आळशी राजा आणि मुजोर शिपाई

आजच्या परिस्थितीत चपखल बसणारी अप्रतिम बालकथा
एक घनदाट जंगल होत. अतिशय हिरवागार असलेल्या त्या जंगलात सगळे प्राणी आणि पक्षी आनंदात रहात असत. सगळ्यांना पुरेस विपूल अन्नधान्य त्या जंगलात होतं.

त्या जंगलात दोन गोष्टींचा प्रॉब्लेम होता. एक म्हणजे त्या जंगलाचा राजा अतिशय आळशी असा एक सिंह होता. त्याने एका वाघाला आणि एका चित्त्याला मंत्री म्हणून नेमलेले होते. सिंह एव्हढा आळशी होता की त्याला शिकार करण्याचा देखील कंटाळा येत असे. त्याचे मंत्रीच त्याच्यासाठी शिकार करून आणत आणि सिंह बसल्या जागी आयती शिकार खात असे.  सगळ्या जबाबदाऱ्या मंत्र्यांवर सोपवून तो जास्तच आळशी होऊन गेला होता. त्या मूळे तो नावाला राजा राहिलेला होता. खरा राज्यकारभार मंत्रीच सांभाळत असत. सगळे निर्णय तेचं घेत. राजा नावाला उरलेला होता. त्यालाही कोणतीच जबाबदारी नको असायची त्या मुळे तोही मनातून खूष होता. पण हे प्रकारे जंगलराज ठरणार होतं याची त्याला कल्पना नव्हती.

दुसरी एक उणीव अशी होती की पाण्याचे जलाशय जंगलाच्या मध्यभागी असतात. पण या जंगलात पिण्याचा पाण्याचा जलाशय मात्र थोडा जंगला बाहेर होता. राजा आणि त्याचे मंत्री सोडून सगळे प्राण्यांना त्या जंगलाबाहेरच्या जलाशयावर पाणी प्यायला जावे लागत असे. कारण राजा आणि त्याचे मंत्री यांचे खाजगी जलाशय होते. ते जलाशय त्यांच्या घराजवळ होते.त्यातल्या पाण्याचा वापर फक्त राजघराण्यातील व्यक्तीचं करत असतं. बाकीचे सगळे प्राणी पाणी प्यायला जंगला बाहेर जात.

कित्येक वर्ष या गोष्टी बिनबोभाट सुरू होत्या. एक दिवस जलाशयावर एक नीलगाय पाणी प्यायला गेली. ती परत आलीच नाही. तिचं सगळ घर उध्वस्त होवून गेलं. गाय कुठं नाहीशी झाली. कोणालाच समजल नाही. तिच्या बाळाने राजा जवळ तक्रार केली. राजाने मंत्र्यांना चौकशी करायचे आदेश दिले. मंत्र्यांनी त्यांच्या हाताखालच्या लांडगे आणि कोल्हे यांना चौकशीचे आदेश दिले. कित्येक दिवस झाले पण चौकशी पूर्ण झालीच नाही.

त्या नंतर एक दिवस हरणांचा एक कळप आपल्या परिवारासकट जलाशयावर पाणी प्यायला गेला होता तेंव्हा सगळयांच्या डोळ्यादेखत एका हरिणीला पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने ओढत नेलं आणि तिची सगळयांच्या समोर राजरोस शिकार केली गेली. सगळा कळप हतबल होवून बघत बसला. या घटनेने सगळया जंगलात आक्रोश पसरला. त्या सोबतच दहशत देखील पसरली. निषेधाच्या अनेक सभा झाल्या. जंगलात आता कोणीच प्राणी सुरक्षीत राहिलेला नव्हता. कोणालाच पुढच्या क्षणी काय होईल याची शाश्वती नव्हती. हे प्राणी कोठून आले, कधी आले होते होते हे कोणालाच माहिती नव्हत.बरेच दिवस कोणी जलाशया कडे फिरकल नाही. पण असं घरात बसून चालणार नव्हत. प्रश्न पाण्याचा होता. पाणी नसणं म्हणजे जीवन नसण्या सारखं होतं. काहीतरी करणं आवश्यक होतं. मग सगळ्यांनी तातडीची बैठक घेऊन आपल्या राजाला निवेदन द्यायचं ठरवलं.

सगळे प्राणी त्या आळशी सिंहाला निवेदन दिले. सिंहाने ते वाचल्यावर, आपल्या मंत्री मंडळा सोबत तातडीची बैठक घेतली. बराच वेळ त्यांची चर्चा सुरु होती. प्राणी बाहेर ताटकळत उभे होते. थोड्यावळाने सिंह बाहेर आला. झाल्या घटनेबाबत त्याने तीव्र दिलगिरी व्यक्त केली. जंगला बाहेर जलाशयात घुसखोरी करून आलेल्या मगरींचा त्याने निषेध व्यक्त केला. परंतू त्याच बरोबर आपण किंवा आपले मंत्री मंडळ या नव्या शत्रूंचा सामना करण्या बाबत असमर्थ असल्या बाबत खेद व्यक्त केला. सगळे प्राणी निराश झाले. परंतू राजा म्हणाला,

" काळजी करू नका. आपण सगळे जण नीट विचार विनिमय करून या संकटामधून मार्ग काढू या. त्या साठी मी एका कमिटीची स्थापना करतो "

खरोखरच त्याने एक कमिटीची स्थापना केली. कमिटी मध्ये एका लांडग्याचा देखील समावेश होता. त्या लांडग्याने अहवाल सादर केला.आणि एक पाणी बचाव योजना सादर केली.

"सगळया प्राण्यांनी मिळून जंगलाच्या मध्यभागी सुरक्षित ठिकाणी एक तलाव निर्माण करावा. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले होते. त्या मुळे पावसाचे पाणी त्या तलावात साचेल आणि प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून जाईल. "

सिंहाला ती योजना खुपचं पसंत पडली. त्याने त्या लांडग्यालाच त्या तलावाचे प्रमूख बनवून, ईतर सर्व प्राण्यांना त्याला मदत करायला सांगीतले. तशी ती योजना सगळ्यांनाचं पसंत पडली होती म्हणून सगळ्या प्राण्यांनी यथाशक्ति खड्डा बनवायला मदत केली. अगदी मुंग्यांपासून हत्तीपर्यंत सगळे एकजुटीने कामाला लागले आणि बघता बघता पावसाळ्याच्या आधीच एक भलामोठा तलाव तयार झाला.

सुदैवाने त्या वर्षी पाऊसही भरपुर झाला आणि बघता बघता तलाव पाण्याने पूर्ण भरला. सगळ्या प्राण्यांमध्ये आनंदाचा एक जल्लोष पसरला. एकजुटीचे सामर्थ्य सगळ्यांनाच समजले.

पण हा त्यांचा आनंद काही दिवसच टिकला. एक दिवस पाणी प्यायला गेलेल्या हत्तीला त्या लांडग्याने पाणी पिण्यापासून अडवले आणि मग्रुरीने म्हणाला,

" जर तुला पाणी प्यायचे असेल तर मला त्या आधी काहितरी जकात द्यावी लागेल. हे तळ माझं आहे. समजल का ."

हत्ती बिचारा गांगरला. सिंहाची याला संमती असेल असं समजून त्याने अनेक फळं त्याला जकात म्हणून दिली. हत्तीसारखा प्राणी न बोलता जकात देतो म्हटल्यावर ईतर प्राण्यांची काय बिशाद. सगळे जण अगदी काही ना काही देउन पाणी प्यायला लागले.  पाणी हा काही एका वेळेचा प्रश्न नव्हता. रोजचीच गरज होती ती. पण रोजच्या रोज आपल्या रोजच्या कमाईतून जकात देणं प्रत्येकालाचं अवघड होऊन बसलं होतं. जकात नाही तर पाणी नाही. बरं जंगला बाहेर पाणी प्यायला जावं तर जीवाचा धोका. सगळे प्राणी हवालदिल होऊन गेले.

जगणच अवघड होऊन गेलं होत. जंगला बाहेर जीव निदान एकदाचं जात असता पण हे जगणं रोजच्या मरण्या समान होऊन गेलं होतं. आताचा प्रश्न तर अगोदर पेक्षाही अवघड झालेला होता. ज्यांच्या जवळ द्यायला काहीच नव्हत त्यांच्यावर तर तहानेने व्याकुळ होऊन मरण्याचीच वेळ आली होती.

पुन्हा एकदा प्राण्यांच्या सभा व्हायला लागल्या. यातून काही तरी मार्ग निघायला हवा होता. पुन्हा एकदा सगळ्यांनी त्यांच्या राजाला निवेदन द्यायचं ठरवलं.  आणि ते राजा कडे आले.

आता पर्यंत राजाला सगळ्या राज्यात ऑल बेल असल्यासारखं वाटत होतं. पण जेंव्हा त्याच्या समोर ही हकीगत आली. तेंव्हा तो खडबडून जागा झाला. त्याने पुन्हा आपल्या मंत्र्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या वेळी वाघ आणि चित्ता दोघांनी मुळापासून चौकशी केली. तेंव्हा त्यांना लांडग्याची लबाडी लक्षात आली.

त्यांनी त्याच्या विरुद्ध सज्जड पुरावे जमा केले. सिंहासमोर खटला भरवण्यात आला. बरेचं दिवस खटल्याचे कामकाज सुरू होते. अखेर सत्याचा विजय झाला. लबाड लांडग्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. घुसखोरां वरही कारवाई करण्यात आली. त्या साठी नव्या दमाची सैन्य भरती केली गेली. सगळया प्राण्यांना अन्न आणि निवारा या मूलभूत गरजा मोफत उपलब्ध करुन दिल्या गेल्या. तेंव्हा पासून जंगलात सर्व प्राणी आनंदात एकजुटीने राहायला लागले.

तात्पर्य: राजाने नेहमी सावध राहायला हवे. बाहेरच्या घुसखोरांवर वेळीच प्रतिबंध घालायला हवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे थोडी सत्ता हातात आल्यावर लांडग्या सारखी मुजोरी करु नये. आणि दुसर म्हणजे अन्याया विरूद्ध दाद मागायला अजीबात घाबरु नये.