Login

अल्पज्ञान भाग-२

अतिघाई आणि अल्पज्ञान याने काय होते हे सांगणारी वेगळी कथा!
प्रस्तुत कथेत नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: अल्पज्ञान भाग -२

"हा, आई बोल. मी तुला आत्ताच फोन करणार होते मी खूप वेळ आधीच पोहोचले आहे मामीकडे. उद्या येईन." प्रज्ञा आपली आई कमलाला म्हणाली.

"बाळा मला एक गोष्ट खरं खरं सांग तुझं कोणावर प्रेम आहे का गं? आईने काळजीने विचारले आणि ते बोलत असताना आजूबाजूला आपला नवरा नाही ना याची सुद्धा काळजी घेतली.

"नाही. तसं काही असतं तर मी सांगितलं असतं ना ." ती जरा वैतागतच म्हणाली.

मध्येच आईने हे काय विचारायला सुरुवात केली असे तिला वाटले.

"तुला माहितीये तुझे रिपोर्ट आलेले आहेत आणि मी त्यांना म्हंटले होतं ना, की लवकर सांगा म्हणून तर त्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी फोन केलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये जे दाखवत आहे. त्याच्यावरती त्यांना शंका येते आणि ते ऐकून आता मी काय बोलावं मला काहीच कळत नाहीये." कमला घाबरत आपल्या मुलीला सांगत होती

"त्याच्यामध्ये असं काय सांगितलं आहे? आणि तू काय एवढी घाबरते आहेस? आपण उद्या जाणारच आहोत ना जे काय असेल ते उद्या आपण नीट बघून घेऊ तू नको उगाच काळजी करूस." आपली आई प्रत्येक गोष्टीचा ताण घेते म्हणून प्रज्ञा आपल्याला आईला समजावत म्हणाली.

"अगं मूर्ख मुली तुला काय सांगू त्याच्यामध्ये काय दिले आहे. तुला माहितीये का?" असे म्हणत प्रज्ञाच्या आईने तिला सर्व सांगितले.

" नाही. मी असं कसं करेन ? तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का ? आणि चुकून त्यांनी कोणाचे दुसऱ्याच नाव वाचलं असेल आणि त्यावरून ते बोलत असतील किंवा एकाच नावाच्या सुद्धा दोन व्यक्ती असू शकतात ना."
आपल्या आईला पटवून देण्याचा प्रयत्न करत प्रज्ञा म्हणाली.

"अगं, मी त्यांना सगळं विचारले की तुम्ही नीट पाहिले का? उगाच काही बोलू नका. माझी मुलगी तशी नाहीये म्हणून पण तरीसुद्धा ते ऐकायला तयार नव्हते. ते काही नाही तू आत्ताच लगेच घरी निघून ये." आई म्हणाली.

"आता कशी येऊ ? किती रात्र झालेली आहे पुन्हा आता सगळ्या ट्रेनसुद्धा बंद असणार. त्यामुळे उद्यापर्यंत तू धीर धर. काय असेल तर आपण उद्या बघू पण खरचं तू माझ्यावर विश्वास ठेव आई. ते सांगत आहेत ते खोटंही असू शकतं." प्रज्ञा आईला कळकळीची विनंती करू म्हणत होती.

दोघींना रात्रभर काही झोप लागली नव्हती. कारण रिपोर्ट्स मध्ये जे सांगण्यात आलेलं होतं तसे असणे कसे शक्य आहे हेच त्या विचार करत होत्या.

दुसऱ्या दिवशी लवकरच हॉस्पिटलला जायचं म्हणून परस्परच प्रज्ञाला हॉस्पिटलच्या बाहेर थांबायला सांगितलेलं होतं. कारण ती घरी येणार मग त्यामध्ये खूप वेळ गेला असता आणि लवकरात लवकर काय तो सोक्षमोक्ष लावणे गरजेचे होते.

' देवा असं काही नसू दे. जर ते खरं निघालं तर सगळेजण काय म्हणतील आणि दुसरी गोष्ट पुन्हा माझ्या संस्कारवर बोट ठेवले जाईल. काही ना काहीतरी बोलतील आधीच तिचं वजन कमी होत नाहीये. ती बिचारी किती प्रयत्न  करते पण तुला सुद्धा का तिची दया येत नाही? अजून किती आणि काय काय मी आणि माझ्या मुलीने बघायला पाहिजे?'  असे म्हणून मनातल्या मनातच कमला देवाजवळ तक्रार करत होती.

आज रिक्षाचा संप होता त्यामुळे दोघींना सुद्धा तिथे पोहोचायला वेळ लागणार होता आणि त्यामुळे अजूनच दोघींची सुद्धा चिडचिड वाढलेली होती.

प्रज्ञाला बघितल्यावर कमला पुन्हा ते रात्रीचे फोनवर ऐकलेलं होतं त्याबद्दल एका बाजूला घेऊन पुन्हा  विचारायला लागते.

"तू काय कांड केलेले आहेस? मला काय ते सांग. असं खरंच काही नाही आहे ना?  तुला कळतंय का उद्या जर हे बाहेर समजलं तर लोकं काय म्हणतील?  तुला अजून पुढे आयुष्य काढायचं आहे." एक आई आपल्या मुलीला वर्तमान आणि भविष्यमध्ये काय होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न करत होती.

"आई मी एवढच म्हणेन की तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि आधी आपण सर्व बघून घेऊ त्याच्यानंतर काय आहे ते आपल्याला समजेलच. तू जास्त काळजी करू नकोस. फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेव." प्रज्ञा पुन्हा समजावत म्हणाली.

कालची रात्र,

"हॅलो, तुमच्या मुलीचे नाव प्रज्ञा वेडे ना? मुलीचे रिपोर्ट्स आलेले आहेत." तिथल्या टेक्निशियनने सांगितले.

"हो, माझीच मुलगी आहे. काय आहे रिपोर्ट्स मध्ये तसे आम्ही उद्या येणारच आहे पण काही घाबरण्यासारखं नाहीये ना?" कमलाने विचारले.

"हे आता तुम्ही तुमच्या मुलीलाच विचारा. तिने काय केलं आहे हे तुम्हाला समजेलच. तुमची मुलगी अशी असेल असं वाटलं नव्हतं. दिसायला तर सभ्यच दिसते आणि तुम्हाला पण याबद्दल माहिती नाही?" त्या टेक्निशियनने विचारलं.

"काय मला माहिती नाही? आणि तुम्ही अस कोड्यात का बोलता काय आहे ते मला सांगा." कमला थोडी रागवतच म्हणाली.

कोणत्याही आईला आपल्या मुलीबद्दल काहीही बोललेले कसे खपवून घेईल म्हणूनच ती थोड्या चढ्या आवाजात बोलली होती.

क्रमशः

काय झाले असेल?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all