Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३७

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३७"

मालतीने अभिमन्यूच्या मनात संभ्रम निर्माण करून दिला होता त्याला असे वाटत होते की वैदहीनेच त्याला फार्महाऊसवर आणले होते. हा विषय अभिमन्यूने बोलता बोलताच बंद केलेला असतो.

वैदहिला मात्र प्रश्न पडले होते की,
"अभिमन्यू कोणत्या सुखाबद्दल बोलत होते?"
"अभिमन्यू कोणत्या प्लॅनबद्दल बोलत असतील?"

वैदहिला राहवत नाही म्हणून पुन्हा अभिमन्यूला विचारते, "अभिमन्यू तुम्ही कशाबद्दल विचारत होता? मी कोणता प्लॅन केला आहे?"

"आपण इथे फार्महाऊसवर यावे हा तुझाच प्लॅन होताना!" अभिमन्यू बोलतो.

"नाही अभिमन्यू, मी असा कोणताही प्लॅन बनवला नाही. मलाही तुमच्यासारखे इथे आल्यावरच कळले आहे." वैदही बोलते.

"मग तू मालती वहिनीकडे दोन दिवसांसाठी फार्महाऊस पाहिजे असे का बोलली?" अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू मी वहिनींना असे काहीच बोलले नाही!" वैदही बोलते.

"वहिनी माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनीच मला सांगितले की तू त्यांना दोन दिवसांसाठी फार्महाऊस भेटेल का असे विचारले होते." अभिमन्यू बोलतो.

"मी असे वहिनींना काहीच विचारले नव्हते. त्या खोटे बोलत आहे. मला तुम्हांला घेऊन फार्महाऊसवर जायचे असते तर माझ्या बाबांचे कितीतरी भारी फार्महाऊस आहे. मी वहिनींना का विचारेल!" वैदही बोलते.

"मग वहिनीने मला खोटे का सांगितले असेल!" अभिमन्यू बोलतो.

"मी खरंच सांगते अभिमन्यू मला यातले काहीही माहित नव्हते. मलाही माहित असते तर आई अस का बोलल्या असत्या तुम्हा दोघांसाठी सरप्राइज आहे. त्यांनी फक्त तुम्हाला सांगितले असते." वैदही बोलते.

अभिमन्यू सत्य जाणून घेण्यासाठी मालतीला फोन करतो.
कॉल स्पीकर वर असतो.

"हॅलो वहिनी तुम्ही बोलला होता की वैदहिने फार्महाऊसचा प्लॅन केला आहे पण ती मला हॉटेलवर घेऊन आली आहे. तुम्ही काही चुकीचे तर नव्हते ऐकले?" अभिमन्यू फोनवर मालतीला फोनवर बोलतो.

"भाऊजी मी तुम्हांला फार्महाऊस म्हटले का! माझीच चूक झाली मग वैदही मला हॉटेलच बोलली होती." मालती बोलते.

"पण वहिनी आम्ही फार्महाऊसवरच आलो आहोत." अभिमन्यू बोलतो.

"हम... भाऊजी ते..." मालती बोलत असते तोच अभिमन्यू कॉल कट करतो.

"अभिमन्यू तुम्हांला इथे आलेले आवडले नसेल तर आपण जाऊया इथून." फोन ठेवल्यावर वैदही अभिमन्यूला बोलते.

"राहू आपण इथे. घरातल्या पेक्षा इथं जरा शांत वाटत आहे." अभिमन्यू बोलतो.

"तुम्हांला इथे चांगले वाटत असेल तर थांबू आपण.तुम्ही म्हणाल तसं." वैदही खुश होऊन बोलते.

अभिमन्यूने फार्महाऊसवर थांबण्याचा निर्णय घेतल्याने वैदहिला आनंद वाटत होता. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

संध्याकाळची वेळ होते. बाहेर एकदम रम्य वातावरण पसरलेले होते. आजुबाजूला झाडी, दिवस मावळतीला होता, लालसर प्रकाश पसरलेला होता, हवेमध्ये हलकसा गारवा आणि एक निवांत शांतता होती.

बाहेरचे रम्य वातावरण बघून वैदही, अभिमन्यूला बोलते, "अभिमन्यू आपण शतपावलीला जायचे का? बाहेर खूप छान वातावरण आहे."

अभिमन्यू थोडा विचार करून बोलतो, "जाऊया."

अभिमन्यू हो बोलल्यावर दोघेही तयार होऊन शतपावली करण्यासाठी जातात. दोघांचीही शतपावली सुरू असते पण अभिमन्यू शांत होता. मग वैदहीच बोलण्यासाठी नेहमीप्रमाणे पुढाकार घेते.

"अभिमन्यू तुम्हांला सांगू, मला शतपावली करायला खूप आवडते. सरस्वतीताई आणि मी नेहमी शतपावली करतो." वैदही बोलते.

"मलाही शतपावली करायला खूप आवडते. सईला देखील खूप आवडायचे शतपावली करायला." अभिमन्यू बोलतो.

"अजून काय काय आवडायचे सईला? तिचा स्वभाव कसा होता?" अभिमन्यूने काहीतरी बोलावे म्हणून वैदही त्याच्यासमोर सईचा विषय काढते.

"सईचा स्वभाव विचारशील तर तुझ्यासारखाच होता. तुझ्यासारखाच साधेपणा तिचा खरा दागिना होता. विचारही देखील तुमच्या दोघींचे सारखेच आहे." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू तुम्ही हे असे हे वागता हे बघून सईला किती त्रास झाला याचा विचार केला आहे का तुम्ही?" वैदही बोलते.

"केला आहे विचार. आणि सईला काय मलापण त्रास होतो. पण काय करावे तेच सुचत नाही." अभिमन्यू बोलतो.

"मला असे वाटते तुम्ही मित्रांमध्ये गेले पाहिजे. मैत्रीचे नाते असे आहे जिथे रक्ताचे नाते नाही चालत तिथे मैत्री चालते." वैदही बोलते.

"तुझं बरोबर आहे पण आजकाल अशी प्रामाणिक मित्र मिळणे खूप कठीण आहे. एक समीर सोडला तर माझा असा दुसरा कोणताच मित्र नाहीये." अभिमन्यू बोलतो.

"मग शोधाणा आजुबाजूला. काय सांगावे एखादा अजून चांगला मित्र किंवा मैत्रीण भेटली तर." वैदही बोलते.

"मलातरी आजुबाजूला असं कोण दिसत नाही." अभिमन्यू बोलतच असतो तोच वैदही मैत्रीसाठी हात पुढे करते.

मैत्रीसाठी हात पुढे केल्यावर वैदही बोलते, "मला आवडेल तुमची मैत्रीण व्हायला. तुमच्या सुखदुःखात सहभागी व्यायला."

वैदहिने, अभिमन्यूला मैत्रीचा हात पुढे केलेला असतो. अभिमन्यू बराच वेळ विचार करतो पण तो काही वैदहीचा हात हातात घेत नाही. शेवटी वैदही तिचा हात पुन्हा खाली घेते आणि विचार करते "किमान अभिमन्यूची मैत्री देखील माझ्या नशिबात आहे का नाही...."

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all