Login

आमचं वेगळं आहे.. भाग ६

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ६

मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध सानवीच्या आईबाबांना भेटतो. त्यांना तो आवडतो. आता बघू पुढे काय होते ते.


" तुम्ही आता कायदेशीररीत्या नवराबायको झाला आहात. अभिनंदन." मॅरेज रजिस्ट्रारने सानवी आणि अनिरुद्धचे अभिनंदन केले. पार्थ, पृथा आणि अनिरुद्धचे दोन अगदी जवळचे मित्र आले होते. त्यांनी येताना हार आणले होते. त्यांनी ते एकमेकांना घालायला सांगितले. अनिरुद्धने सानवीकडे बघितले. हिरव्या रंगाची नेसलेली साडी, हलकासा मेकअप. आधीच गोड दिसणारी ती अजूनच छान दिसत होती. बहुतेक शोभाताईंनी तिला मेंदी काढायचा आग्रह केला होता. हातभर काढलेली मेंदी छान रंगली होती. हार घालताना आलेला मेंदीचा वास त्याला बेभान करून गेला होता.

" जिजू.. घालताय ना हार?" पार्थने विचारले.

" अं.. हो.. " अनिरुद्ध भानावर येत म्हणाला.

" मला हे लग्न अजिबात आवडलेले नाही." पार्थ नाक मुरडत बोलला.

" का?" सानवीने धास्तावत विचारले.

" कारण, मला यांचा कानच पिळता आला नाही. त्यामुळे गिफ्टही नाही मिळाले." पार्थ हिरमुसला होता. ते ऐकून सगळे हसू लागले.

"आता मी तुमच्याकडेच राहणार आहे. मग हवा तेवढा कान पिळ. आणि गिफ्ट म्हणशील तर तुला हवं ते घेऊ.." अनिरुद्ध पार्थची समजूत काढत म्हणाला. गाडीत बसून सगळे घरी यायला निघाले. घरी शोभाताईंनी औक्षणाचे ताट तयार ठेवले होते. त्यांनी दोघांचे औक्षण केले आणि आत यायला सांगितले.

" ए आई, तू ते दरवाजात नाही ठेवलंस? ते लग्न झाल्यावर नवरी पायाने उडवते ते?" उत्साही पार्थने विचारले.
शोभाताई गोंधळल्या..

" ते मुलीच्या गृहप्रवेशाच्या वेळेस असते."

" मग आज मुलाचा गृहप्रवेश समजा." अनिरुद्ध आश्वासक हसत बोलला. शोभाताईंनी प्रदीपरावांकडे बघितले. त्यांनी डोळ्यांनी होकार दिला. शोभाताईंनी पटकन मापटे भरून आणले. अनिरुद्धने सानवीकडे बघितले आणि दोघांनी मिळून मापटे ओलांडले. शोभाताई आणि प्रदीपराव समाधानाने त्यांच्याकडे बघत होते. आत येताच नवीन जोडप्याने शोभाताई आणि प्रदीपरावांना नमस्कार केला.

" तुम्ही लग्न रजिस्टर केले. पण आमचा जीव काही रहात नाही.. उद्या निदान सत्यनारायणाची पूजा तरी करूयात का?" शोभाताईंनी विचारले.

" चालेल की.. " अनिरुद्ध अजून पुढे बोलणार तोच त्याचा फोन वाजला. नंबर बघून त्याचा चेहरा बदलला. त्याने फोन उचलला. पण फक्त हं हं करत होता. सानवी त्याचे हावभाव बघत होती. अनिरुद्धने फोन ठेवला.

" थोडं महत्त्वाचं काम आहे. मला जावं लागेल." अनिरुद्ध म्हणाला. ते ऐकून सगळ्यांचा चेहरा उतरला.

" आत्ताच तर लग्न झाले आहे." सानवी बोलून गेली. अनिरुद्धने चमकून तिच्याकडे बघितले. सानवी इथे तिथे बघू लागली.

" टाळता येणार नाही.. जावेच लागेल. मला हे कपडे बदलावे लागतील." शेरवानीकडे हात दाखवत अनिरुद्ध म्हणाला.

" सानवी, तुमची बेडरूम दाखव त्याला. त्याची बॅगही ठेव तिथेच ." शोभाताई म्हणाल्या.

" हो.. " उदास चेहर्‍याने सानवी बेडरूमकडे वळली. तिच्यापाठोपाठ अनिरुद्ध आला. सानवीने त्याला दरवाजा ओढून घ्यायला सांगितले.

" आत्ताही तुम्ही त्याच कामाला जाणार का?" तिने खोचकपणे विचारले. सानवीचे बोलणे ऐकून अनिरुद्धला राग आला.

" तुम्ही माझी अट विसरता आहात."

" पण तुम्ही जर हे लग्न करायला तयार झालात तर लग्नाच्या दिवशी जाणे योग्य आहे का?" सानवी आवाज न चढवता बोलत होती.

" मान्य आहे.. पण तरिही मला जावेच लागेल." अनिरुद्ध म्हणाला. यावर सानवीने फक्त खांदे उडवले.

" मी आहे बाहेर."

" एक मिनिट. तुम्ही एकट्याच लगेच बाहेर गेलात तर तुमच्या आईबाबांना संशय येईल. तुम्ही तिकडे तोंड करा. मी पटकन कपडे बदलतो."
सानवीने तोंड फिरवले. अनिरुद्ध कपडे बदलू लागला. पण आरशात सानवीला सगळे दिसत होते. त्याची बिल्ड बघून ती गारच झाली.. तिची आरशातून एकटक बघणारी नजर त्याला जाणवली. पटकन कपडे बदलून तो तिच्याजवळ आला.

"तुम्ही तर पहिल्याच दिवशी सगळे नियम मोडत आहात." अनिरुद्ध सानवीच्या डोळ्यात बघत बोलला.

" मी काय नियम मोडले?" सानवी ही धीटपणे त्याच्याकडे बघत होती.

"मगाशी माझ्या कामाबद्दल विचारणं, आता मला कपडे बदलताना लपूनछपून बघणं.. शोभतं का?" अनिरुद्ध सानवीच्या जवळ येत होता. सानवीचा श्वास वाढू लागला.

" यावर काय करायचे?"

" रात्री आल्यावर सांगतो."

" तुम्हाला यायला रात्र होणार?" सानवी परत जमिनीवर आली. तिच्या बदललेल्या आवाजाने तो ही भानावर आला.

" सॉरी.. जरा जास्तच बोललो. परत असं होणार नाही." दरवाजा उघडून अनिरुद्ध कधी बाहेर पडला सानवीला समजलेही नाही.

" सानवी.. तुमचं नक्की एकमेकांवर प्रेम आहे ना?" आईने आत येत विचारले.

" हो ग.. असं का विचारतेस? " डोळे पुसत सानवी बोलली.

" तू रडते आहे ना?" आईला काळजी वाटत होती.

" तू पण ना आई.. बाकी आई मुली लग्नाच्या दिवशी रडत नाही म्हणून टेन्शन घेतात.. आणि तू?" सानवी हसण्याचा प्रयत्न करत बोलली.

" सानवी.. तू काही चुकीचे नाही ना करत आहेस?" आईने शंकेखोरपणाने विचारले.

" नाही ग आई.. चल आपण काहीतरी खायला करू. मी कपडे बदलते." सानवी आईचा मूड हलका करत बोलली. ती कपडे बदलायला गेली तेव्हा तिच्या मोबाईलवर अनिरुद्धचा मेसेज झळकत होता.

" लवकर येण्याचा प्रयत्न करतो."

" सानवी, बघ जरा अनिरुद्ध कुठे अडकला आहे." बाबांनी सानवीला सांगितले.

" बाबा, तुम्ही जेवून घ्या ना.. ते येतील तेव्हा जेवतील. मी थांबते त्यांच्यासाठी." सानवी अडखळत बोलली.

" अग पण आज त्याचा घरातला पहिला दिवस.. त्याला काय वाटेल?" बाबांना त्याच्याशिवाय जेवायला कसंतरी वाटत होतं.

" काही नाही वाटत. तुम्ही जेवून घ्या. तुम्हाला औषधे घ्यायची आहेत. आई, पार्थ तुम्ही ही जेवायला बसा. मी वाढते." सानवी हसून बोलली. तिघांची जेवणे होऊन ते झोपले तरीही अनिरुद्धचा पत्ता नव्हता. सानवीला स्वतःचा राग येत होता. कोण कुठला तो.. त्याच्यासाठी ती उपाशी, वाट बघत बसली होती.. आणि तो.. तो काय करत असेल आता? एखाद्या बाईसोबत?? तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळला. भावनिक गुंतागुंत नको म्हणून लग्न नको म्हणत होते आणि बघता क्षणीच याच्या प्रेमात पडले.. पण त्याला काहीतरी आहे का याचे? तिचे एक मन सांगत होते की अनिरुद्धला फोन कर पण दुसरे हट्टी मन सांगत होते गेला उडत. नकोच हे गुंतणे.


सानवीचे अनिरुद्धवर प्रेम बसले आहे. पण त्याचे आहे का तिच्यावर प्रेम? बघू पुढील भागात काय होते ते. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all