Login

एकाकी भाग 2

गोष्ट एकाकीपणाची
पहाटे लवकर युगा बाहेर पडली. पण आज आईसाहेब सोबत नव्हत्या. रघू आणि राणी त्यांच्या सोबतीला बंगल्यावरच राहणार होते. युगा शहरात एकटी राहणार म्हणून आईसाहेबांना चिंता वाटत होती. भरमसाठ सूचना देऊन त्यांनी तिची पाठवणी केली. आता पुढचा आठवडा तिच्याविना घालवायचा म्हणून त्यांना नकोसं वाटतं होतं.

श्रीधर सोडून गेल्यापासून आईसाहेब युगासोबत राहत होत्या. तिचं शिक्षण झालं आणि लगेच नोकरी लागली. तिचं काम पाहून बढती होऊन पगारही वाढला. आईसाहेब निश्चिंत झाल्या. पण संसार अर्धवट राहिला होता. मुलीची प्रगती बघायला नवरा सोबत नसल्याची खंत पाठीशी होतीच.

नवरा विक्षिप्त असल्यावर बायकोने आणखी काय करायला हवं होतं? सतत दडपणात राहण्यापेक्षा स्वतंत्र राहिलेलं बरं असं म्हणत त्यांनी एका शाळेत नोकरी धरली. बऱ्याच दिवसांनी उडत, उडत बातमी आली की श्रीधरनी दुसरं लग्न केलं. आईसाहेब अजूनच खचल्या. हे खरं की खोटं काही समजत नव्हतं. आता निदान दुसरीचा संसार तरी नीट व्हावा अशी प्रार्थना करून त्यांनी आलेले भोग पदरात घेतले.
-----------------------------------------------------------


"युगा, आजच्या सगळ्या मीटिंग्ज तू अटेंड करायच्या आहेस." विराज दारात उभा होता. "तसंही हा आठवडा भरपूर काम आहे आणि हे काय? आईसाहेब आलेल्या दिसत नाहीत! म्हणजे त्यांना घरी पोहोचवायचं काम आज माझ्याकडे नाहीय तर." विराज गाडीत वाकून बघत म्हणाला.

"हो. मीच म्हणाले, या आठवड्यात खूप काम आहे. तू बंगल्यावर थांब म्हणून. नाहीतर इथे येऊन लग्न कर म्हणून रोज माझ्या डोक्याला कटकट करत बसेल. तेवढीच एक आठवडा माझी सुटका."

"युगा, तुझी काळजी वाटते त्यांना आणि तुझ्याशिवाय आईसाहेबांना आहे तरी कोण? तू त्यांचं ऐकलं पाहिजेस. आता तरी लग्नाचं मनावर घे. मी अजूनही तुझी वाट बघतोय. खुप सुखात ठेवेन मी तुला." विराज आपल्या छातीवर हात ठेवत नाटकीपणे म्हणाला.

"बस् कर ना. मी ऑफिसमध्ये कामासाठी येते. त्याचा पगार मिळतो मला. तू जर असाच वागत राहणार असशील तर मात्र मी जॉब सोडेन हं विराज. मला तुझ्याशी काय, इतर कोणाशीही लग्न करायचं नाहीय. एकवेळ आई परवडली. पण तू नको." युगा केबिनमध्ये आली. सवयीप्रमाणे तिने आधी मेल्स चेक केले. मीटिंग्जचं वेळापत्रक लावलं आणि ती बॉसच्या केबिनमध्ये शिरली.
विराज तिची लगबग आपल्या केबिनमधून पाहत होता.
दिसायला सुंदर असूनही त्याचा गर्व नसणारी, आपल्या प्रत्येक मतावर ठाम असणारी, स्वतंत्र विचारांची, आग्रही, निडर, धाडसी अशी युगंधरा त्याला मनापासून आवडत होती. लग्न करेन तर हिच्याशीच अशी प्रतिज्ञा केलेला विराज गेली चार वर्षे तिच्या होकाराची वाट पाहत होता.

पण युगाने त्याचं प्रत्येक प्रपोजल उडवून लावलं होतं. आज काहीही झालं तरी आईसाहेबांशी या विषयावर बोलायचं असं ठरवून विराज त्यांना घरी सोडायला जाणार होता. तसंही युगा सामोरं त्यांच्याशी नीट बोलता आलं नसतं. पण नेमक्या आईसाहेब बंगल्यावर राहिल्या. त्यामुळे आठवडाभर त्याला शांत राहणं भाग होतं.
तसं पाहायला गेलं तर विराजमध्ये काहीच कमी नव्हती. युगाच्या वयाचा, तिला शोभेल असा, घरंदाज अशा विराजच्या मागे ऑफिसमधल्या कितीतरी मुली होत्या. पण हा मात्र युगाची वाट पाहत होता.

"ए, लक्ष कुठं आहे? ही फाईल तयार करून लगेच पाठवून दे." युगा आली तशी निघून गेली. पुढचा सगळा दिवस व्यस्त गेला. दोघांना एकमेकांशी बोलायला देखील वेळ नव्हता. रात्री आठ वाजता सुटका झालेली युगा फार दमून गेली होती.

"घरी जेवायला येतेस? मी आईला कळवतो तसं." विराजला हो म्हणण्यावाचून तिच्याकडे पर्याय नव्हता. आईला इकडे आणायला हवं होतं असं युगाला मनापासून वाटलं. "निदान राणीला तरी सोबत आणायला हवं होतं." ती एकटीच बोलत होती.

"रघूला सोडून राणी तुझ्यासाठी इकडे बरी येईल? तू तिकडे नाहीस म्हणून तिला जरा मोकळं वाटत असेल. आईसाहेबांचं आणि तिचं छान जमतं." विराज गाडीत बसत म्हणाला. एरवी युगा यावरून त्याच्याशी भांडली असती. पण आत्ता तिचा मूड नव्हता. शांतपणे ती गाडी चालवत राहिली. युगाच्या मूड पाहून विराजही फारसा बोलला नाही.

विराजच्या आईने आग्रह करून देखील जेवण करून युगा रात्री बाहेर पडली. भरपूर काम केल्यानंतर मिळणारा एकांत तिला हवासा वाटत होता. रात्रीच्या नीरव शांततेत रमून जायला युगाला फार आवडायचं. असा एकांत तिला बऱ्याच दिवसांनी मिळणार होता आणि ही संधी तिला आज गमवायची नव्हती. खरंतर लहानपणी या एकटेपणाची भीती वाटायची. पण हळूहळू त्याची सोबत तिला हवीशी वाटू लागली.

आधी आईसाहेबांना या एकांताची खूप भीती वाटायची. अंधार नकोसा वाटायचा. श्रीधरच्या मनात कधी काय येईल हे सांगता यायचं नाही. त्यांच्या मनात कधी शंका, संशय येईल आणि त्यावरून भांडण, वाद सुरू होतील हे समजायचं नाही.
सुरुवातीला आईसाहेब भरपूर वाद घालायच्या. पण नंतर त्यांचा संयम संपला. गोष्टी मर्यादेपलीकडे गेल्या आणि त्या एकदम शांत झाल्या.
एकदा का सीमा ओलांडली की कशाचं काही वाटत नाही. तसंच झालं त्यांचं. आपल्याला नवऱ्याचं प्रेम, जिव्हाळा, आदर मिळवा ही सामान्य स्त्रीची सुलभ भावना त्यांनी मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून टाकली.

आपल्या आई -वडिलांचं काहीतरी बिनसलं आहे, याची जाणीव युगाला झाली होती. पण मनावरचं दडपण इतकं होतं की त्या खाली ती अक्षरशः दबून गेली होती. याबद्दल विचारणार तरी कोणाला? त्यापेक्षा हा एकटेपणा बरा वाटायला लागला.

राणीच्या फोनने युगा विचारातून बाहेर आली.

"ताई, आईसाहेबांची तब्येत बरी नाही." काळजी वाटणारा आवाज ऐकून युगा एकदम उठून उभी राहिली.

"मी तिकडे यायला हवंय का?" युगा.

"दिवसभर तुम्ही कामात असाल म्हणून मी फोन केला नाही. डॉक्टर येऊन गेले. आता तसं काळजीचं कारण नाही. तरी तुम्हाला कळवावं म्हणून फोन केला. आम्ही आहोतच. पण आईसाहेब तुमची आठवण काढत होत्या. वर तुम्हाला कळवू नको असंही सांगितलं त्यांनी. पण राहावलं नाही म्हणून फोन केला." राणी म्हणाली.

एकाएकी युगाच्या डोळ्यांत पाणी आलं. "आईला उद्या बरं वाटलं तर ठीक. नाहीतर मी येते. पण वेळोवेळी कळवत रहा आणि काही लागलं तर सांग." इतकं बोलून युगाने फोन ठेवला.'आईला इकडे आणायला हवं होतं.'
आता मात्र तिला आईची खूप आठवण आली.' ती किती काळजी करते आपली आणि आपण काय करतो? तिच्या शब्दाला साधी किंमतही देत नाही! आपल्या मनावर जसे आघात झाले, त्याहून आईने कितीतरी अधिक सोसलं आहे.' युगाचे डोळे झरझर वाहत होते. तिने विराजला फोन लावला.

"उद्या महत्त्वाचा दिवस. सुट्टी घेऊन कसं चालेल? हवं तर मी आईसाहेबांना इकडे आणायची सोय करतो. तुला एकटं वाटत असेल तर आत्ता न्यायला येतो." विराज म्हणाला.

"नको. रघू आणि राणी तिची नीट काळजी घेतील आणि मोकळ्या हवेत तब्येत लवकर बरी होईल." असा विचार करून युगाने हा बेत रद्द केला.
तिला वाटलं विराज आत्ता इथे असायला हवा होता. त्याच्या कुशीत शिरून इतक्या वर्षांचे थोपवून धरलेले अश्रू मोकळे झाले असते. पण यासाठी त्याची आठवण का यावी? हे मात्र तिला कळेना. रात्री उशीरा कधीतरी तिला झोप लागली.