आमची पद्धत भाग 1
©️®️शिल्पा सुतार
जलद लेखन स्पर्धा
विषय लग्नसंस्था
विषय लग्नसंस्था
मध्यम वर्गीय कुटुंबातली सकाळची वेळ होती. प्रदीपराव नेहमी प्रमाणे पेपर वाचत होते. सुरेखाताई देवपूजा करत होत्या.
समीर ऑफिसला जायला रेडी होता. अदिती किचन मधे त्याचा डबा भरत होती. तिने बघितलं सगळे हजर होते. तिने पटकन उपमाच्या डिश भरल्या. डायनिंग टेबलवर नेवून ठेवल्या. ती चहा गाळत होती.
" आई, बाबा चला नाश्ता करून घ्या." समीर आवाज देत होता. ते येवून बसले.
मीना आली. ती फोनवर बोलत होती. सुरेखाताई ती काय बोलते तिकडे लक्ष देवून होत्या. तिने उपमा बघितला. नाक मुरडलं.
"आई आज उपमा कोणी केला?" मीना डिशकडे बघत म्हणाली.
" तुझ्या वहिनीने." सुरेखा ताईंनी सांगितलं.
"त्यात टोमॅटो का टाकला? मला आवडत नाही." मीना म्हणाली.
" अदितीला कोण सांगेल. किती वेळा तिला इकडच्या पद्धती शिकवा. पण तिच्या काही लक्ष्यात येईल तर शप्पथ." सुरेखाताई म्हणाल्या.
" आता जे केल ते खा. चव छान आहे. " प्रदीपराव म्हणाले.
" आई वहिनीला सांग ना. असे काहीही पदार्थ करुन ठेवते. सकाळी सकाळी मूड जातो. आज एक तर कॉलेज मधे खूप लेक्चर आहेत." मीना म्हणाली.
समीर सगळं ऐकत होता.
" अदिती इकडे ये. "
ती मीनाचा डबा घेवून आली." घे ग लोणचं ही दिल आहे."
" आपण उपम्यात टोमॅटो टाकत नाही अदिती." सुरेखाताई काय काय टाकतात ते सांगत होत्या.
" हो आई मी लक्ष्यात ठेवेन. " अदिती शांतपणे म्हणाली.
"मीना तू काय खातेस मॅगी करू? "
" हो. आई पटकन कर मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे. "
सुरेखा ताई उठत होत्या.
" आई तू बस. अदिती मीनासाठी मॅगी कर. यापुढे आईला विचारून पदार्थ करत जा. " समीर कडक आवाजात म्हणाला.
" हो. "
" आपल्या कडची पद्धत वेगळी आहे. लग्नाला वर्ष झालं तरी अदितीला स्वयंपाक काही जमत नाही." सुरेखाताई जागेवर बसत म्हणाल्या.
अदितीने दुर्लक्ष केल. आता काय करू म्हणजे यांच समाधान होईल? प्रत्येक गोष्टीत आमची पद्धत ऐकून ऐकून नुसता कंटाळा आला आहे. मीना जास्त करते मुद्दाम यांच्या समोर बोलते. टोमॅटो आवडत नाही तर काढून ठेव ना. पण नाही तिला इश्यू करायचा असतो.
समीर ऑफिसला गेला. मीना ही कॉलेजला गेली. घरी आता सासुबाई, सासरे आणि अदिती होती. ती घरकाम करत होती.
समीर आणि मीना या बहीण भावांमधे मध्ये जवळजवळ आठ वर्षाचं अंतर होतं. त्यामुळे समीरच लग्न आधी केलं. त्याच्या आणि अदितीच्या लग्नाला एक वर्ष होईल.
अदिती अतिशय हुशार होती. तिला काहीही सांगायची गरज पडायची नाही. दिसलं ते काम पटापट करायची. मोठ्यांचा मान ठेवून होती. पहिल्या पंधरा दिवसातच सुरेखाताईंनी तिला आमच्या पद्धतीने सगळी कामे करायला पाहिजे सांगून ट्रेन करायला सुरुवात केली.
अदिती माहेरी चांगला स्वयंपाक करत होती. पण इथे विचारून करता करता तिचा सगळा कॉन्फिडन्स गेला. अचानकच खूप बदल झाला. सारखं आपलं असं नको तसं नको. ती कंटाळली होती.
तिला कधी तिच्या आवडीची भाजी करावीशी वाटली तरी घरच्यांचा विरोध असायचा. तुझ्या माहेरी करतात तश्या गुळचट भाज्या आम्हाला आवडत नाही.
नका ना खाऊ पण अस बोलून का दाखवता. तिचा नेहमी पाणउतारा होत होता. अदिती खर तर खूप कंटाळली होती. ही परिस्थिती कधी बदलेल माहिती नाही. पण आता वर्षभरात ती बर्याच गोष्टी शिकली होती. तिच्या मनाने थोड तरी करत होती.
दोन चार दिवस गेले. अदिती आज बाजारात गेली होती. छान पालक मिळाला. तिला पालक पनीरची भाजी खूप आवडत होती. मी आज मस्त मला आवडते तशी भाजी करते सोबत पराठे. वाह. ती विचार करत घरी आली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा