Login

अल्पज्ञान भाग-१

अतिघाई आणि अल्पज्ञान याने काय होते हे सांगणारी वेगळी कथा!
प्रस्तुत कथेत नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक:अल्पज्ञान भाग -१

"अगं काय हे? पुन्हा तुझे वजन वाढतच आहे की?" एक नातेवाईक घरी आलेल ते तिला म्हणाले.

कोणताही समारंभ असला की कोणी ना कोणी प्रज्ञाला बोलून दाखवायचे.

"हो ना. अगं जरा मापात तरी असं ना." तिची आजी सुद्धा म्हणाली.

"जिम लावली होतीस ना?" तिच्या आत्याने विचारले होते.

"हो ताई, पण ते वजन काही कमी होत नाहीये." प्रज्ञाची आई कमला म्हणाली.

"थोडा खाण्यावरतीही माणसाने नियंत्रण ठेवावे."
आजोबांनाही ते पटले नव्हते.

प्रज्ञाच्या हे अंगवळणी पडले होते. कुठे समारंभ असो की काहीही असो तिच्या शरीराच्या आकारावरून आणि वजनावरून बोलले जायचे.

जिम लावलेली होती पण ती बंद केल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या करत तिचे वजन कमी होत नव्हते.

प्रज्ञाच्या आईला मासिक पाळीचा त्रास होता. तीन ते चार महिन्यातून एकदा तिला यायची. तसेच आता प्रज्ञाच्या बाबतीतही झाले होते. कित्येक डॉक्टरांनी तिला वेगवेगळी औषधे दिली होती. यामुळे कधी मासिक पाळी तिला वेळेवर यायची तर कधी आल्यावर ते थांबण्यासाठी तिला इंजेक्शनचा आधार घ्यावा लागायचा.

गेल्या वर्षी त्याचा परिणाम असा झाला की गर्भाशयाच्या पिशवीला बाजूने काही गाठी झाल्याने तिच्यावर अवघ्या विशीतच शस्त्रक्रिया करावी लागली होती. बऱ्याच नातेवाईकांना त्यांनी ह्याबद्दल सांगितले नव्हते.

लोकांना बोलायला संधी लागत नाही म्हणून तिच्या आईवडिलांनी याबाबत काहीच सांगितले नव्हते.

पुन्हा एकदा वजन आणि चेहऱ्यावर मुरुमे दिसल्याने त्यांनी काही तपासण्या करायला सांगितल्या होत्या.

प्रत्येकवेळी डॉक्टरकडे जाणे म्हणजे अजून औषधात भर त्यामुळे प्रज्ञाला हॉस्पिटल म्हंटले की तिथे जाणे नकोसे वाटायचे.

"आई नको गं. आता मला नाही जायचे आहे. बस्स झालं. प्रत्येकवेळी माझे रक्त घेतात. कधी हार्मोनल प्रॉब्लेम कधी अजून काही सांगून नुसते लुटतात. वरून काहीच फरक पडत नाही." प्रज्ञा वैतागत म्हणाली.

"असेल काही ना काही उपाय.तुझी जिम पुन्हा सुरू करू. तसेही तू कमावतेस. अजून एक-दोन वर्षात तुझे लग्न होईल. तुला पाहून मुले नाकारतात. त्यामुळे तू गप्प बस. माझे ऐक आणि चल लवकर तयारी कर." आई तिला रागवत म्हणाली.

प्रज्ञा नाखुषीनेच तयार व्हायला लागली.

तेवढ्यात तिला एका मेसेजचे नोटीफिकेशन आले.

"काय मग प्रज्ञा ? कशी आहेस? नाही तू खूप चिंतेत दिसतेस. त्यात तुझ्यात आणि भरलेल्या ड्रममध्ये काहीच फरक दिसत नाही. किती खाशील गं? अशाने कुठला मुलगा लग्न करेल? नुसती फुगत चालली आहेस. जरा लक्ष दे. मोठी, ढोली आणि जाडी प्रज्ञा. " सोशल अकाउंट वरून तिला मेसेज आलेला.

हे तिच्या कोणत्यातरी नातेवाईकांचेच काम असणार हे तिला माहीत होते. तिने ते अकाउंट ब्लॉक आणि रिपोर्ट केले. मनात तर खूप वेळा मानसिक त्रास देतात म्हणून पोलिसांकडे तक्रार करायचे आलेले पण घरच्यांनी तिला अडवले होते. सर्व नातेवाईकांना तिने आधीच ब्लॉक करून ठेवले होते. तरी बनावट आयडीवरून ते त्रास द्यायचेच.

तिची चित्रकला खूप छान होती म्हणून तिने खूप आधी अकाउंट उघडलेले त्यात नातेवाईकांनी पाठवलेली रिक्वेस्ट मंजूर केल्यावर त्यांनी कमेंट्समध्ये मस्करीच्या नावाखाली खूप अपशब्द बोलले होते. म्हणून तिने ते अकाउंट बंद करून दुसरे चालू केले. त्यात तिने अनामिका नावाने सुरुवात केलेली. यामुळे तिचे नाव न दिसता फक्त तिचे कौशल्य दिसत होते आणि लोक चांगला प्रतिसादही देत होते.

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी तिची फाईल बघितली आणि तिला पुन्हा एकदा तपासणी करायला सांगितले. पुन्हा रक्त काढून त्याचे निकाल येईपर्यंत मायलेकींना धाकधुक होतीच.

तिला काही पदार्थ जसे की मैदा,तेल,तूप,भात आणि जंक फूड तसेच फास्ट फूड व बाहेरचे अन्न बंद करायला सांगितले होते.

ते तिने आधी ऐकले होते पण मनाची इच्छा झाली की ती खायची त्यामुळे आहार संतुलित रहायचा नाही. सतत लोकांची बोलणी ऐकून ती चिडून सर्व खायची. दररोज पाच किलोमीटर चालूनही हवा तसा फरकतिच्या वजनामध्ये दिसत नव्हता.

डॉक्टरांकडे खूप गर्दी होती. त्यामुळे जिथे लॅब होती तिथेही जास्त होती. म्हणून वाट पाहावी लागत होती. त्यात ती लॅब टेक्निशियन एव्हाना ओळखीची झाली होती.

तिने रक्त आणि लघवीचे नमुने घेतले आणि जायला सांगितले.

"आज रिपोर्टस मिळतील का?" कमलाने विचारले.

"उद्या मिळतील पण जर झालेच तर फोनवरून सांगण्यात येईल. " तिथल्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

दोघीही घरी गेल्या पण त्याचवेळी प्रज्ञाला तिच्या मामीने बोलावले म्हणून ती लगेच राहायला गेली.

प्रज्ञा दुसरीकडे गेल्यामुळे तिच्या मनातून हा विचार गेला पण आईच्या मात्र होता.

तेवढ्यात फोन वाजला आणि कमलाने तो घेतला. त्यावरचे बोलणे ऐकून तिचे डोळे रागाने लाल झाले होते.

तिने लगेच तो फोन ठेवून आधी दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा मोबाईल उघडून दुसऱ्या नंबरवर फोन लावला.

क्रमशः

काय झाले असेल?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all