Login

आमुलाग्र बदल _ भाग १

एका स्त्रीमध्ये दुसऱ्या स्त्रीचे वागणे पाहून झालेले परिवर्तन
आमूलाग्र बदल _ भाग १

जलद लेखन स्पर्धा
विषय _ नणंदबाई येता घरी

संध्याकाळी थकून भागून ट्रेनच्या धक्काबुक्कीतून तावून सुलाखून मेघना घरात शिरली. तिचे सासरे नाना सोफ्यावर बसले होते. तिला पाहून त्यांनी तिला लगेच सावधगिरीचा इशारा दिला. गालातल्या गालात हसत ते म्हणाले,

"मेघना उद्या सकाळी शनिवार रविवारचे औचित्य साधून तोफखाना येणार आहे. तोफगोळे झेलायला तयार राहा. कळलं का रेवती येणार आहे."

"इश्श्य! नाना रेवती ताईंना तुम्ही तोफखाना काय म्हणता. कधीतरी येतात त्या."

"अगं मी तिला तिच्या लहानपणापासूनच म्हणतो. ती येते कधीतरी पण सर्वांना खास करून तुला ती अगदी धारेवर धरते." इतक्यात मालतीताई, मेघनाच्या सासुबाई बाहेर येत म्हणाल्या,

"कोण कोणाला धारेवर धरतंय?" नानांनी तोंडावर बोट ठेवून मेघनाला गप बसायची खूण केली. रेवती आणि राजेशचा विवाह होऊन दहा वर्ष झाली होती आणि त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा अमित होता. जसजसा तो मोठा होत होता त्याला आईचा स्वभाव कळत होता. बऱ्याच वेळा माहेरी येताना रेवती अमितला घेऊन यायची.

मेघना आत गेली. शेखर आणि मेघनाचा प्रेमविवाह झाला होता. त्याने मेघनाला रेवतीच्या स्वभावाबद्दल आधीच कल्पना दिली होती. तो तिला म्हणाला होता,

"तुला आमच्या घरात आई बाबांचे प्रेम भरपूर मिळेल. माझी एक लग्न झालेली बहीण आहे रेवती ताई. ती म्हणजे आमच्या घरातील सर्वेसर्वा आहे. तिचा शब्द कोणीच खाली पडू देत नाही. ती लग्नाआधीपासूनच वर्चस्व गाजवणारी आहे. ती आली की तुला तिच्या तालावर नाचायला लागेल. त्यावेळी आई पण तुझा काहीच विचार करणार नाही. तुला कामाला जुंपेल. तुला खूप त्रास होईल." मेघना समजूतदारपणे म्हणाली,

"शेखर काहीच हरकत नाही. मी सांभाळून घेईन."

बोलल्याप्रमाणे मेघना रेवतीला कधीच उलटून काही बोलली नाही की कधी तिच्यावर राग धरला नाही. मेघनाचे आवरल्यावर मालती ताई म्हणाल्या,

"उद्या रेवतीच्या आवडीच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत बरं का! तुझं आणि शेखरचे कुठे बाहेर जायचं ठरलं नाही ना! तुला माहित आहेच ती काही इकडची काडी तिकडे करणार नाही."

"नाही आई आम्ही घरीच आहोत."

शनिवार उजाडला आणि रेवती अमितला घेऊन माहेरी आली. आईनी तिला जवळ घेतलं आणि मेघनाला हाक मारली,

"मेघना रेवती आली गं! जरा पाणी घेऊन ये."

मेघना पाण्याचा पेला घेऊन बाहेर आली.

"अगं आई राहू दे तिला कशाला सांगतेस. हातपाय धुऊन मीच घेते ना."

तिने असं म्हणताच आई, नाना आणि मेघना, शेखर एकमेकांकडे पाहायला लागले.

"मालती आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय. चक्क रेवू म्हणतेय मी हाताने पाणी घेईन."

"काय हो बाबा मी काय महाराणी आहे का?"

"अगं नाहीतर काय. तू आलीस की चपला फेकायच्या आणि धापदिशी सोफ्यावर फतकल मारून बसायचं. पुढच्या क्षणी पाण्याचा ग्लास तुझ्या हातात आला नाही की कांगावा करायचा."

"असं काही नाही हं! हे बघ आई आणि मेघना आता दोन दिवस तुम्ही आराम करायचा. किचनचा ताबा आता माझ्याकडे." सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. बोलल्याप्रमाणे रेवती चहा पिऊन किचनकडे वळली. मेघना तिच्यामागे येत तिचा हात धरून म्हणाली,

"ताई तुम्ही बोललात तेच खूप झालं. अहो तुम्ही माहेरपणासाठी आलात आणि मी तुम्हाला काम करून देईन का! मला माहित आहे सासरी गेलेली मुलगी माहेरी येण्यासाठी किती आसुसलेली असते. ते काही नाही."

"अगं रेवू पण हे परिवर्तन एकाएकी झालं तरी कसं? त्या गुरुला मला भेटावंच लागेल."

"काय हो बाबा मला चिडवता." बाबांची री ओढत शेखर पण हसून बोलला,

"अगं हिच्या हेकेखोरपणाचे लहानपणापासून अनेक किस्से आहेत. मेघना लग्नानंतरचे तर तुला माहितीच आहेत."

मेघनाला तिच्या लग्नाआधीचे किस्से ऐकून माहीत होते. पण लग्नानंतर काही वेळा ताईंनी कमालच केली होती.

(रेवती अशी काय वागली होती पाहूया पुढील भागात)