आमच्याकडे असं नाही करत.. भाग २
मागील भागात आपण पाहिले की कुसुमताई सतत मीराला आमच्याकडे असं करत नाहीत असं सांगत असतात. आता बघू पुढे काय होते ते.
" काय ग, अशी डोकं धरून बसलीस ते? चेहराही उतरला आहे. काही भांडणं वगैरे झाली की काय?" वर्षाने मीराला विचारले.
" काही नाही झाले ग. उगाचच.." डोळे पुसत मीरा म्हणाली.
" अग ए.. रडतेस काय? काहीतरी नक्कीच झाले आहे. सांग पटकन. त्याशिवाय सुटका नाही." वर्षाने हट्ट केला.
" काही नाही ग.. नेहमीचंच. लग्नाला दहा वर्षे होऊन सुद्धा सासूबाईंच्या तोंडात असते की आमच्याकडे असं नाही करत, आमच्याकडे तसं नाही करत. अरे आमच्याकडे काय? आपल्याकडे म्हणता येत नाही का? बरं तरी घरी सगळं यांच्या मनाप्रमाणे असतं. तुला सांगते, भाज्या तर माझ्या आईच्या पद्धतीने मी करतच नाही. पण कधीतरी मुलांचा आग्रह म्हण किंवा या करत नसलेली भाजी आपण जरा वेगळ्या पद्धतीने केली की झालीच सुरुवात.. आमच्याकडे असं नाही करत, आमच्याकडे भाजीत हेच टाकतात आणि तेच टाकतात. पण ती भाजी मला आवडायला पाहिजे ना? बरं तुम्ही ती कधी केली नाही, खाल्ली नाही.. मग मला तर करून खाऊ दे.. पण नाही.. ना खाऊंगी ना खाने दूंगी." मीरा बांध फुटल्यासारखी बोलत होती. "घरात काहिही आणलं की सुरूवात.. आमच्याकडे आधी असंच होतं आणि तसंच होतं. आणि हे आमच्याकडे म्हणजे सासरी नाही बरं का.. त्यांच्या माहेरी. आणि आपण आपल्या माहेरासारखं काही केलं ना, की लगेच सुरूवात, माहेर विसरा आता.. सासरी आलात. पण सासरी येऊन तुम्ही आपलंस केलं का? तुम्हाला मी आपली वाटतंच नाही ना? मग का रहायचं तिथे? नवर्याला सांगावं तर तो म्हणतो, तुमच्या सासूसूनांमध्ये मी काही पडणार नाही. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. आणि आपल्या तोंडातून एक उणा शब्द गेला रे गेला की लगेच मग याची सुरुवात. कंटाळा आला ग खूप." मीरा कधीची बोलत होती.
" हे घे.." वर्षाने मीराला रुमाल दिला. डोळे पुसल्यावर मीराला दिसले की वर्षा हसते आहे.
" माझा इथे जीव जातो आहे. आणि तुला हसायला येतंय?" मीराला आता वर्षाचा राग येऊ लागला.
" तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली?" वर्षाने मीराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिला विचारले.
" दहा.. आता तर सांगितलं."
" माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली. मग अनुभवी कोण?" वर्षा बोलत होती.
" इथे याचा काय संबंध?"
" संबंध का नाही? घरोघरी मातीच्या चुली हे माहित नाही का तुला? आमच्याकडे सुद्धा गेले अनेक वर्ष हेच चालू होतं. अगदी आमच्या घरात सगळे हळूच कसे बोलतात, मोजून कसे बोलतात. किती टापटिपीने राहतात आणि मीच कशी यांच्यामधली ऑड वन आऊट आहे हे सतत सांगणं यातून मी गेले आहे."
" गेले आहे म्हणजे? आता तुला कोणी काही बोलत नाही?" मीराने आश्चर्याने विचारले.
" आता नाही बोलत."
" मग असं तू केलंस तरी काय?"
"समोरच्याचे डोळे उघडले."
" कसे?"
" सगळं मीच सांगितलं तर तू काय करणार? प्रत्येकाची परिक्षा वेगळी असते आणि त्याने ती आपली आपण द्यायची असते. कशी ते तू ठरव. मी फक्त सांगितले. पण एक नक्की, जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत हेच होत राहणार. मग स्वतःसाठी बोलायला शिक." मीराला समजावत वर्षा म्हणाली.
बोलू शकेल का मीरा स्वतःच्या बाजूने.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा