Login

अल्पज्ञान भाग-३(अंतिम)

अतिघाई आणि अल्पज्ञान याने काय होते हे सांगणारी वेगळी कथा!
प्रस्तुत कथेत नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: अल्पज्ञान भाग -३(अंतिम)

"कसे आहे ना. आपली मुलगी बाहेर काय करते? हे सर्वच पालकांना माहीत असतेच असे नाहीये ना. तसंच
तुम्हालाही माहिती नसेल." फोनवरून टेक्निशियन बोलत होती

"तुम्ही नेमकं काय झालंय ते मला सांगा." आता न राहून कमलाने विचारलं.

"तुमच्या मुलीची इस्ट्रोजन म्हणून जो हार्मोन असतो त्याची पातळी जास्त आहे याचा अर्थ ती गरोदर आहे." पलीकडून कमलला उत्तर आले.

" तुम्ही काहीही काय बोलता ? तुम्ही कदाचित चुकून दुसऱ्याचे रिपोर्ट बघितले असतील. पुन्हा एकदा नीट पहा." ते ऐकून खरं तर तिच्या पायाखालची जमीनच हादरल्यासारखं तिला वाटत होते पण आपली मुलगी असे काही करणार नाही म्हणून ती म्हणाली.

"ठीक आहे. उद्या या मग तुम्ही. उद्या तुम्हाला समजेलच. तुम्ही मला आधी सांगायला सांगितलेलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तसेही याबाबतीत डॉक्टर सांगतीलच." असे म्हणून फोन ठेवला गेला.

तसाच कमलाने आपल्या मुलीला, जी मामाकडे राहायला गेलेली तिला फोन करून याबाबत विचारणा केली.

....

वर्तमान दिवस,


"तू मागच्या महिन्यामध्ये बाहेर फिरायला गेलेली होतीस. तिथे तर काही झालेले नाही ना?" न राहून ते आठवल्यावर हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्याआधी कमलाने विचारले.

"काही नाही झालं गं आई.चल आधी डॉक्टरकडे जाऊया आणि मग आपण बोलू."  प्रज्ञा तिला आतमध्ये घेऊन गेली.

पहिले त्यांनी रिपोर्ट्स घेतले आणि त्यांना न बघताच थेट  डॉक्टरांकडे दोघी गेल्या.

डॉक्टरांनी सर्व बघितलं आणि पुन्हा हार्मोनल इम्बॅलन्स झाले आहे असे सांगितले. तसेच दुसऱ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर पीसीओडीचे काही लक्षणेही दिसत होती. याबाबत सुद्धा ते आपण उपचार घेऊन बघू असे सांगितले.

"डॉक्टर हे जे तुम्ही म्हणताय ते खरं आहे ना?"  प्रज्ञाने  पुन्हा विचारले.

"हो, म्हणजे या रिपोर्ट्समध्ये जे आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे ." डॉक्टरांनी साशंक नजरेने बघत म्हंटले.

"कारण काय आहे ना तुमच्या लॅबमधूनच माझ्या आईला फोन आलेला होता." ती बोलत होती.

" हा म्हणजे रिपोर्ट्स घेण्यासाठीच आला असेल किंवा काही रुग्ण जर आधी रिपोर्ट मिळाले असतील तर त्याबाबत विचारणा करण्यासाठी सुद्धा फोन करायला सांगतात. म्हणून त्यासाठी केला असेल." डॉक्टरांना कदाचित काही माहिती नव्हतं म्हणून ते बोलत होते.

"अहो, पण तुमच्या त्या लॅबमधून मला फोन आलेला होता आणि ते सरळ सरळ म्हणत होते की माझी मुलगी गरोदर आहे म्हणून. कुठलं ते इस्ट्रोजन हार्मोन त्याची पातळी जास्त वाढली आहे आणि तुमची मुलगी अविवाहित असून असं कसं झालं म्हणून याबाबत मला विचारत होते."आता मात्र आईने सांगायला सुरुवात केली.

"हो म्हणजे कधी कधी असं वाटतं की गरोदर असू शकतो म्हणून पण जे काही आहे ते डॉक्टर सांगू शकतात ना. म्हणूनच तर मी आता तुम्हाला सांगत आहे आणि कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल." डॉक्टरांनी दोघींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

" गैरसमज? तुमच्या या गैरसमजामुळे आम्हाला किती मनस्ताप झाला. मी तर माझ्या मुलीवरतीच संशय घेतला आणि किती प्रश्न विचारले. तुम्ही आधी त्यांना बोलावून घ्या." कमला रागाने म्हणाली.

तेव्हा त्या महिला लॅब टेक्निशियनला बोलावण्यात आले.

" हे जे म्हणत आहेत ते खरे आहे का?" डॉक्टरांनी परखडपणे विचारले.

"हो म्हणजे इस्ट्रोजनची पातळी जास्त आहे तर मला वाटले की त्या गरोदरच असतील म्हणून मी त्यांनी फोन करायला सांगितला होता म्हणून फोन केला आणि सांगितले." बिचकतच उत्तर दिले.

" पण तुम्हाला कळतंय का तुमच्या एका गैरसमजामुळे त्यांना किती मनस्ताप झालेला आहे. आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या मतानुसार काहीच कोणत्याही रुग्णांना सांगू नका. कारण जे काही आहे ते तज्ज्ञ लोक सांगू शकतात. तुम्हाला कदाचित थोडीच माहिती असेल आणि अर्ध माहिती असलेलं कधी पण हानिकारकच असतं. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणाशीही बोलताना थोडा विचार करूनच बोला स्वतःहून काही सांगत जाऊ नका. इथे डॉक्टर त्यासाठीच आहेत." डॉक्टरांनी पुन्हा असं घडू नये म्हणून आवाजात जरब देऊन सांगितले.

"हो, मला माफ करा." ती टेक्निशियन म्हणाली.

"पण डॉक्टर असे खोटे रिपोर्ट्स कधी कधी येऊ शकतात का?" प्रज्ञाने विचारलं.

"हो, म्हणजे क्वचितच होऊ शकते. कारण कधी कधी असं हार्मोन पातळी वाढल्यामुळे तसे वाटू शकते, पण जे काही आहे ते तज्ज्ञ आणि डॉक्टरांना असलेला अनुभव त्यावरूनच ते तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे जे काही असेल तर तुम्ही डॉक्टरांनाच विचारत जा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. जरी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही पुन्हा रिपोर्ट काढू शकता आणि दुसऱ्या डॉक्टरांना जाऊन सुद्धा तुम्ही विचारू शकता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते पुन्हा असे होणार नाही."

पुढे जाऊन पोलिस तक्रार वगैरे करायला नको म्हणून डॉक्टरांनी सावध पवित्रा घेतला होता आणि पूर्ण स्टाफला सुद्धा याबाबत नोटिस देऊन समजावण्यात आले होते.

तसेच तिचे वजन नियंत्रित राहण्यासाठी डॉक्टरांनी तिला योगा आणि जीवनातील तणाव कमी करण्यासाठी काही आहारातील आणि दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये काय बदल करायला हवा हे समजावून सांगितले.

सांगण्याची अति घाई तसेच आपल्याला सर्व माहिती आहे असे त्या टेक्निशियनला वाटलेले होते; परंतु वाटणे, समजणे आणि खरे असणे यामध्ये फरक असतो हेच  विसरले होते. त्यामुळे तिने स्वतःला जास्त माहिती आहे असे दाखवून फोन केलेला होता हे चुकीचे होते.

तसेच आपल्या मुलीवरती शंका घेणे हे सुद्धा चुकीचे होते पण जेव्हा परिस्थिती समोर येते तेव्हा काही समजत नाही त्यामुळे जे काही असेल ते तज्ज्ञ जेव्हा सांगतात तेव्हाच त्यावर विश्वास बसतो. कारण त्यांना तेवढा अनुभव असतो आणि त्याबद्दलची माहिती असते म्हणून अतिघाई आणि अल्पज्ञान कधीकधी मानसिक त्रास देई असे इथे झाले होते.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all