय येत नाही का ?" कोमोलिकाने विचारले.

" तिला सिरियल्स बघण्यापासून फुरसत मिळाली तरच संशय येईल ना. आज तिला सबस्क्रिप्शन देतो भरून. म्हणजे ती वेबसिरीज बघण्यात बिझी आणि आपण आपल्या रोमान्समध्ये बिझी. " अधिक म्हणाला.

" अधिक.." पाखी म्हणाली.

" पाखी तू इथे ?" अधिक आश्चर्यचकित होऊन म्हणाला.

" अधिक , माझ्या पप्पांनी तुला हुंड्यात बुलेट , लॉकेट , अंगठी दिली होती तरी तू मला फसवलं. " पाखी म्हणाली.

" हुंडा ?" कोमोलिका म्हणाली.

" हुंडा नाही. पप्पांनी गिफ्ट म्हणून दिले. हुंड्यात तर तुझे टॅनट्रम आलेत पाखी. " अधिक म्हणाला.

" काय ? लग्नाला अजून एक वर्षही झाले नाही आणि तुला मी नकोशी झाले. " पाखी म्हणाली.

" हो. तुला जेवायला तर बनवता येते का ?" अधिक म्हणाला.

" तुला मॅगी कोण बनवून देते ?" पाखी म्हणाली.

" फक्त मॅगी. अजून काय येते ?" अधिक म्हणाला.

" तुला रोज बॉर्निटा घालून दूध पण देते ना. " पाखी म्हणाली.

" कमऑन पाखी , तुला साधं जेवण बनवता येत नाही. " अधिक म्हणाला.

" बायको काही जेवण बनवणारी मशीन असते का ?"
पाखी म्हणाली.

" ठीक आहे. आता मी पण तुला पैसे देणार नाही. " अधिक म्हणाला.

" का ?" पाखी म्हणाली.

" नवरा काय पैसे देणारा एटीएम मशीन असतो का ? त्या दीपिकाला चविष्ट जेवण बनवता येत नाही. तरी खावे लागते. मलाही वाटते बायकोच्या हातचे जेवण करावे. " अधिक म्हणाला.

" मग ही बॉस काय तुला जेवायला देते ?" पाखी म्हणाली.

" हो. मी रोज टिफिन आणते अधिकसाठी. " कोमोलिका म्हणाली.

" दॅटस व्हाय शी इज माय फेव्हरेट. " अधिक कोमोलिकाला जवळ खेचत म्हणाला.

" तुझ्या पप्पांचे गिफ्ट्स अधिक रिटर्न करेल. मी अधिकला नवीन बुलेट घेऊन देईल. " कोमोलिका म्हणाली.

" अधिक , मी तुला अक्षराचा नैतिक समजायचे पण तू तर अनुपमाचा वनराज निघालास. " पाखी रडत म्हणाली.

" पाखी , घरी जाऊन रड. आम्हाला एकांत हवा आहे. " अधिक म्हणाला.

" प्लिज , यु कॅन लिव. " कोमोलिका म्हणाली.

" सटवी , मी तुला सोडणार नाही. " पाखी म्हणाली.

पाखी अधिकच्या बॉसचे केस धरून तिला मारू लागली.

" पाखी सोड. पाखी सोड." अधिक म्हणाला.

***

" पाखी सोड. पाखी सोड." अधिक म्हणाला.

पाखी भानावर आली.

" पाखी , मी हॉलमध्ये झोपतो. जगातली कोणती बायको झोपेत नवऱ्याला मारते. " अधिक म्हणाला.

अधिक हॉलमध्ये झोपायला निघून गेला.

दुसऱ्या दिवशी रात्री अधिक घरी आला. तो खूप आनंदी वाटत होता.

" आज खूप खुश वाटतोय. " पाखी म्हणाली.

" आज मॅडमने माझे खूप कौतुक केले. तुला माहिती आहे का त्यांच्या लहान भावाचे नावही " अधिक " आहे. त्या म्हणाल्या माझ्यात त्यांना त्यांचा लहान भाऊ दिसतो. " अधिक म्हणाला.

हे ऐकून पाखीचा जीव भांड्यात पडला.

" पाखू , पटकन जेवण कर. आपण बाहेर आइस्क्रीम खायला जाऊ. " अधिक म्हणाला.

" ओके. " पाखी म्हणाली.

दोघेही जेवण केल्यानंतर बाहेर आईस्क्रीम खायला गेले.

" काल कोणते स्वप्न पडले होते ?" अधिक म्हणाला.

" कुणीतरी माझ्या क्युट हजबन्डला माझ्यापासून दूर करत होते. " पाखी म्हणाली.

" बापरे ! कुणाची झाली एवढी हिंमत ? इतक्या क्युट बायकोला कोण सोडून जाईल ?" अधिक पाखीला मिठीत घेत म्हणाला.

पाखीही अधिकच्या घट्ट मिठीत विसावली. अधिकने आपले ओठ पाखीच्या कपाळावर टेकवले.

समाप्त


🎭 Series Post

View all