Login

आमचं वेगळं आहे.. भाग १६

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १६


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्धच्या बॉसची बायको अनिरुद्धला वेश्याव्यवसायात खेचते. आता बघू पुढे काय होते ते.


" तिने हाताची नस कापून घेतली? पण का?" सानवी ब्लँक झाली होती.

" तिचे म्हणणे आहे तिला मला गमवायचे नाहीये." अनिरुद्ध सानवीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता.

" तुलाही ती आवडते?" सानवीने डोळे बारिक करत विचारले.

" हो.. थोडीफार.. म्हणजे जरा जास्तच. ती कशी थोडीशी बोल्ड, थोडीशी सेक्सी.." अनिरुद्ध बोलत होता.

" मग तिच्यासोबत करायचे ना लग्न. कशाला माझ्यासोबत ही नाटके करायची?" सानवी चिडली होती.

" केलं असतं ना.. पण तिचा नवरा आहे ना अजून. ती त्याला सोडायला तयार नाही."

" अनिरुद्ध.. तू चीटर आहेस.. वाईट आहेस.. दुष्ट आहेस." सानवी रडत अनिरुद्धला बुक्के मारू लागली.

" पण त्यासोबतच एका वेड्या, रागीट बायकोचा नवराही आहे. नीट ऐक. एकदाच आणि शेवटचे सांगतो. तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच माझे प्रेम आहे. तू यायच्या आधी जे काही माझ्यासोबत झाले तो फक्त एक शारिरीक व्यवहार होता. मन तर माझे कोणाशीच जुळले नाही. तू.. फक्त तूच.." अनिरुद्ध सानवीला मिठीत घेत म्हणाला.

" याच्यापुढे इतर कोणत्याही बाईचे कौतुक तर कर माझ्यापुढे.. चांगली बघते तुला." नाक पुसत सानवी म्हणाली.

" मुलीचे चालेल??"

" अनिरुद्ध.. मी बोलणार नाही तुझ्याशी."

" ही शिक्षा आहे की बक्षिस?"

" मी जातेच इथून.." सानवी रडवेली होत उठून म्हणाली.

" मी सोडलं तर ना?" अनिरुद्ध हसत म्हणाला. त्याच्या डोळ्यातले भाव बघून सानवी लाजली.

" निघूयात.. आपण रस्त्यावर आहोत. आणि प्रेमाने पोट भरत नाही. मला भूक लागली आहे." दोघेही हातात हात घालून निघाले.

" गाडी कोणी चालवायची?" अनिरुद्धने विचारले.

" तूच चालव.. मी फक्त माझ्या नवर्‍याला इथे बसून छळणार आहे." सानवीचे बोलणे बघून अनिरुद्ध हसू लागला.

" तू बघितलंस, सासूबाईंनी मला गिफ्ट म्हणून या बांगड्या दिल्या. आईने तिचे दागिने दिले. तूच मला काही दिले नाहीस." सानवी नॉनस्टॉप बोलत होती.

" तू काकूंना फोन केला आहेस का, आपण घरी येतो आहे म्हणून?" अनिरुद्धने विचारले.

" कधी करणार? आईला फोन करायला गेले आणि तुझा फोन वाजला ना." सानवी तक्रार करू लागली. "थांब सांगते आईला फोन करून." सानवीने फोन हातात घेतला.

" थांब.. फोन नको करूस मग.. म्हणजे फोन कर पण आपण आज येतो आहोत हे नको सांगू." अनिरुद्धला सानवीच्या गोंधळात पडलेल्या चेहर्‍याकडे बघून मजा येत होती.

" म्हणजे?"

" वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान.. "

" सांग ना.."

" मला नवरा मानतेस?"

" हो.."

" मग एकही प्रश्न विचारू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव." दोघे आधी हॉटेलमध्ये भरपेट जेवले. यावेळेस मात्र अनिरुद्ध समोर न बसता सानवी शेजारी बसला होता.

दोघेही रमतगमत गप्पा मारत शहरात पोहोचले. पण अनिरुद्धने गाडी भलत्याच रस्त्यावर घेतली.

" आपण नक्की कुठे चाललो आहोत?" सानवीच्या आवाजात भिती होती.

" लग्न करताना घाबरली नाहीस आणि आता घाबरते आहेस?" अनिरुद्ध कूल होता.

" तसं नाही पण..." सानवी गप्प बसली.

" विश्वास ठेव.. तुझ्या मनाविरुद्ध आणि चुकीचे काहीच होणार नाही. तिच्या हातावर थोपटत अनिरुद्ध म्हणाला. अनिरुद्धने गाडी एका सोसायटीमध्ये घेतली. इतका वेळ शूरपणाचा आव आणणारी सानवी गप्प झाली होती. तिचा मूड नाही हे बघून अनिरुद्ध पण बोलत नव्हता.

" उतरायचे?" अनिरुद्धने विचारले.

" आपण कुठे आलो आहोत?"

" फक्त दोन मिनिटे.." अनिरुद्धने सानवीकडे हात मागितला. घामाने ओला झालेला तिचा हात हातात घेताना अनिरुद्धला हसू येत होते. पण त्याने ते दाबले होते.

" मी तुझे डोळे रुमालाने झाकू?" अनिरुद्धने विचारले. सानवीने मान हलवली. डोळे झाकलेल्या सानवीला त्याने हात धरून लिफ्टमधून बाहेर यायला मदत केली.

" एकच मिनिट हं.." तिला तिथेच उभं करून तो म्हणाला. सानवीला दरवाजा उघडल्याचे, अनिरुद्ध आत गेल्याचे समजले. पण त्याचे काय चालू आहे, हे समजत नव्हते.

" रुमाल काढू का?" सानवीने विचारले.

" एकच मिनिट.." अनिरुद्ध बाहेर आला.
" थांब. मीच काढतो तो रुमाल." हळूवार हाताने अनिरुद्धने रुमालाची गाठ सोडली. सानवीने डोळे उघडले. दरवाजात माप ठेवले होते. आत एका ताटात कुंकवाचे पाणी होते. ते बघून सानवीच्या डोळ्यात पाणी आले.

" ये आत.. "
सानवीने माप ओलांडले. ताटात पाय ठेवले. तिची लक्ष्मीची पावले त्या घरात उमटली.

" माझ्या बायकोला लग्नाची भेट.. हे घर आणि मी." अनिरुद्ध सानवीकडे बघून हात पसरत म्हणाला. सानवी अनिरुद्धच्या मिठीत शिरली.

" पहिला गृहप्रवेश तुझ्या आईबाबांच्या घरी झाला, दुसरा माझ्या आणि हा आपल्या घरातला.." आपल्या शब्दावर जोर देत अनिरुद्ध म्हणाला.

" खूप छान गिफ्ट आहे हे." सानवी रडत होती.

" रडतेस काय? मला वाटलं तुला आनंद झाला असेल. "

" हे आनंदाचे अश्रु आहेत.." सानवी अनिरुद्धच्या छातीवर बुक्का मारत म्हणाली.

" चल, तुला घर दाखवतो.. " अनिरुद्ध सानवीचा हात धरून निघाला.

" छोटेसेच आहे.. " अनिरुद्ध बोलत होता.

" पण आपले आहे.." सानवीने वाक्य पूर्ण केले.

" हे स्वयंपाकघर आणि हे बेडरूम.." सानवीने बेडरूममध्ये पाऊल ठेवले. तिथे भिंतीवर तिचा एक फोटो मोठा करून लावला होता.

" माझा फोटो तुझ्याकडे कुठून आला?" आश्चर्याने सानवीने विचारले.

" पृथाने पाठवला होता.." सानवीच्या मानेवर ओठ ठेवत अनिरुद्ध पुटपुटला. सानवीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने खोलीत प्रवेश केला. खोली स्वच्छ आणि नीटनेटकी दिसत होती.

" हे सगळं तू आवरतोस?" सानवी इकडेतिकडे बघत म्हणाली. त्या छोट्याश्या खोलीत व्यायामाचे साहित्य नीट लावून ठेवलं होतं.

" नाही. कामवाल्या मावशी येऊन करून जातात."


" तू रोज वर्क आऊट करतोस?" सानवीने ट्रेडमिलला हात लावत विचारले.

" करावे लागते.." अनिरुद्ध तिच्या पाठी पाठी फिरत होता. घर बघता बघता सानवी आरशासमोर जाऊन उभी राहिली. आणि स्वतःला बघतच राहिली. नेसलेली साडी, प्रवासाने थकलेला चेहरा.. पण तरिही चेहर्‍यावर असलेले तेज.. लग्नाचे की प्रेमाचे? अनिरुद्ध तिच्यापाठी येऊन उभा राहिला. त्याने तिला पाठून मिठी मारली.

" जास्त वेळ आरशात बघून नकोस.. माझ्या बायकोला दृष्ट लागेल."

" काहिही असतं तुझं.." सानवी लाजली.

" खरं.. बघ किती सुंदर दिसते आहे ती." अनिरुद्धचा हात सानवीच्या खांद्यावर आला. त्याने तिला स्वतःकडे वळवले. तो पुढे येणार तोच सानवी मागे झाली.

" एक विचारू?"

" काय?" सानवीच्या वागण्याने अनिरुद्ध थोडा नाराज झाला होता.

" याआधी तू इथे कोणासोबत आला होतास?" सानवीने घाबरतच विचारले.

" सानवी.. हे घर आहे माझं.. घर.. तू दमली असशील. तू झोप इथे. मी बाहेर सोफ्यावर झोपीन.. त्याआधी काय खाणार ते सांग. बाहेरून मागवतो नाही तर घरी करतो." अनिरुद्ध चिडला होता.

" अनिरुद्ध प्लिज.. " सानवी काकुळतीला आली होती.

" सानवी.. आपण आत्ता नको बोलूयात. तुम्हाला जर माझी भिती वाटत असेल तर आपण तुमच्या घरी जाऊया. मला चालेल ते ही."

" अनि.. नको ना चिडूस.. समजून घे ना मला."

" तुम्हीच परवा म्हणाला होता ना काय हरकत आहे.. म्हणूनच जवळ आलो होतो मी.. माझीच चूक झाली." अनिरुद्ध पलंगाच्या एका टोकाला डोकं धरून बसला होता.

" थोडंसंच समजून घे ना मला. दुपारी तू मला एवढं काही सांगितलंस आणि आत्ता लगेच हे असं.. मला धक्क्यातून सावरायला तर वेळ दे. आणि विचार कर ना मला अवघड नाही का जाणार?" सानवी अनिरुद्धसमोर गुडघ्यावर बसून रडत होती.

पहिल्या प्रेमातलं पहिलं भांडण.. मिटेल की वाढेल ? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्कीच सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all