"हे मंदिर तुला कसं माहीत?" युगा पायऱ्या चढत मंदिरचं सौंदर्य पाहत होती. गाभाऱ्यात राधा -कृष्णाची कलाकुसर केलेली अत्यंत सुंदरशी मूर्ती उभी होती. भिंतीवर बाल कृष्णाची रंगवलेली चित्रे त्या मंदिराच्या सुंदरतेत आणखी भर घालत होती. "मी इथं थोडा वेळ ध्यानाला बसणार आहे. तुम्ही दोघे हवं तर फिरून या."मंदिरात गर्दी अजिबात नसल्याने आईसाहेबांना हा एकांत फार भावला.
विराज आणि युगा फिरत, फिरत मंदिराच्या मागच्या आवारात आले. तिथं एक छोटासा तलाव होता. आजूबाजूला झाडी होती. मध्येच अदृश्य होत जाणारी डोंगर रांग त्या वातावरणात रंग भरत होती. "विराज, तुला ही जागा कशी माहीत?"
"आजकाल मोबाईलवर सगळं कळतं आणि डोळे उघडे ठेवून पाहिलं की सगळं नीट दिसतं. त्यासाठी थोडासा शोध घ्यावा लागतो."
"हम्म...तेही खरंच आहे. पण आजकाल तू आईची जास्तच काळजी घेतोस. तिला काय हवं, नको ते बघतोस! हे मला इंप्रेस करण्यासाठी, माझा होकार मिळवण्यासाठी तर करत नाहीस ना? काहीही झालं तरी मी तुला हो म्हणणार नाहीय हं." युगा विराजच्या डोळ्यांत पाहत म्हणाली.
"मला मनापासून वाटतं म्हणून करतो आणि तुला इंप्रेस करायचंच असतं तर मी काहीही करू शकत होतो. कधी डेटवर नेलं असतं, सतत काही ना काही भेटवस्तू दिल्या, तुझा होकार यावा म्हणून मागे लागलो असतो. तुझा नकार पचवून चार वर्षे नुसतीच अशी वाट पाहत राहिलो नसतो. नसत्या शंका घेणं बंद कर युगा. तू समजतेस तितका वाईट नाहीय मी." विराज चिडून उठला. त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता, राग स्पष्ट दिसत होता.
"अरे, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी चेष्टा करत होते." युगा त्याच्या मागे धावली. "सॉरी..प्लीज चिडू नकोस."
पण विराज न ऐकता तसाच पुढे निघून गेला. आईसाहेब पायऱ्या उतरत होत्या. त्यांना हात देण्यासाठी तो एकदम पुढे आला. पण युगाला परत काही वाटायला नको म्हणून तसाच गाडीकडे वळला. तोवर युगाने आईला हाताला धरून खाली उतरवलं. "विराज, खूप छान वाटलं. मनातला सगळा पसारा, गोंधळ, नकारात्मक विचार इथेच सोडून आले. आता एकदम शांत वाटतंय."
यावर तो काही बोलला नाही. युगाही गप्पच होती.
यावर तो काही बोलला नाही. युगाही गप्पच होती.
सगळे गाडीत बसले. "काय झालंय? भांडलात का? दोघांचेही चेहरे पार पडले आहेत." आईसाहेब आरशातून विराज आणि युगाला न्याहाळत होत्या.
"नाही तर. खुप भूक लागली आहे. आधी जेवायला जाऊ. मग काय बोलायचं ते बोला." विराजने गाडी पळवली. युगा अधूनमधून त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होती. पण आता तिच्याशी बोलायचं नाही असं ठरवून विराज गाडी चालवत राहिला. 'आजवर सगळं चेष्टेवारी घालवलं. जिथे अडेल तिथे मदत केली. एक मित्र म्हणून ठामपणे तिच्या पाठीशी उभा राहिलो. पण समोरच्याला स्वतःच्या कोशातून बाहेर पडायचंच नसेल तर मी तरी काय करणार? आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती ते आपल्याच चश्म्यातून बघत असेल तर आपण प्रयत्न करणं व्यर्थ आहे.' विराजने स्टिअरिंगवर जोरात हात मारला.
"विराज, काय झालंय?" काही होतंय की.."
"नाही. म्हंटलं ना, भूक लागलीय. बाकी काही नाही. पाच एक मिनिटांत पोहोचू आपण."
विराज जास्त जेवला नाही. युगाही फारशी बोलत नव्हती. काहीतरी बिनसलं आहे, याची कुणकुण आईसाहेबांना लागली होती. पण त्यांनी शांत राहणं पसंत केलं. "घरी जायचं का?"
दोघांपैकी कोणी काही बोलेना. इतक्यात विराजचा मित्र आला म्हणून तो उठून गेला.
"युगा, का दुखावतेस त्याला? मला माहिती आहे, तूच काहीतरी बोलली असशील. एखादा माणूस आपल्यासाठी काय करतो, निदान याची तरी जाण ठेवावी." आईसाहेब म्हणाला.
"युगा, का दुखावतेस त्याला? मला माहिती आहे, तूच काहीतरी बोलली असशील. एखादा माणूस आपल्यासाठी काय करतो, निदान याची तरी जाण ठेवावी." आईसाहेब म्हणाला.
"म्हणजे? मी त्याला सांगितलं नाहीय, तुझी काळजी घे, तुला काय हवं, नको ते बघ, फिरायला ने म्हणून. त्यांचं तो मनानं करतो आहे."
"याआधी आपल्यासाठी कोणी इतकं केलं होतं? आठव जरा. श्रीधर निघून गेले आणि आपल्याला दोष देत सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. पैशांची मदत राहू दे. पण साधी चौकशी करायला तरी कोण दारावर आलं? तरीही आपण एकमेकींच्या सोबतीने आयुष्य पुढे नेलंच ना? आता विराजच्या रूपानं मला लेक मिळायला असं समजते मी आणि करणाऱ्याला त्याचा मान मिळायलाच हवा. त्याच्याप्रती आदर,प्रेम, जिव्हाळ्याची भावना आपण जपायला नको का? तू त्याला नकार दिलास तरी मनात राग न धरता तो आपली काळजी घेतो. मुलासारखा जीव लावतो तो मला अन् इतक्या वर्षांच्या अनुभवाने माणूस ओळखता येतो गं. तू समजतेस तसा अजिबात नाहीय तो."
"आई..." युगा आश्चर्याने पाहत म्हणाली.
"हो. मला माहिती आहे सगळं. मी तुला सक्ती करणार नाही की जबरदस्तीही करणार नाही. पण इतकंच सांगेन की याच्या इतकं चांगलं स्थळ तुला मिळू शकणार नाही."
विराज आपल्या मित्राची ओळख करून द्यायला घेऊन आला. "ही माझी कलिग युगा आणि या आई." त्याचा मित्र दोन शब्द बोलून निघून गेला. आपल्यासाठी विराजने कलिग हा शब्द वापरला म्हणून युगा नाराज झाली. "मैत्रीण म्हणाला असतास तरी चाललं असतं." ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
पण विराजने तिच्याकडे लक्ष दिलं नाही.
'याने असं चिडावं, इतकं काय बोलले मी? सॉरी सुध्दा म्हंटल. तरीही याचा तोरा आहेच.' युगा मागे आईजवळ जाऊन बसली.
"आई, मी ड्राइव्हर नाहीय. तिला पुढे बसायला सांगा." विराज मोठ्याने म्हणाला.
"गाडी माझी आहे. मी कुठेही बसेन." युगा.
"तुझी गाडी आहे तर तूच चालवं." असं म्हणत विराज उठून मागे आला. युगाने ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. पण नक्की जायचं कुठे, हेच तिला माहित नव्हतं. "आत्ता कुठे जायचं आहे?"
"आई, तिला सांगा, तुझी गाडी आहे. तूच ठरव." विराज डोळे मिटून मागे टेकून पडून राहिला.
दोघांची तू तू मैं मैं ऐकून आईसाहेबांना हसू येत होतं. पण उगीच आगीत तेल ओतल्यासारखं होईल म्हणून त्या गप्प बसल्या. पुन्हा वाद नको म्हणून युगाने गाडी घराकडे वळवली. तिला वाटलं, हे पाहून विराज काहीतरी बोलेल. पण तो अजूनही डोळे मिटून झोपला होता. बराच वेळ तसाच गेला. आई आणि विराजला झोप लागलेली पाहून युगाने हळू आवाजात रेडिओ लावला. पण तिचं मन रमेना. सकाळपासून चाललेली विराजची बडबड ती मिस करू लागली. आजवर इतकं शांत बसलेलं त्याला कधी पाहिलं नव्हतं. तिने मागे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत, निर्विकार भाव पाहून युगाला कसंतरीच वाटलं. त्याला परत एकदा सॉरी म्हणावं म्हणून तिने हळू आवाजात त्याला हाक मारली.
विराज सोबत असतानाही हा एकांत तिला नकोसा वाटू लागला. युगाला तो जवळ असूनही त्याची आठवण अवस्थ करू लागली. त्याने केलेलं प्रपोज, संयमाने पचवलेला नकार, त्याचं समजून घेणं, आईची घेतलेली काळजी, त्याचा दिलखुलास, मनमोकळा स्वभाव.. तिला खूप काही आठवू लागलं. युगा स्वतःशीच हसली.
घर जवळ आलं तसा गाडीचा वेग कमी झाला. विराज आणि आईसाहेबांना जाग आली. "मला स्टेशनवर सोड. मी घरी जातोय." विराज.
"अरे, उद्या जा ना दोघेही. आज काय घाई आहे?" आईसाहेब.
"आई तिकडे एकटी आहे. मला गेलं पाहिजे." विराजला आपल्या आईची आठवण अस्वस्थ करू लागली. आईसाहेबांना बंगल्यावर सोडून युगाने स्टेशनची वाट धरली. विराज अजूनही गप्प होता. युगाला चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. "तू खरंच बोलणार नाहीयस का?"
"नाही."
त्याचं उत्तर ऐकून युगाला हसू आलं. "परत सॉरी म्हणते." तिने दोन्ही हात कानावर ठेवले.
"अग, गाडी चालवताना हात काय सोडतेस? हात सोडून गाडी चालवण्यासाठी आधी तेवढी कमांड असायला हवी." तो स्टिअरिंग पकडत म्हणाला.
"विराज, तू जाऊ नकोस." युगाने बाजूला गाडी थांबवली. "मला तुझी खुप आठवण येईल." आपल्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसू नये म्हणून ती खाली उतरली.
"काय म्हणालीस?" विराजही उतरून तिच्याजवळ आला.
"काय म्हणालीस?" विराजही उतरून तिच्याजवळ आला.
"तू जाऊ नकोस." असं म्हणत युगाने त्याला घट्ट मिठी मारली.
"अग, काय करतेस हे? कोणीतरी बघेल." विराज तिला बाजूला करत म्हणाला.
"तू गेलास तर माझं मन इथे लागणार नाही. खुप आठवण येईल तुझी. खरंच मला माफ कर. आजवर खूप दुखावलंय मी तुला. पण तू आता दूर गेलास तर मला ते सहन होणार नाही." युगाने आपली मिठी आणखीनच घट्ट केली.
"खरं की काय? मला माहिती नव्हतं, तुझा होकार मिळवण्यासाठी तुझ्याशी भांडावं लागेल, तुझ्यावर चिडावं लागेल. हे आधीच कळलं असतं तर मी आधीच भांडण काढून रुसून बसलो असतो."
"पण मी कधी होकार दिलाय?" युगा बाजूला होत म्हणाली.
"हा होकार नाहीय तर काय आहे? तुला तुझ्या मनाचं ऐकायचं नसेल तर मात्र मी जातो."
"नको. थांब. माझा होकार आहे." युगा खाली मान घालून म्हणाली. पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीय हं. ते सगळं लग्नानंतर.." विराजने युगाला आज पहिल्यांदा लाजताना बघितलं होतं.
"बोलतेस एक आणि चेहऱ्यावर दिसतं वेगळचं. चल, गाडीत बैस. तुमच्या आईसाहेबांना ही खुशखबरी देऊ." त्याने गाडी अगदी ऐंशीच्या वेगाने पळवली. बंगल्याच्या दारात गाडी थांबतच विराज पट्कन खाली उतरला. आईसाहेब ऐवजी सासुबाई म्हणून हाक मारत तो आईसाहेबांच्या गळ्यात पडला. "अरे, हे काय, गेला नाहीस? आणि काय चाललंय हे?"
"नाही. उद्या आपण सगळे जातोय. आमच्या घरी पुढची बोलणी करायला. मला माहिती नव्हतं, तुमच्या मुलीचा होकार मिळवण्यासाठी तिच्याशी भांडावं लागेल म्हणून." हे ऐकून आता मात्र आईसाहेबांना खूप आनंद झाला. विराजला त्यांनी जवळ घेतलं. "अभिनंदन."
"मी पण आहे इथं आणि तू माझी आई आहेस की त्याची?
त्याचं काय अभिनंदन करतेस?" युगा लाजून म्हणाली.
त्याचं काय अभिनंदन करतेस?" युगा लाजून म्हणाली.
"अग, आई ही आईच असते. इकडे ये." आईसाहेब आपल्या लेकीला बिलगल्या. "युगा, मी खूप खुश आहे. तुला विराजपेक्षा योग्य जोडीदार कोणी मिळूच शकत नाही आणि मला असा जावई!" त्यांनी दोघांना जवळ घेतलं. "असं वाटतंय, अनेक वर्षांचा एकांत आता संपलाय.. अगदी कायमचा. माझं स्वप्न पूर्ण झालं." आईसाहेबांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले. आनंदाचे, सुखाचे! जणू इतक्या वर्षांचं साठलेलं दुःख, एकटेपण या आनंदात वाहून, विरघळून जात होतं.. कधीही न परतण्यासाठी! आज त्या खूप आनंदी होत्या. जणू एकाकीपणाचा वनवास संपवून सुखाच्या दिशेनं माय -लेकीची पावलं पडली होती.. तीही अनेक वर्षांनी!
समाप्त.
©️®️सायली जोशी.
©️®️सायली जोशी.