अँम्ब्युलन्स..

अँब्युलन्स..
#अनुप्रियाच्या लेखणीतून..
#रुग्णवाहिका


“मला दुरून जरी ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज कानावर पडला ना की धडकीच भरते बघ. देव जाणे कोणाच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय!”

हायवेवरून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सकडे घाबरलेल्या नजरेने पाहत प्रिया तिच्या मैत्रिणीला, सायलीला म्हणाली.

“हो गं, खरंय प्रिया.. देव करो आणि कोणावरचं तशी वेळ येऊ नये गं.”

सायली तिच्याकडे पाहत काळजीच्या सुरात म्हणाली.

“सासूबाई आजारी होत्या नां तेव्हाची गोष्ट आठवतेय ना मला.. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता आणि माझ्या सासूबाई अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. आम्ही सगळे प्रचंड घाबरलो होतो. यांची अवस्था तर विचारूच नकोस. आई म्हणजे यांचा जीव की प्राण.. त्यावेळी वेळेत ॲम्ब्युलन्स नसती आली तर आज सासूबाई…”

बोलताना सायलीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांत पाणी आलं.

“खरंय गं सायली, आपल्याला वेळीस मदत मिळाली म्हणूनच तर आज सुमतीकाकूंचा जीव वाचला. नाहीतर काय झालं असतं देव जाणे! पण बघ ना, कधी कधी वाटतं, या ॲम्ब्युलन्सच्या पोटात किती सुखदुःखं दडली असतील? त्यात असणारा पेशंट कोणत्या वेदनेतून जात आहेत हे तिलाच सर्वांत आधी कळत असेल ना? त्याच्या नातेवाईकांच्या जीवाची तगमगही तिला जाणवत असेल? आत झोपलेला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरची गर्दी कापत भरधाव वेगाने निघालेली, संपूर्ण रस्ताभर सायरन वाजवत जाणारी ती ॲम्ब्युलन्स किती जणांच्या मनावर भीतीचे सावट पसरवत असेल? त्या बंद दरवाजाच्या गाडीत किती गुपितं दडलेली असतील हे त्या परमेश्वरालाच ठाऊक!”

प्रियाने सायलीकडे पाहिलं.

“हं.. खरंय तुझं..”

“पण तरीही ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज नकोसाच वाटतो. ऐकला तर धडकीच भरते बघ!”

प्रियाच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. अचानक कूस बदलावी तशी निसर्गाने क्षणार्धात कूस बदलली. सोसाट्याचा वारा सुटला. संध्याकाळचं ऊन जाऊन आभाळ दाटून आलं. आणि एखाद्या आगंतुकासारखा पाऊस बरसू लागला. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. रस्त्यावरची गर्दी घाईने पावसापासून वाचण्यासाठी आजूबाजूला, झाडांचा, रस्त्याच्या कडेच्या दुकानांचा आडोसा शोधू लागली. सायलीचा निरोप घेऊन प्रिया लगबगीने घराच्या दिशेने निघाली. मनात विचारांचं काहूर दाटलं. जणू पावसाच्या सरीबरोबर आठवणीही धावत येऊन तिला बिलगू लागल्या होत्या. लहानपणापासूनचा काळ एखाद्या चित्रफितीसारखा तिच्या नजरेसमोरून सरकत होता.

ती आठ नऊ वर्षाची असताना पहिल्यांदा तिने ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज ऐकला होता. पहिल्यांदा पांढऱ्या रंगाची ॲम्ब्युलन्स त्यांच्या सोसायटीच्या आवारात थांबलेली पाहिली होती. आजूबाजूला शेजारीपाजारी जमले होते. एकमेकांत कुजबुज सुरू होती. त्या ॲम्ब्युलन्समधून खाली उतरवलेल्या पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून घरी आणलेला महादेवमामांचा मृतदेह आणि त्या पार्थिवाला कवटाळून रडणारी तिची जिजाआत्या तिला जशीच्या तशी डोळ्यांसमोर दिसू लागली. तिचा कानठळ्या बसवणारा आर्त टाहो तिला आजही स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यानंतर आजीच्या शेवटच्या दिवसांत, आईचं आजारपण, बाबांचा अस्थमा. त्यामुळे त्या दोघांची ढासळलेली प्रकृती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी बोलवावी लागलेली ती पांढरी ॲम्ब्युलन्स.. त्यानंतर मग प्रियाच्या आयुष्यात कुठल्या न कुठल्या वळणावर, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती सफेद रंगाची ॲम्ब्युलन्स तिला भेटत राहिली आणि प्रियाच्या मनात ॲम्ब्युलन्सविषयीची भीती कायमची घर करून राहिली. आताही त्या साऱ्या घटनावळी तिच्या डोळ्यांसमोर फेर धरू लागल्या होत्या. आईबाबांच्या काळजीने डोळे आपोआप झरू लागले.

बराच वेळ झाला तरी पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. अचानक आलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला होता. प्रिया तिच्या घराजवळ पोहचली. ‘वासंती निवास’ पावसाच्या सरीनी न्हाऊन निघाला होता. बंगल्याचं प्रवेशद्वार लोटून झपाझप पावलं टाकत ती पुढे निघाली. दारात पायातल्या चपला काढत असताना तिचं लक्ष दारातल्या तुळशी वृंदावनाकडे गेलं. जणू वृंदावनातल्या तुळशीलाही पावसाचा थेंबाचा मारा सहन होत नसावा. तुळशीला पाहून तिला उगीच वाईट वाटलं. ती निथळत्या ओल्या अंगानं आत आली. तिने पाहिलं, तिचे सासरे आतल्या खोलीत काहीतरी वाचत बसले होते आणि सासूबाई हॉलमध्ये हातात जपमाळ घेऊन जप करत बसल्या होत्या.

"गो प्रिया, पावसाचा खय रवलेलं? कितको येळ झालो? काय ह्यां? भिजान इलं बग."

“हो आई, अचानक पाऊस सुरू झाला नं.. चिंतामणीकाकांच्या दुकानात थांबले होते म्हटलं थांबेल जरा.. पण कसलं काय! हा थांबायचं नावाच घेईना. मग काय! निघाले तशीच चालत आणि मग घरी येईपर्यंत भिजले थोडं.. त्यामुळे यायला उशीर झाला. आई, मी पटकन स्वयंपाक उरकून घेते. पाऊस कसला भयानक कोसळतोय बघा.. वेड्यासारखा.. कदाचित लाईट जाईल आणि लाईट गेली तर अजून पंचाईत व्हायची.”

प्रियाने असं बोलायचा अवकाश आणि घरातले लाईट गेली. सर्वत्र अंधार पसरला.

“अरे रामेश्वरा! बोलायचो अवकाश, गेलीच लगेच.. आता कसा स्वयंपाक बनवशील?”

“आई, दुपारची थोडी भाजी पोळी शिल्लक आहे. तुमच्यासाठी गरम गरम मुगाची खिचडी आणि कढी बनवते. केदार येईलच इतक्यात.. मग आपण सगळेच जेवायला बसूया हं..

“तू आधी कपडे बदलून घे बाय.. नीट केस पुसून कोरडे कर नाहीतर आजारी पडशील बरं. आणि हो तुझं आवरलं की, आपल्या सर्वांसाठी मस्त आलं घालून कडक चहा बनव.”

प्रियाच्या सासूबाईंनी फर्मान सोडलं. प्रियाने मान डोलावली. बाथरुममध्ये जाऊन अंगावरचे ओले कपडे बदलून अंगावर गाऊन चढवला. गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि टेबलवर ठेवलेल्या मेणबत्त्या पेटवल्या. साऱ्या घरभर मेणबत्यांचा मंद प्रकाश पसरला. प्रियाने तिच्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना चहा दिला आणि स्वयंपाकाची तयारी करू लागली. बराच वेळ झाला तरी पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. लाईट अजून आली नव्हती. प्रियाने तसंच मेणबत्तीच्या प्रकाशात कसाबसा स्वयंपाक उरकला आणि तिने सासूबाईंना आवाज दिला.

“आई, तुम्ही आणि बाबा जेवून घ्या पटकन. तुमची औषधं सुरू आहेत ना? वेळ नको चुकवायला.. मी केदार आल्यावर त्याच्यासोबतच जेवेन.”

सासूबाईंनी होकारार्थी मान डोलावली. प्रियाने त्या दोघांना जेवण वाढलं. यथावकाश दोघांची जेवणं झाल्यावर तिने त्यांना त्यांची नेहमीची औषधं दिली. त्यांना आराम करायला त्यांच्या खोलीत पाठवून ती पुन्हा खिडकीत बसून केदारची वाट पाहू लागली. सहा महिन्यापूर्वीच ती लग्न करून सावंतांच्या घरी आली होती. नवरा बायको, सासू सासरे असं छोटंसं कुटुंब. केदार, तिचा नवरा इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. दोघा राजाराणीचा संसार नव्याने फुलू पाहत होता. आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून वयोवृद्ध आईवडिलांच्या डोळे तृप्त झाले होते. सारं काही छान सुरू होतं. पाऊस धो धो कोसळत होता. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. प्रियाला खूप अस्वस्थ वाटत होतं. ती खिडकीतून उठून आली आणि हॉलमध्ये येरझाऱ्या घालू लागली.

“बारा वाजत आले. अजून कसा आला नाही? इतका उशीर कधीच होत नाही त्याला.. एरवी कधी उशीर होणार असेल तर तो मला तसं कळवतो; पण आज तसं त्याने काही सांगितलंही नाही. पावसामुळे उशीर झाला असेल. कदाचित ट्रेनही लेट असतील. येईलच. कॉल करून बघते.”

स्वतःच्या मनाची समजूत काढत तिने केदारला कॉल लावला; पण त्याचा फोन लागत नव्हता.

“काय हा पाऊस! अचानक आलाय आणि आता थांबायचं नावच घेत नाहीये. केदारचा फोनही लागत नाहीये. पावसामुळे नेटवर्क इश्यू असेल कदाचित.. चैतन्यभावोजींना कॉल करू का? दोघे मित्र कायम सोबतच असतात ना? पण इतक्या रात्री त्यांना कॉल करणं बरं दिसेल? नको.. थोडी वाट पाहते. पण कुठे गेला असेल तो? पावसामुळे कुठे अडकला तर नसेल?”

प्रिया स्वतःशीच पुटपुटली. गळ्यातल्या मंगळसूत्राशी बोटांचा चाळा सुरू झाला. डोळ्यांत काहूर दाटू लागलं. आणि एकदम जोराचा वारा खिडकीतून आत आला खिडकीचे तावदान जोरात आपटलं. भिंतीवर लटकवलेला आरसा निखळून खळकन खाली पडला. काचेचे तुकडे खाली जमिनीवर पसरले. आणि अचानक गळ्यातल्या मंगळसूत्रांची एक पोत सटकन निखळली. प्रियाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आणि एकदम दुरवरून येणारे ॲम्ब्युलन्सच्या सायरनचे स्वर जवळ येताना भासू लागले. तो आवाज अगदी तिच्या दाराजवळ येऊन ठेपला होता. ती कशीबशी पायांत त्राण आणून दारात जाऊन उभी राहिली आणि समोर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सकडे भेदरलेल्या नजरेने पाहू लागली.

समाप्त.
©अनुप्रिया