Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३०

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगत उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३०"

वैदहीने तिच्या मनातील अभिमन्यू बद्दलच्या भावना शुभांगीला सांगितलेल्या असतात. त्याच वेळेस प्रतापराव घरी आलेले असतात. शारदाने प्रतापरावांना सगळा प्रकार सांगितलेला असतो.

"वैदही.... वैदही...." प्रतापराव जोराजोरात वैदहिला आवाज देतात.

प्रतापरावांचा आवाज ऐकून वैदही आणि शुभांगी दोघीही खाली येतात.

"वैदही... मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी तुझे त्या घरात लग्न लावून दिले." प्रतापराव हात जोडून वैदहिला बोलतात.

"बाबा, तुमचे काही चुकले नाही. तुम्ही नका मनाला लावून घेऊ." वैदही बोलते.

"चल माझ्या बरोबर त्या पाटलांच्या घरी. त्यांना या सगळ्याचा जाब विचारला पाहिजे!" प्रतापराव बोलतात.

"बाबा आपण शांत बसून बोलू." वैदही बोलते.

"आता शांत बसण्याची वेळ गेली आहे." प्रतापराव बोलतात.

प्रतापराव असे बोलून वैदहिला घेऊन पाटलांच्या घरी जायला निघतात. शारदाही त्यांच्या मागे निघते.

इकडे पाटलांच्या घरी देवकीने आबासाहेबांना सर्व प्रकार सांगितलेला असतो. तिचे आणि शारदाचे फोनवरचे बोलणे, वैदहीचे आणि तिचे बोलणे. हे सर्व सांगितलेले असते.

पाटील घरातील सर्व जण या विषयावर बोलत असतात तेवढ्यात प्रतापराव, वैदही, शारदा तिथे येतात. प्रतापरावांचा पारा चढलेलाच असतो. "आबासाहेब" असा जोरात आवाज ते देतात.

आबासाहेब आणि पाटील घरातील सर्वजण प्रतापरावांचा आवाज ऐकून उभे राहतात.

"आबासाहेब, तुमच्या सारखा माणूस असे करेल वाटले नव्हते मला! माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती." प्रतापराव एकदम वरच्या सुरात बोलतात.

"प्रतापराव, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आपण शांत बसून बोलूया." आबासाहेब बोलतात.

"शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. आबासाहेब, मी तुम्हांला एक चांगला माणूस समजत होतो पण तुम्ही या थराला जाल असे मला वाटले नव्हते." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव, तोंड सांभाळून बोला. पाहुणे आहात म्हणून तुमचं ऐकून घेतोय. नाहीतर पाटील वाड्यात येऊन आमच्यावरच आवाज चढवण्याची कोणातही हिंमत नाहीये." यशवंतराव वरच्या सुरात बोलतात.

"यशवंता, मी आहे ना इथं. तुम्ही कोणीही काहीही बोलणार नाही." आबासाहेब बोलतात.

"वा... आबासाहेब वा... चांगलाच न्याय तुमचा! माझ्या मुलीच्या जागेवर तुमची मुलगी असतीना; तर आतापर्यंत तुम्ही त्या कुटूंबाला संपवले असते." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव तुमच्या भावना मी समजू शकतो. पण तुम्ही पण एक लक्षात घ्या, अभिने वैदहिला सर्व सत्य सांगण्यासाठी चिठ्ठी दिली होती. पण त्यात गडबड झाली. त्याला आम्हीसुद्धा काय करणार होतो! आबासाहेब बोलतात.

आबासाहेब आणि प्रतापराव यांचे बराच वेळ आरोप-प्रत्यारोप चालू राहतात आणि हे सगळे चालू असतानाच अभिमन्यू तिथे येतो.

अभिमन्यूने दारू पिलेली असते. केस विस्कटलेले, शर्टाची काही बटणे उघडी, आणि हातात दारूची बाटली. अभिमन्यूला बघताच प्रतापरावांचा संताप अजून चढतो.

"बघा, आला हा. याच्या सारखा मुलांना माझी मुलगी तिचा वारा पण लागू देणार नाही." प्रतापराव अभिमन्यूकडे इशारा करून बोलतात.

"प्रतापराव आता तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. तुम्ही आपल्यामध्ये अभिला घेऊ नका." आबासाहेब बोलतात.

"का नको घेऊ? याच्यामुळे तर झालंय सगळ! याची लायकी तरी आहे का, माझ्या मुलीच्या बाजूला उभे रहायची....
प्रतापराव असे बोलताच, वैदही त्यांचे बोलणे तोडत जोरात बोलते, "बाबा.... "

"कृपा करून तुम्ही अभिमन्यूंना काही बोलू नका. माझी विनंती आहे तुम्हांला. मी त्यांच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही." वैदही प्रतापरावांना बोलते.

"वैदही काय बोलतेय तू? तुझं डोकं जाग्यावर आहे ना!" शारदा बोलते.

"आई मी पूर्ण विचार करून बोलत आहे. झालं गेलं आपण विसरून जाऊ. कोणी काय केले, कोण चूक, कोण बरोबर जाऊद्या ते आता. आपण पुढे जाऊ आता." वैदही बोलते.

"वैदही तुला अस जबरदस्ती या बंधनात अडकण्याची गरज नाहीये. आपण मोठ्यातला मोठा वकील बघू आणि घटस्फोट घेऊ." प्रतापराव बोलतात.

"बाबा, मी काही जबरदस्ती या बंधनात अडकले नाही. मला तर अभिमन्यूंनी सगळे सांगण्याचा प्रयत्न पण केला होता. मला ते समजले नाही. यात कोणाचीही चूक नाहीये. मी माझ्या मर्जीने हे लग्न केले आहे." वैदही बोलते.

"वैदही तू हे काय बोलत आहे!" प्रतापराव बोलतात.

"बाबा माझ्यावर कोणाचेही बंधन नाहीये. मी जर वेगळे होण्याचा विचार केला तर मला कोणीही अडवणार नाही. आईंनी मला सकाळीच सांगितले की, मी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे." वैदही बोलते.

"तुला नेमके काय बोलायचे आहे वैदही? शारदा बोलते.

"आई तुम्हांला सत्य कळावे म्हणून फक्त ते सांगण्यासाठी मी आले होते. आणि राहिला प्रश्न अभिमन्यूंचा तर आता मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. मला माहित नाही मला त्यांच्या आयुष्यात काय स्थान भेटेल पण माझ्यासाठी तेच माझं सर्वस्व आहे. जोपर्यंत मृत्यू मला त्यांच्यापासून वेगळं करत नाही तोपर्यंत मी त्यांच्यापासून वेगळी होणार नाही." वैदहीच्या बोलण्यात एक विश्वास होता.

"तुझ्या डोक जागेवर नाहीये. चल घरी." असे बोलून प्रतापराव वैदहीचा हात पकडतात. पण वैदही त्यांचा हात झटकते आणि अभिमन्यूच्या बाजूला जाऊन उभी राहते.

"आई, बाबा मला आशा आहे की तुम्ही परत माझ्या घरी याल तेव्हा चांगल्या मनस्थितीत याल." वैदही बोलते.

"वैदही तू भावुक होऊन निर्णय घेत आहेस. पुढे याचा तुला पश्चाताप होईल." शारदा बोलते.

"आई मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. तुलाही माहीत आहे आई, मी कोणावरही उगाच विश्वास टाकत नाही. मला पूर्ण खात्री आहे. माझी निवड ( वैदही अभिमन्यूकडे बघते ) चुकीची नाहीये आणि याचा मला कधीही पश्चाताप होणार नाही. तुम्ही या आता आई-बाबा. खूप उशीर झाला आहे." वैदही बोलते.

शारदा आणि प्रतापराव निघून जातात.

"वैदही तुझे आई-बाबा पण चुकीचे नाही बोलले." देवकी बोलते.

"आई, हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे. माझी विनंती आहे; हा विषय परत कोणीही काढणार नाही." वैदही स्पष्टपणे बोलते.

वैदही बोलत असतानाच अभिमन्यू तोल जातो. वैदही त्याला सावरते आणि त्याला खोलीमध्ये घेऊन जात असते.

वैदही अभिमन्यूला खोलीत घेऊन जात असताना देवकीला बोलते, "आई एक दिवस तुम्हांला तुमचा मुलगा पहिल्यासारखा करून देईल, वचन देते तुम्हांला...."

असे बोलून वैदही अभिमन्यूला खोलीत घेऊन जाते...

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all