रस्त्यावर दुतर्फा असलेली नारळीची झाडं संधी प्रकाशात छान दिसत होती. दूरवर समुद्रकिनाऱ्याची अस्पष्ट दिसणारी रांग धूसर होत चालली होती. पक्षी घरट्याकडे ओढीने परतत होते. त्यांचा किलबिलाट आसमंतात भरून गेला होता. दर विकेंडला संध्याकाळच्या वेळी दिसणारे हे दृश्य पाहत हातात कॉफीचा मग घेऊन युगा बाल्कनीत उभी होती.
'उद्या सोमवार! म्हणजे कामाचा वार. दोन दिवस निवांत सुट्टी झाली की हा सोमवार नकोसा वाटतो. पण काम आहे म्हणून तर सुट्टीचं महत्त्व आहे. नाहीतर दररोज असा निवांत वेळ खायला उठला असता.'
"ताई, आईंसाहेबांनी बोलावलंय. " रघू तिसऱ्यांदा येऊन सांगून गेला.
"आले रे. आईने का बोलावलंय ते माहिती आहे मला. तू लगेच निरोप घेऊन कशाला येतोस? तुला दुसरी कामं नाहीयत का? बागेत बघ किती कचरा साठलाय. झाडं हु म्हणून नुसती वाढली आहेत. तिकडे लक्ष दे. स्वयंपाक काय करायचा? याचा विचार कर.
आम्ही आठवड्यातून दोन दिवस इथं येतो ते नेहमीच्या धावपळीतून निवांत क्षण मिळावेत म्हणून आणि तू नुसते आईसाहेबांचे निरोप पोहोचवण्याचं काम कर." चिडून युगा आत गेली. तसा रघू हसायला लागला.
पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटून आली.
आम्ही आठवड्यातून दोन दिवस इथं येतो ते नेहमीच्या धावपळीतून निवांत क्षण मिळावेत म्हणून आणि तू नुसते आईसाहेबांचे निरोप पोहोचवण्याचं काम कर." चिडून युगा आत गेली. तसा रघू हसायला लागला.
पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटून आली.
"राणी, आईसाहेबांच्या मनात ताईंच्या लग्नाचा विषय नुसता घोळतोय. पण वय सरून निघालं तरी या अजून एकटच राहायचं म्हणतात. एका आईचं काळीज आपल्या लेकीचा नाही तर कोणाचा विचार करणार? ताई तिकडं शहरात लई पगार कमावत असतील! पण पैसा असला म्हणून काय बाईनं आयुष्यभर एकटं राहणं तितकं सोपं नाही. खूप जिकिरीचं आहे ते. आजच्या काळात धाडसी विचार म्हणायचा हा."
"हम्म. पण हे ताईंना कोण समजावणार? विचार करून आईसाहेबांचा चेहरा किती म्लान झालाय बघितलंस ना?नुसता लेकीच्या लग्नाचा विचार करत असतात त्या." बोलता बोलता रघू आणि राणी स्वयंपाकाच्या तयारीला लागले.
"युगा, काय विचार केलास? निदान माझ्या समाधानाकरिता तरी ते फोटो बघून घे." बाहेर हॉलमधून आईसाहेबांचा आवाज ऐकू येत होता.
"आई, मी किती वेळा सांगू? मला इतक्यात लग्न करायचं नाहीय. खरंतर लग्नच करायचं नाहीय. लग्नामुळे कोण समाधानी राहिलंय का? आता तुमचंच बघ.. नवरा असूनही नसल्यासारखा. गेली पंधरा वर्ष तू एकटीनेच काढलीस. त्याआधी दहा -बारा वर्ष कसाबसा संसार रेटलास अन् तुझ्या वाट्याला काय आलं? हे एकटेपण!"
या वाक्यासरशी आईसाहेबांनी चमकून आपल्या लेकीकडे पाहिलं.
"त्याचा माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल याची जाणीव तरी आहे तुम्हा दोघांना? अन् नंतर काय झालं? बाबा सगळं सोडून गेलेच ना? असं बघू नको. मी लहान असले तरी सगळं कळायचं मला. रोज भांडणं, वाद ऐकून भीती वाटायची, पोटात कळ यायची. छातीत धडकी भरायची. जोडीला ना बहीण ना भाऊ. मी एकटीच होते आई. आता या एकटेपणाची सवय झाली आहे. सोबत नको वाटते. त्यातही आयुष्यभराची साथ म्हणजे ओझं वाटतं."
हे ऐकून आईसाहेब जरा नरम आवाजात म्हणाल्या, "अगं, सगळेच पुरुष तसे नसतात काही. आपल्या रघू आणि राणीचा संसार बघ, कसा व्यवस्थित सुरू आहे. दोघं एकमेकांशिवाय जराही राहत नाहीत. आपण नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. जे घडून गेलं त्याचा का विचार करायचा?"
"घडून गेलेल्या गोष्टी मनावर ओरखडे ठेऊन गेल्या आहेत. तुला त्या विसरणं शक्य असेल. पण मला नाही. कितीही झालं तरी रघू आणि राणी या घरचे नोकर आहेत. त्यांची बरोबरी आपल्याशी कधीही होऊ शकत नाही." युगा पाय आपटत निघून गेली. नेमकी त्याच वेळी राणी भाजी कोणती करायची हे विचारायला म्हणून हॉलमध्ये आली. तिच्या कानावर हे वाक्य पडलं आणि तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. डोळ्यांत अश्रू जमा झाले, तशी ती मागं वळली.
"राणी, इकडं ये." आईसाहेबांचे कठोर शब्द ऐकून ती तशीच उभी राहिली. "का आली होतीस?"
"ते आपलं भाजी कोणती करायची..?" राणी आईसाहेबांची नजर चुकवत म्हणाली.
"तुला आवडेल ती कर आणि युगा जे बोलली ते अजिबात मनावर घेऊ नको. तू आणि रघू मला मुलासारखे आहात. मी तुम्हाला कधी नोकरासारखी वागणूक दिलीय का?"
यावर राणीने नाही म्हणून मान हलवली.
"मग? डोळे पुस नि कामाला लाग."
आईसाहेबांचे डोळे भरून आले. 'हल्ली हा एकटेपणा नको वाटतो. सतत कोणीतरी जवळ असावं, आपल्या मनातलं ऐकून घ्यावं असं वाटतं. पण हे युगाला काय कळणार? तरुणपणातले विचार वेगळे अन् वय झाल्यावर त्याचं विचारात फार फरक पडतो.'
--------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
पुढच्या आठवड्यात या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही असं ठरवून युगा परतीची तयारी करायला लागली. जॉबची वेळ दहा वाजताची असल्याने पहाटे लवकर निघावं लागेल. या हिशोबाने तिने आवरायला घेतलं.
'आयुष्यात केवळ लग्न हा एकच विषय आहे का? बाकीचे कितीतरी चांगले विचार आहेत. माझा जॉब, इन्क्रिमेंट, मोठी पोस्ट, भरपूर पगार, शॉपिंग.. माझी नोकरी नसती तर या निवांत जागी हे घर बांधून झालं असतं? इथलं मनमोहक निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळालं नसतं. त्या भूतकाळातल्या घटनांच्या आठवणीतून आईला शांतपणे जगातही आलं नसतं आणि शहरातून धकाधकीच्या जीवनातून रघू आणि राणी इथे राहायला आले नसते.'
काहीतरी आठवल्याने अचानक युगा हातातलं काम सोडून स्वयंपाक घरात आली.
"राणी, भाजी कसली करतेस?"
"तुमच्या आवडीची मटकीची उसळ शिजवायला टाकलीय." राणी खाली मान घालून म्हणाली.
"शिजली की हाक मार. आज मी उसळ करणार आहे." इतकं बोलून युगा पुन्हा खोलीत निघून गेली.
"ही यांची माफी मागायची पद्धत! आधी बोलायचं आणि नंतर पश्चाताप झाल्यावर तोंड उघडून माफी मागायची सोडून हे असलं काहीतरी करायचं. मोडेन पण वाकणार नाही अशी ही ताईंची तऱ्हा." राणी भांडं आपटत म्हणाली.
"जाऊ दे. तू तुझं काम कर. माणूस रागात असलं की काहीतरी बोलून जातो. तू विसरलीस का? आज आईसाहेबांमुळं आपण हे दिवस बघू शकतो. आपलं लग्न देखील त्यांनीच लावून दिलं. हाताला काम दिलं. त्या जे खातील तेच आपण रोज खातो, अगदी चमचमीत असलं तरीही! आणि ताई बोलल्या म्हणून लगेच राग कशाला मानून घ्यायचा? त्यांनीही आयुष्यभर खूप सोसलयं. त्याचा राग कधी, कधी असा निघतो."
"तू सगळ्यांना समजून घे. मला ते जमणार नाही." राणी फणकाऱ्याने म्हणाली. मटकी शिजल्याचा वास आल्यावर तिने कुकर बंद केला.
"विराज, तू परत प्रपोज करायला फोन केला असशील तर मी फोन कट करेन." इतक्यात युगा बोलत स्वयंपाक घरात आली.
'झालं यांचं सुरू. ते विराज सर दर आठवड्याला यांना लग्नासाठी विचारतात. पण या मॅडम त्यांना कायम उडवून लावतात.' राणी मनातल्या मनात रागाने बोलली.
"काय कमी आहे सरांच्यात? ते दिसायला छान आहेत. शहरात त्यांचं मोठं घर आहे. चांगली नोकरी आहे. बक्कळ पैसा आहे अन् घरात आहे ती फक्त आई! बहिणी नाहीत की भाऊ नाही. बाकी कोणतीही जबाबदारी नाही." राणी रघूच्या कानाजवळ येत म्हणाली.
"काय कमी आहे सरांच्यात? ते दिसायला छान आहेत. शहरात त्यांचं मोठं घर आहे. चांगली नोकरी आहे. बक्कळ पैसा आहे अन् घरात आहे ती फक्त आई! बहिणी नाहीत की भाऊ नाही. बाकी कोणतीही जबाबदारी नाही." राणी रघूच्या कानाजवळ येत म्हणाली.
"ते तुला काय करायचं? तू तुझं काम कर. सगळ्याच बाबतीत बोलणं बरं नव्हे. आपण या घरचे नोकर आहोत. आपली पायरी विसरता कामा नये." आता मात्र रघू चांगलाच चिडला. हे बघून राणीने पानं वाढायला घेतली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा