Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २६

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २६"

अभिमन्यूने, वैदहिला जी चिठ्ठी भेटली होती ती बघितल्यावर त्याचा पारा खूप चढलेला असतो. ती चिठ्ठी त्याने दिलेली नव्हती असे त्याच्या लक्षात येते. त्याले असे वाटते ही चिठ्ठी घरातच कोणीतरी बदलली आहे. म्हणून याचा जाब घरातल्यांना विचारण्यासाठी जातो.

अभिमन्यू असे रागात बाहेर जाताना बघून वैदही पण त्याच्या पाठीमागे जाते.

सर्वजण खाली हॉल मध्ये बसलेले असतात. अभिमन्यू "आई...आई..." असे रागाने बोलत खाली येतो. त्याला असे बघून देवकीला काळजी वाटते की "काय झाले आहे?" अभिमन्यू आणि वैदही दोघेही खाली आलेले असतात.

"आई, मी लग्नाच्या अगोदर वैदहिला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात माझा भूतकाळ होता. पण ती चिठ्ठी वैदहिला भेटलीच नाही. ती चिठ्ठी गेली कुठे?" अभिमन्यू रागात बोलतो.

"अभी, तू हे आम्हाला का विचारतोय?" देवकी बोलते.

"कारण आई मला खात्री आहे की, माझी चिठ्ठी बाहेरचा बदलू शकत नाही. बाहेरच्या कोणाला या सगळ्यांशी काय करायचे आहे!" अभिमन्यू बोलतो.

"अभी, ती चिठ्ठी घरातील कोणीच बदललेली नाहीये." देवकी बोलते.

"आई, ज्याने कोणी ती चिठ्ठी बदलली आहे ना; त्याने फार चुकीचे केले आहे. या बिचाऱ्या मुलीच्या आयुष्याशी का खेळला तुम्ही! काय बिघडवलं होतं तिने तुमचे." अभिमन्यू बोलतो.

"अभी, आम्ही कोणीही असे काहीही केले नाही. वाटलं तर तू समीरला विचार." देवकी बोलते.

"इथेच स्पष्ट झाले की आई. मी चिठ्ठी समीरकडे दिली होती, हे तुम्हांला कसे माहित?" अभिमन्यू बोलतो.

"अभी, समीरला तू चिठ्ठी दिल्यानंतर तो भाऊजींना भेटला. भाऊजीने वाटले जर तुझे लग्न होऊन द्यायचे असेल तर ही चिठ्ठी वैदहीला भेटली नाही पाहिजे. पण मी त्यांना सांगितले, असे करणे चुकीचे आहे. आपल्याला असे नाही करायचे. मग मी स्वतः तू दिलेली चिठ्ठीच समीरला, वैदहिला द्यायला सांगितली." देवकी बोलते.

अभिमन्यू लगेच समीरला कॉल करतो.

"समीर, मी दिलेली चिठ्ठी तू वैदहिला दिली होती?" अभिमन्यू फोनवर बोलतो.

"हो, दिली होती. खरं सांगू का अभी, मला वाटले होते तुझे लग्न होण्यासाठी चिठ्ठी बदलावी पण काकूंनी मला सांगितले होते चिठ्ठी बदलायची नाही. मग मी सरळ वैदही वहिनींना चिठ्ठी नेऊन दिली." समीर बोलतो.

अभिमन्यू लगेच कॉल कट करतो.

"वैदही समीरने तुला चिठ्ठी दिली आणि लगेच तू वाचली होती का?" देवकी, वैदहिला विचारते.

"आई, मी लगेच नव्हती वाचली. मी आश्रमात काम करत होते मग मी एका मुलाला ऑफिस मध्ये ठेवायला सांगितली होती." वैदही बोलते.

"आत्ता त्या मुलाला आपल्याला विचारता येईल का, त्याने चिठ्ठी कुठे ठेवली होती?" आबासाहेब बोलतात.

वैदही लगेच आश्रमात कॉल करून माहिती काढते. माहिती मिळाल्यावर वैदहीच्या चेहऱ्यावर निराशा दिसते.

"काय झाले वैदही? तो मुलगा काय म्हटला? देवकी बोलते.

"आई, तो म्हटला का त्याने माझ्या बॅगेत ठेवली पण त्यादिवशी मी बॅग नेलीच नव्हती." वैदही बोलते.

"अजून तुझ्या सोबत कोण होते? ती बॅग त्या व्यक्तीची असेल तर." आबासाहेब बोलतात.

वैदहिला लगेच आठवते की त्या दिवशी शुभांगी आश्रमात होती. जेव्हा ती शुभांगीला घेऊन गेली होती तेव्हा शुभांगीच चिठ्ठीच वाचत होती. तिथे शुभांगीची बॅग पण होती. वैदही लगेच फोनवर चिठ्ठीचा फोटो शुभांगीला पाठवते आणि तिला कॉल करते.

"हॅलो, शुभांगी मी तुला एका चिठ्ठीचा फोटो पाठवला आहे तो बघून मला सांग ती चिठ्ठी तुझी आहे का? वैदही, फोनवर शुभांगीला बोलते.

"अरे हो वैदही. ही चिठ्ठी माझीच आहे. पण मग तुझ्याकडे कशी आली." शुभांगी बोलते.

"ते सांगते तुला नंतर, अगोदर मला सांग तुझ्या बॅगेत कोणती चिठ्ठी होती का?" वैदही बोलते.

"हो होतीना. यांनी मला दिली होती पण काय झाले माहीत का आश्रमात मी चिठ्ठी वाचत असताना तू मला घेऊन गेली नंतर माझ्या कामावर असताना मी चिठ्ठी वाचायला काढली आणि मला आमच्या मॅनेजरने बोलवले. मी ती चिठ्ठी तशीच डेस्कवरवर ठेवली. मग ती तिथून गहाळ झाली. एक मिनिट माझी चिठ्ठी तुझ्याकडे आहे तर माझ्याकडून जी गहाळ झाली ती कोणाची होती?" शुभांगी बोलते.

"मी तुला नंतर कॉल करते." असे बोलून वैदही कॉल कट करते.

वैदहीच्या सर्व लक्षात आले होते.

"काय झाले वैदही? तुझी मैत्रीण काय म्हटली? देवकी बोलते.

वैदही, देवकीला आणि घरातील सर्वांना सगळा प्रकार सांगते.
ते ऐकल्यानंतर अभिमन्यूही शांत होतो.

देवकी, वैदहिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. वैदही बाहेरून शांत होती पण तिच्या मनात प्रश्नाचे वादळ होते. माझ्याच बरोबर असे का झाले असा प्रश्न तिला पडलेला असतो?....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all