Login

आम्ही जिजाऊच्या मुली भाग 1

आऊ जिजाऊंच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या लेकिंची गोष्ट



आम्ही जिजाऊच्या मुली भाग 1

"तुळसा,ये तुळसा पोरी हिकड ये." सासूने हाक मारली.

तशी तुळसा पळत आली,"काय झालं आत्याबाय,कशापायी घाबरल्या तुमि?"

काशी म्हणाली,"पोरी,हित थांबू नग. गावात सुलतानाच्या सुभेदाराची लोक फिरत्यात. चांगल्या पोरी बाळी हेरत्यात."

तशी तुळसाच्या चेहऱ्यावर संतापाची रेषा उमटली,"पर आत्याबाय आस पळून तरी कुठ जाणार?" त्यापरिस लढाय पायजे."

काशी म्हणाली,"आपून बाया काय करणार ग?"

तुळसा म्हणाली,"आत्या,म्या जाऊन शिवबा राजांच्या सुभेदाराची मदत मागते."


म्हातारी काशी हसली,"माझ्या लेकांन तुला बी त्या राजगडा वरच्या माय लेकांच याड लावल वाटत."

तुळसा म्हणाली,"म्या हायेच शिलेदाराची बायकु,आशी बरी हार मानीन."


तुळसा आणि भिवाजी मावळ खोऱ्यात एका गावात राहणारे तरुण जोडपे.

भिवाजी राजांच्या सैन्यात शिलेदार होता. त्यामुळे तो तुळसाला नेहमी राजे आणि आऊसाहेब यांच्या विषयी सांगत राही.

त्यामुळे तुळसा राजगडावरील ह्या दैवतांना मनोमन पुजत असे. पण आता नेमकी मोहीम चालू होती. राजे गडावर नव्हते. त्याच वेळी स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुलतानी सैन्याने सुरुवात केली. तुळसाचे गाव स्वराज्याच्या सीमेवरील गाव होते.


काशी म्हातारीने तुळसाला सांगितले की पोरी बाळी पळवल्या जात आहेत. तू इथून निघून जा. तेव्हा तुळसा घाबरली नाही. तिने ठरवले खेड शिवापूर जवळ महाराजांच्या सुभेदाराला मदत मागायची.


त्या रात्री तुळसा घराबाहेर पडली. जंगल वाटेने ती निघाली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लहानाची मोठी झालेली तुळसा रात्री सराईतपणे रस्ता कापत होती. तिने पहाटे उजाडत असताना खेड शिवापूर गाठले.

तुळसा सुभेदाराला भेटायला निघाली. तेवढ्यात तिने महादेवाचे दर्शन करून मग जाऊ असा विचार केला.


सुभेदार महादेवाच्या मंदिरात एका शिलेदाराला सांगत होते,"ह्ये बग येसाजी,महाराज गडावर न्हाईत. तरी आऊसाहेबांनी ताकीद दिली हाय की पोरी बाळी जपा."


तसे शिलेदार म्हणाला,"पर सुभेदार आव हित आपून जर गावोगाव जाया लागलो तर गडाव माणसं कमी पडत्याल नव्हं?"

सुभेदार म्हणाले,"आऊसाहेब म्हंजी साक्षात जगदंबा,त्यांनी ठरिवल म्हंजी कोण काय करणार."

तुळसाने हे ऐकले आणि ती तशीच परत फिरली. आऊसाहेब आणि राजगडाला धोक्यात टाकून मदत मागायची नाही.


तिने जाताना देवीच्या देवळात न्याहारी सोडली. तेवढ्यात एक गोसावी आला,"माय भिक्षा वाढ."


तशी तुळसा म्हणाली,"घे,बाबा. आशीर्वाद आसू दे. दिवस लई वाईट हायेत बघ."


गोसावी हसला आणि म्हणाला,"माये,तूच जगदंबा आणि तूच काली. तुला काय आशीर्वाद देऊ."

तुळसा फक्त क्षीण हसली.



तिला आता परत जायचे होते. परत जाताना तिने ठरवले की काही झाले तरी आपल्याला स्वतः चे रक्षण स्वतः करावे लागेल.


तुळसा चालत असताना तिच्या मनात एकच विचार घोळत होता,"स्वतः चे रक्षण कसे करायचे?"


त्याचवेळी तिला आठवले भिवाजी तिला काय सांगत असे. तिचे नवीनच लग्न झाले होते. नवी नवरा नवरी जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला चालले होते.


तुळसा म्हणाली,"धनी, तुमी राजांना पायलय नव्हं? आन आऊसायबाना?"

तसा भिवाजी म्हणाला,"व्हय, सदरवर आऊसाहेब येत्यात. दोघासनी बगुन डोळ नुसतं भरून येत्यात."


तुळसा म्हणाली,"धनी,आव पण सुलतान चार हायेत, सैन्यबी लई मोठं,तरीबी राजं जिकत्यात ते कस?"


भिवा हसला,"आईक कारभरणी, राज सांगत्यात गड्यांनो तुमचं रक्षण करायला सह्याद्री हाय. राजं गनिमी काव्याने लढत्यात."


तुळसा म्हणाली,"म्हंजी व?"


भिवाजी विचार करून म्हणाला,"म्हंजी बग, पिकाची नासधूस करणाऱ्या रानडुकराला कस आपून टप्प्यात आणून पकडतो तसच गनिमाला कात्रीत धरायचं."


तुळसा चालताना सगळे सगळे आठवत होती. तिला आता गाव गाठायचे होते. तुळसा जंगल वाटेने गावात पोहोचली. म्हातारी काळजीने दारात तशीच बसून होती.

काय करेल तुळसा? तिला मदत मिळेल का?

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all