Login

अल्बम.. भाग 1

While drinking tea with a friend in the Manas canteen for about a week , he saw a dark eyed girl

          पुरूषोत्तम करंडकसाठी तयारी सुरू झाली होती. पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा तर सर्वात मानाची स्पर्धा . गेल्या 6 वर्षात आमचं कॉलेज Top 9 मध्ये आलंच नव्हतं. यावेळी करंडक आपल्या कडे आलाच पाहिजे ही  दरवर्षीची जिद्द सुरू झाली. पहिल्यांदाच कॉलेजची एकांकिका मानसने लिहीली होती व दिग्दर्शनाची जबाबदारी देखील कॉलेजने त्याच्यावरच सोपवली. एकांकिका त्याने दिवशी त्याने एकांकिकेच्या ग्रुपला वाचून दाखवली. प्रत्येकाला मानसचं लेखन आवडलं होतं. आता महाविद्यालयात शोध सुरू होता एकांकिकेतील पात्रं सहज जिवंत करू शकतील अशा कलाकारांचा. खरं तर दोनच पात्रे होती. ती आणि तो ही पात्रांची नावं. मानसने नायक साकारायचं ठरवलं. म्हणजे तिहेरी भूमिका तो साकारणार होता. लेखन , दिग्दर्शन , अभिनय.. तिन्ही भूमिकांना न्याय द्यायचा होता पण  मानस व त्याचा ग्रुप नायिकेच्या शोधात होता. त्यांचे सिनीयर्स आठवड्यातून त्यांच्या कामात नाक खूपसून जायचे. काही जणी अभिनयासाठी मानसला भेटल्या पण मानसला एकही मुलगी पात्राला न्याय देईल असं जाणवलंच नाही. करंडक 2 महिन्यांवर होता . सगळे अख्खं कॉलेज पालथं घालत होते . एकदा तर मानस कट्ट्यावर बसून मुलींना पाहत होता. कुठली मुलगी पात्राला न्याय देईल याचा शोध  त्याचा 24 तास सुरूच होता. मानससह 18 जणं मुलीचा शोध घेत होते. Cultural room शी ज्या मुलींचा संबंध होता त्या मुली भूमिकेला न्याय देतील असं त्याला वाटत नव्हतं. काय करावं ? कसं होईल एकांकिकेचं ? नकारात्मक विचार डोक्यात येत चालले होते. कदाचित यावेळी देखील आपण पुरूषोत्तम जिंकू शकणार नाही असं ग्रुपला भासू लागलं .

        साधारण आठवड्याभराने मानस canteen मध्ये मित्रासोबत चहा पित असताना त्याला एक घाऱ्या डोळ्यांची मुलगी नजरेत पडली. बुटकी होती. दोन वेण्या बांधलेली. पंजाबी ड्रेस घातलेली. चेहरा सावळा होता पण डोळ्यातलं तेज त्या सावळेपणाला झाकत होतं. कपाळावरची ती मध्यम आकाराची गोल टिकली. डोळ्यावर मोठा चष्मा. गालावर एक तीळ . आजच्या जमान्यात अशा मुली दिसणं दुर्मिळच.. मानसला तर या दुर्मिळ गोष्टीची गरज होती. त्याच्या एकांकिकेसाठी हे माझं रॉ मटेरियल होतं. ती एकटीच चहा पित बाजूच्या टेबलवर होती. मानस तिच्याकडे बघतोय हे तिला जाणवलं. ती थोडी हडबडली. तिने नजर चोरत चहा कसाबसा संपवला. पैसे देऊन ती पटापट पावलं टाकत बाहेर निघून गेली... त्यानेही पटकन चहा संपवला व तिच्यामागे जाऊ लागला. ती सायकलवर बसायला जात होती. त्याने तिला पाहिलं. तो तिच्याकडे पटापट चालत येत होता. त्याने लगेच तिला हाक मारून थांबवलं. ती स्वत:चा चष्मा सावरत थांबली.

तो – हाय ! मी मानस . मानस मोहीते. माझं तुझ्याकडे एक काम आहे.

ती क्षणभर तशीच त्याला पाहत राहीली.

तो – hello...

ती – अं.

तो – माझं एक काम होतं तुझ्याकडे.

ती – हा. बोल ना.

एवढ्यात तिने तिची ओढणी सावरली.

तो – अं. मी आपल्या कॉलेजची एकांकिका बसवतोय . मीच लिहीली आहे . प्रेमकथा आहे. वास्तविक आहे story. त्यातली जे पात्र आहे तिला तू न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. खूप मुलींना त्या रोलसाठी बघितलं पण त्या भूमिकेला न्याय देतील असं मला वाटलं नाही. तुला आता मगाशी बघितलं आणि तूच ही भूमिका साकारशील असं मला वाटतंय. तू करशील का काम ?

ती – मी यापूर्वी एकांकिका वगैरे नाही काही केलंय. मला ते जमणारच नाही.

तो – तुला जमणारच नाही असं कोणी सांगितलं तुला ?

ती – मला माहीत आहे ना .. माझ्यात नाहीये अभिनयाचं talent .

तो – मी आहे ना. मी शिकवेन तुला. प्लीज. आम्हाला गरज आहे तुझी. स्पेशली मला.

ती – किती दिवस आणि किती वेळ करावं लागेल हे ?

तो – म्हणजे तू तयार आहेस ?

ती – मी विचारलंय त्याचं उत्तर तर दे.

तो – अजून दोन महिने तुला काम करावं लागेल सकाळी 9 ला तालिम सुरू होईल. रात्री 10 ला संपेल. कॉलेज जेवणाचा खर्च करेल.

ती – घरी विचारावं लागेल..

तो – ओके. कधीपर्यंत सांगशील ?

ती – तुझा नंबर दे. सांगते रात्री .

तो – ओके.

मानसने तिला नंबर दिला. तिने त्या जुन्या बटणांच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केला.

ती – मी कळवते रात्री. कॉल करते.

तिने पुन्हा ओढणी सावरली. ती सायकलवर बसून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा राहीला. त्याला हवी तशी मुलगी मिळाली होती. आता तिच्या उत्तरची तो वाट पाहत होता.

क्रमशः 

लेखन - पूर्णानंद मेहेंदळे  

🎭 Series Post

View all