Login

फिर भी तुमको चाहुंगा... भाग ४

ताराने त्याला आधी एक घट्ट मिठी मारली त्याच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कधीही न रडणाऱ्या ताराला अजिंक्य असं बघत होता. काहीवेळ ती अशीच त्याच्या मिठीत रडत होती. अजिंक्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. तिचं मन मोकळं होणं गरजेचं होतं.

मागील भागात आपण बघितले….



त्याला इतकं जवळ बघून ताराच्या अंगावर शहारे आले.

पण ती लगेच मागे झाली. तसं अजिंक्य ने तिला त्याच्या जवळ खेचून घेतले. अर्थात इतक्याच जवळ की तिला किंवा बघणाऱ्याला काही वावगे वाटणार नाही. आपण कॉलेज मध्ये आहोत हे तो विसरला नव्हता.



" काही नाही." तारा


" तुला आवडत नाही का मी पूजा शी बोलतो?" अजिंक्य


खूप प्रयत्न करून पण स्वतः ला रोखू शकत नव्हती. ती काहीच बोलली नाही. तोच अजिंक्यने तिचा हात दोन्ही हातात पकडला.



आता पुढे…



" बोल प्लीज. का अशी छळते आहेस मला?" आता मात्र अजिंक्यच्या डोळ्यात पाणी होते.




" मी कोण तुला तिच्याशी बोल किंवा नको बोलू सांगणारी? तू तिच्यासोबत खुश असशील तर मला काय अडचण आहे." ताराच्या ओठावर एक आणि मनात एक होतं.



'काहीही झालं तरी अजिंक्य समोर आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत.' तारा मनातच स्वतः ला बजावून सांगत होती.



" मग तू का बोलत नाहीये माझ्याशी पहिल्या सारखी? काय चुकलं माझं?" अजिंक्यने सरळ प्रश्न केला.



" काही नाही रे. आपली मैत्री तुझ्या प्रेमाच्या मध्ये यायला नको असं मला वाटतं." तारा



" आणि हे तू एकटीने ठरवलं! मला एकदा विचारावं असं पण नाही वाटलं का तुला?" अजिंक्य



" किती वेळा विचारलं तुला मी. की तुला पूजा आवडते का? तू काहीच बोलला नाहीस." तारा



" मी म्हणालो ती फक्त माझी मैत्रीण आहे. विसरलीस का तू?" अजिंक्य जरा रागावला होता.



" हो. पण मला वाटलं तुला नसेल इतक्यात कोणाला सांगायचं." तारा


.

" सगळं तू एकटीनेच ठरवून मोकळी झालीस ना! तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि तुला कसं कळत नाहीये माझ्या मनात काय सुरु आहे ?" अजिंक्यने ताराचा चेहेरा एका हाताने त्याच्या कडे वळवत तिच्या डोळ्यात बघत बोलत होता. 



आता पर्यंत लपवलेले भाव आज त्याच्या डोळ्यांत दिसत होते. त्याच्या गहिऱ्या काळया डोळ्यात अथांग प्रेमाचा सागर दिसत होता. खोल समुद्रा सारखे त्याचे डोळे. ज्याची गहराई कोणालाच कळत नाही अशा त्याच्या डोळ्यात खोल खोल बघून देखील फक्त प्रेम दिसत होते. अमर्याद प्रेम जे फक्त तारा साठी होते. त्यात इतर कोणीच नव्हते. त्याच्या काळया डोळ्यांत तारा हरवून गेली. तिला विश्वास बसतं नव्हता की अजिंक्य तिच्यावर प्रेम करतो. कसं कळणार होतं तिला या आधी ? कारण तिने इतकं निरखून त्याच्या डोळ्यात कधी बघितलं नव्हतच. आणि त्यांनी पण अतिशय चतुराईने त्याचे भाव लपवले होते. 



" अजिंक्य तू?" तारा चकित होऊन बोलत होती.



" हो मी. तुझ्या वर खूप प्रेम करतो. आज वर सांगितलं नाही तुला पण सांगणं गरजेचं आहे. बोल तारा होशील माझी?" अजिंक्य ताराचे बोलणें मध्येच थांबवत बोलला.



" मी तुला जेव्हा पहिल्या वेळेस बघितलं, तेव्हा पासूनच प्रेम करतो मी तुझ्यावर आज सांगतो आहे. इतके दिवस माझी हिम्मत होत नव्हती तुला सांगायची. पण आज जर नाही बोललो तर… नाही मी तुला गमावू शकत नाही. म्हणून आज तुला सरळ लग्नाची मागणी घालतो. असं ही आता आपलं कॉलेज संपणार आहे. येत्या काही वर्षांत पायावर उभं राहून लग्नं करू आपण. सांग तारा करशील माझ्याशी लग्नं?" अजिंक्य तारा समोर व्यक्त होत होता.



अजिंक्य बोलत होता. त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे कळल्यावर ताराला खूप आनंद झाला. पण दुसऱ्याच क्षणी तारा भानावर आली. तिच्या आनंदावर विरजण घालत तिने नकार देण्याचा निर्णय घेतला. मनातून तिला असं वाटतं होतं त्याला सांगावं की,


" अजिंक्य मी पण खूप प्रेम करते तुझ्यावर. मी ह्याच जन्मात काय येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुझीच होईल. मला तुझ्या सोबत आयुष्यभर रहायचं आहे. तुझ्या हातात हात घालून फिरायच आहे. तुझ्या प्रेमळ उबदार मिठीत हरवून जायचं आहे." पण नाही ती हे सगळं त्याला सांगू शकत नव्हती. मनात असंख्य वेदना होत होत्या. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच नकार द्यायचा होता. तारा स्वतः शी बोलत होती.



" पण मी नाही प्रेम करत तुझ्यावर. तू असा विचार तरी कसा केला? " तारा चेहेऱ्यावर खोटे रागाचे भाव आणत बोलली.



" खोटं साफ खोटं. तारा मला दिसतं तुझ्या डोळ्यात माझ्या बद्दलचे प्रेम. तुला चांगलं ओळखतो मी. तू खोटं बोलू शकत नाहीस हे तुला पण चांगलं माहीत आहे. मग का खरं सांगत नाहीस?



तारा मान्य कर की तू सुद्धा माझ्या वर प्रेम करतेस. हेच योग्य आहे आपल्या दोघांसाठी. तुला वचन देतो की तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेल. तुला कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. तुझी काळजी घेईल मी. पण खरं सांग तारा. तुला माझी शपथ आहे." अजिंक्य काकुळतीला येऊन बोलत होता.



त्याच्या अशा बोलण्याने ताराला अजूनच वेदना होत होत्या. 'खरं मी सांगू शकत नाही. आणि खोटं मी बोलू शकत नाही. काय करू? माझ्या भूतकाळाचे सावट माझ्या प्रेमावर पडलेच आहे पण ज्यावर प्रेम करते त्याच्यावर नाही पडू देणार मी. मला त्याला समजावून सांगावं लागेल.' तारा विचार करत होती. शेवटी तिने काहीतरी मनात ठरवले. आणि बोलू लागली. 




"अजिंक्य ऐक माझं, तुला खूप चांगली मुलगी मिळेल. यू डीझर्व दी बेस्ट. आणि बेस्ट मी नाहीये. तुझ्या योग्य मी नाही. तुला थोडा त्रास होईल मला विसरायला पण हे तुझ्या भल्यासाठी आहे. त्यामुळे तू माझा विचार सोडून इतर कोणाचा विचार कर. बघ पूजा चांगली मुलगी आहे." तारा अजिंक्यला समजावण्याचा प्रयत्न करत होती.



तिचे बोलणे मध्येच थांबवत अजिंक्य ने तिचा हात परत घट्ट पकडला आणि बोलू लागला.



"आता लेक्चर संपेल आणि मला विषय अर्धवट सोडायचा नाही आज. चल इथून जाऊ आपण." असं म्हणत तो ताराला घेऊन कॉलेजच्या बाहेर घेऊन गेला. दोघे त्याच्या बाईक वर बसले आणि तो तिला थेट त्याच्या घरी घेऊन आला. त्यावेळी त्याच्या घरी कोणीच नव्हते. त्यामुळे बोलण्यासाठी त्याच्या घरा इतकी शांत आणि सुरक्षित जागा इतर कुठलीच त्याला वाटली नाही.



दोघे घरात आले. अजिंक्यने ताराला पाणी दिले. परत तिचा हात पकडला.



" तारा मला इतर कोणी नको आहे. मला तू हवी आहेस. फक्त तू. तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर मी हा अट्टाहास सोडून दिला असता. आणि तुझ्यावरच प्रेम करत राहिलो असतो. पण मला माहित आहे की, तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. तारा तू स्वतः ला फसवू शकतेस पण मला नाही. मला बाकी काही ऐकायचे नाहीये. ना पूजा ना इतर कोणीच नको मला आपल्यात. मला फक्त तुझ्या कडून सत्य ऐकायचे आहे. तू बोल नाहीतर मला शेवटचं बघते आहे असं समज." अजिंक्यचा संयम सुटत चालला होता. 


" अजिंक्य प्लीज असं नको बोलूस. मी मान्य करते की माझं तुझ्या खूप प्रेम आहे. पण ह्या प्रेमाची जाणिव मला पूजा जेव्हा तुझ्या जवळ आली तेव्हा झाली. मला खूप राग येतो तिचा. नाही बघू शकत तुला तिच्या सोबत." तारा रडत रडत बोलत होती.



"इतकं प्रेम आहे तर मग नकार का तुझा? विश्वास नाही का माझ्यावर?" अजिंक्य तिचे डोळे पुसत बोलला.



" तसं नाही. तुझ्या वर खूप विश्वास आहे माझा. पण…" तारा बोलता बोलता थांबली आणि उठून उभी राहिली.



" तारा सांग मला काय आहे, जे तुला माझ्या पासून दूर करत आहे? जो काही प्रोब्लेम असेल आपण मिळून सोडवू. तारा मी तुझ्या सोबत आहे नेहमी. विश्वास ठेव माझ्यावर." अजिंक्यने हळूच ताराला जवळ खेचत तिचे हात पकडून तिला विश्वासात घेतले.



ताराने त्याला आधी एक घट्ट मिठी मारली त्याच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कधीही न रडणाऱ्या ताराला अजिंक्य असं बघत होता. काहीवेळ ती अशीच त्याच्या मिठीत रडत होती. अजिंक्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. तिचं मन मोकळं होणं गरजेचं होतं.



" शांत हो. आज रडून घे नंतर मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसायला नको. मला नाही आवडत तुझ्या डोळ्यात पाणी. तारा सांग मला काय झालं आहे?" अजिंक्य एका हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवत दुसऱ्या हाताने तिला अजून घट्ट मिठीत घेत बोलला.



थोडावेळ अजून तारा त्याच्या मिठीत शांत होण्याचा प्रयत्न करत होती. नंतर बाजूला होत तारा अजिंक्यच्या डोळ्यात बघून बोलू लागली.



" अजिंक्य मी आता के काही सांगणार आहे त्या नंतर कदाचित तु माझ्या पासून दूर जाशील." तारा





असं काय सांगणार आहे तारा की ज्यामुळे अजिंक्य तारा पासून दूर जाईल. खरंच असं होईल का? की नाही? जाणून घेण्यासाठी वाचत रहा. फिर भी तुमको चाहुंगा.





क्रमशः


0

🎭 Series Post

View all