आळीमिळी गुपचिळी

The Bond Of Mommy And Her Little Queen
     "काय मग? आज एका मुलीची खूप मजा आहे. वाढदिवस ना...! आई बाबा कसे लाड करतील. भाऊ मस्त आवडत्या फ्लेवरचा केक आणेल. पण मला एक कळत नाही. पण आज तू आलीस का शाळेत? तसेही तुझ्या किरकोळ रजा किती बाकी आहेत. जान्हवी तू ना एकदम बोअर वागतेस. जरा हॅपी रहा ना." असे कल्पना तिच्या सहकारी शिक्षिका असणाऱ्या जान्हवीला बोलली.

     "अगं कल्पना असे काही नाही. आणि वाढदिवस काय दरवर्षी येतो. आत्ताच कुठे शाळा सुरू झाली आहे. त्यात तुला ठाऊक आहे ना माझ्या पिल्लूचे. ती आजारी पडली किंवा तिच्या शाळेत जावे लागले किंवा बाकी खूप गोष्टी असतात. म्हणून मी सुट्टी नाही घेत. " जान्हवीने स्पष्टीकरण देत उत्तर दिले.
  
    "घ्या. त्यात काय एवढे! अगं पिल्लूला तुझी आई आणि वहिनी आहे ना तुझी सांभाळायला. तरी तू तिला पाळणाघरात ठेवत आहेस. मी भेटले आहे तुझ्या बाळाला अतिशय गुणाचं आहे. काही कुणाला त्रास देत नाही. तुला असे थोडीच आहे की सासूचा जाच कि नवर्‍याची कटकट आहे. मस्त आहे की आयुष्य...!" ती शेवटचे वाक्य बोलली तसा पूर्ण स्टाफ रूम मध्ये हशा पिकला.

  सांगून काही उपयोग नाही या अविर्भावात आणि थोडेसे असह्य वाटत असल्याने जान्हवीने आवंढा गिळला आणि पुढे काहीही न बोलता ती तिच्या वर्गात शिकवण्यासाठी म्हणून निघून गेली. जान्हवीला माहीत होते की कल्पना जरी चेष्टा करत असली तरी मनाने खूप चांगली होती. जान्हवीला कधी कोणती मदत लागली तर लगेच करायची.

   जान्हवी..! एकोणतीस वर्षांची तरूण महिला. तरुणही आणि महिलाही.. कारण वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी बोहल्यावर चढली आणि दिड वर्षांत माहेरी परत आलेली. निमशासकीय शाळेत शिक्षिका म्हणून तिला पगार पण चांगलाच होता. तसा बोट ठेवायला जागा नाही अशी जान्हवी अतिशय सालस, सुगरण, किंचितशी कवी मनाची, कमावती आणि घरच्या माणसांची ओढ असणारी तरी तिच्यातला एक दोष तिच्या सासूबाईंना दिसला. फार काही नाही फक्त पायाच्या अंगठ्याशेजारी असलेले बोट अंगठ्याच्या मानाने जरा जास्तच मोठे होते. अशा मुली नवरा मुठीत ठेवतात आणि सासूला कमी लेखतात. जान्हवी मुळात अशी नव्हती पण रिस्क नको म्हणून सासूने शेवटी तिला घराबाहेर काढलेच. नवरा पण कितीही प्रेमळ असला तरी किंचितसा श्रावणबाळ होता. त्यानेही आईचेच ऐकले. पदरी तीन महिन्यांची तान्ही लेक घेऊन ती माहेरी आली. नवर्‍याने फक्त बाळाच्या दोनच वर्ष वाढदिवसानिमित्त खेळणी पाठवून, दोन महिन्यांत एक फोन करून एक बाप असल्याचे कर्तव्य पार पाडले.

  रितसर घटस्फोट घेतला आणि नंतर तेही बंद झाले. नंतर वरकरणी ऐकू आले की त्याचे लग्न त्याच्या एका दूरच्या चुलत मामाच्या मुलीसोबत झाले आणि आपल्याला एक मुलगी आहे ह्याचा त्याला विसर पडला. माहेरी गेल्यावर वहिनीला तिच्या दहा वर्षांच्या मुलाची एका तान्ह्या मुलीमुळे होणारी आबाळ सहन होत नव्हती. जरी तिचे आणि जान्हवीच्या खर्चाचे पैसे जान्हवी तिच्या  वहिनीच्या हातात देत होती. असे असुनही बाळाचे  नीटसे  बाळसे धरत नव्हते. किती खायला नेले तरी ते जान्हवीच्या बाळापर्यंत पोचतच नव्हते. जान्हवी एकटीने लेकीला सांभाळत होती. आईचे घर पण दोन वर्षांत सोडून ती दुसरीकडे लेकीसोबत राहत होती. आईने, भावाने किती समजावले तरी ती एकटीने सगळे करत होती. लेकीला पाळणाघरात ठेवत होती.

   शाळा सुटल्यावर जान्हवी झपाझप पावले टाकत पाळणाघरात गेली आणि आपल्या लाडक्या लेकीला घट्ट मिठी मारली. आई आज वेगळी भासते त्या इवल्याशा पिल्लाला पण कळले. "आई काय झालं. कशाचा विचार करते." तिने जान्हवीला विचारले. "काही नाही...! आजी आणि मामाने फोन करून बोलवले आहे. जायचं की नाही समजत नाहीये." जान्हवी उत्तरली.

    "मामीने केलेला का फोन वन्स तुम्ही येताय का म्हणून?" तिने हातवारे करून आईला विचारले. "हो बाळ..! तुझ्या मामीनेच फोन केलेला. काही महत्वाचे बोलायचे आहे म्हणून." जान्हवीने सांगितले. आपला इवलासा हात डोक्यावर ठेवून ती बोलली,"आई सिंपल आहे. सुयश दादाला आता काॅलेजची फी भरायची असेल. मामाकडून एकट्याने होत नाही म्हणून तर तुला बोलावले. नाहीतर मामी आपल्याला किती वेळा दिसते तरी आवाजाला *ओ* पण देत नाही." जान्हवी रागातच लेकीला बोलते, "किमया जास्त बोलतेय तू. आपलं वय काय आपण बोलतो काय? मामी आहे ती तुझी! "

"जास्त पण खरं बोलतेय. मागच्या वेळी पण मामा तुला पैसे मागत होता. तू बोलली की माझ्या शाळेची फी भरायची आहे तर आजी कशी  बोलली  की मुलीला शिकवून काय उपयोग? पुढे माझा नातू  सुयशच तुला बघेल." अत्यंत निरागसपणे किमया बोलली.

"पण काय करायचे आता? आजीला काय सांगू? " जान्हवीने तिच्या छोट्याशा लेकीला विचारले. हनुवटीवर बोट ठेवून तिने थोडा विचार केला आणि हाताची चुटकी वाजवली आणि बोलली,"आई तू सांग की मी किमीसोबत बाहेर जात आहे माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. आज जमणार नाही. नंतर तू ठरव."

"चालेल. आज आपण बाहेरच जेवायला जाऊ. चल निघायचे आता. घरी जाऊन फ्रेश होऊन मग हाॅटेलमध्ये जाऊया."जान्हवी बोलली.

"आई ते बोलू ना तू मला शिकवलेलं. प्लीज आई..!" किमयाने इवलेसे तोंड करून विचारले.

आणि दोघीही हसत बोलल्या...

चंद्र दिसतोय गोल गोल
आहे थोडा घोळ घोळ
कोणाला नाही बोलायचे
काहीच नाही सांगायचे
प्रत्येकाची गोष्ट निराळी
आळीमिळी गुपचिळी

~ऋचा निलिमा