आमच्याकडे असं नाही करत..
" तुला सांगते, साधी शेंगदाण्याची चटणी ग.. पण आई काय करायची सांगू.. आणि आता घरात एक गोष्ट मनासारखी होत नाही. शेंगदाण्याची चटणी सुद्धा शेवटची कधी खाल्ली ते आठवत नाही." डोळ्यात पाणी आणून कुसुमताई बोलत होत्या.
" काय रे देवा.. ही का अवस्था तुझी? अग, मग मीराला सांगायची ना करायला." कुसुमताईंची मैत्रिण पलीकडून सांगू लागली.
" काय सांगणार तिला? लग्नाला दहा वर्षे झाली तरी आमच्यासारखा स्वयंपाक करता येत नाही. सगळ्यात मेला कांदा लसूण." कुसुमताई सांगत होत्या.
" तू करत जा ना मग हवं ते.."
" स्वयंपाकघर असतं कुठे माझ्या ताब्यात? यांचे स्वयंपाकच संपत नाहीत. आणि नंतर बाबा मला येतो कंटाळा. मग काय पानात पडतं ते गिळते बिचारी."
"कोण होतीस तू? काय झालीस तू? लेकाचं लग्न झाल्यापासून वाघाची शेळी झालीस बघ तू.." मैत्रिणीने फोन ठेवला. कुसुमताईंनी सुस्कारा सोडून समोर बघितले तर मीरा दरवाज्यातच उभी होती. तिला बघून त्या चपापल्या.
" आलीस का? हातपाय धुवून ये. चहा ठेवते. पण मी चहात आलं टाकलं आहे चालेल ना तुला? नाहीतर तुला हवा तसा करून घे." कुसुमताई म्हणाल्या.
" आई, चहा हा चहाच असतो.. कसाही केला तरी. पण जाऊ दे. सध्या थकून आले आहे. थोडा वेळ आराम करते मी." मीरा आत जायला वळली.
" मीरा, अग हातपाय धुवून मग आत जा. आमच्याकडे असं बाहेरून आल्यावर हातपाय न धुता घरभर फिरत नाहीत."
" हातपाय न धुता आमच्याकडे सुद्धा घरात जात नाहीत. पण हातात माझ्या भाजीचं ओझं आहे ना? ते घेऊन बाथरूममध्ये तर जाऊ शकत नाही ना? ते फक्त ठेवत होते." मीरा म्हणाली. मीराला आत जाताना बघून कुसुमताईंनी नाक मुरडले.
" इतकी वर्ष झाली लग्नाला पण सासूचा मान काही राखता येत नाही. सतत उलटी उत्तरं. नाक तर नुसता नाकावरच असतो." इकडे आत बसलेली मीरा पण धुसफुसत होती. लग्नाला इतके वर्ष होऊन सुद्धा सासूबाईंना तिने केलेलं काहीच पसंत पडायचं नाही. साधी घरात नवीन चादर जरी आणली तरी त्यांचे पहिले वाक्य असायचे, आमच्याकडे नाही अशी डिझाईन आवडत कोणाला. नवीन लग्न झाले तेव्हा तिला फार कानकोंडं व्हायचं. पण आता तिला सतत ते ऐकून कंटाळा यायला लागला होता. लग्नाला दहा वर्ष झाल्यावर आईचं घर सुटलं होतं आणि इथे येऊनही हे घर तिला आपलंसं करत नव्हतं. इथे अजूनही तिला परकंच समजलं जात होतं.. कितीही सासूबाईंच्या मनासारखं केलं तरीही आमच्याकडे हे असं नाही करत, ते तसंच करतात हेच चालू असायचं. ती या सगळ्याला आता वैतागली होती. यातून कसं बाहेर पडायचं हेच तिला समजत नव्हतं.
पडू शकेल का मीरा यातून बाहेर? बघू पुढील भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा