Login

आमुलाग्र बदल _ भाग २

एका स्त्रीमध्ये दुसऱ्या स्त्रीचे वागणे बघून झालेले परिवर्तन
आमुलाग्र बदल _ भाग २

जलद लेखन स्पर्धा
विषय _नणंदबाई येता घरी

मेघनाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला जेव्हा शेखरने अचानक मोठा टीव्ही खरेदी केला होता. दोघांचं लग्न होऊन सहाच महिने झाले होते. त्याचं काय झालं घरी थोडा लहान टीव्ही होता. त्यावेळी वर्ल्डकप सुरू होणार होतं. क्रिकेट मॅच म्हणजे शेखरचा विकपॉईंट! त्याच्या मित्राला टीव्ही खरेदी करायचा होता म्हणून ते शोरुम मध्ये गेले होते. मित्राने एक मोठा स्क्रीनचा टीव्ही पसंत केला. शेखरला पण तो खूपच आवडला. तो मित्राला म्हणाला,

"अरे ह्या टीव्ही वर क्रिकेट मॅच बघायला किती मजा येईल ना. वर्ल्डकप साठी मी तुझ्या घरी येईन आधीच सांगून ठेवतो."

तिथे उभा असलेला विक्रेता म्हणाला,

"साहेब तुम्ही पण घेऊन टाका हा टीव्ही. दोन टीव्ही एकत्र घेतले तर आमच्याकडे एक स्कीम आहे त्यामुळे दोघांचा फायदा होईल."

"असं होय. काय स्कीम आहे सांगा तरी. खरंच फायदा असेल तर विचार करता येईल."

विक्रेत्याने स्कीमचे सांगितल्यावर शेखरने जास्त विचार न करता तो टीव्ही लगोलग विकत घेतला आणि घरी आणला. दुसऱ्या दिवशी फोनवर संवाद साधताना रेवतीने आईला काय नवीन जुनं असं विचारलं.

"अगं शेखरने मोठा टीव्ही घेतला. आता वर्ल्डकप आलाय ना!"

"अगं तुम्ही माझ्याशी कोणी आधी बोलले पण नाही, असं का केलं?"

"काहीतरी स्कीम होती म्हणून त्याने पटकन घेतला."

झालं! रेवतीचा पारा चढला. घरी आली आणि शेखरला ताडताड बोलू लागली.

"हो बरोबर आहे आता मेघना आली ना तुझ्या आयुष्यात. आता काय बहीण परकी झाली. आई-बाबांना पण सून म्हणजे लेक झाली आणि लेक आता परकी झाली."

"ताई काहीतरीच काय बोलते आहेस. तुला सांगितलं ना स्वस्त मिळाला म्हणून घेतला."

"मला सांग शेखर आज पर्यंत आपल्या घरात माझ्याशी सल्लामसलत झाल्याशिवाय किंवा मला बोलल्याशिवाय कोणती एखादी मोठी वस्तू किंवा निर्णय घेतला गेलाय का. आता मेघनाला विचारलं असशील."

"नाही गं बाई मी आणि मित्राने एकत्र घेतला. सर्वांना डायरेक्ट घरी आणल्यावरच कळलं."

असे बरेच प्रसंग मेघनाच्या लग्नानंतर घडले. घरात सर्वांनाच रेवतीचा स्वभाव माहित असल्यामुळे कोणी तिच्याशी वाद घालत नव्हतं. शेवटी ती त्यांच्या घरातलीच होती ना. त्यामुळे आता घरात शिरल्यावर रेवती किचनचा ताबा घेणार म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. यावेळी तिने सर्वांसाठी काहीतरी भेटवस्तू सुद्धा आणल्या होत्या. एरवी ती इथे आल्यावर फक्त घेऊन जायची पण कधीच आई-बाबांना, शेखरला काहीही तिने आणलं नव्हतं.

ती दोन पिशव्या भरून घेऊन आली होती. तिने सर्वांना सोफ्यावर बसायला सांगितलं. आईला आणि मेघनाला सुंदर साडी दिली. नानांना आणि शेखरला रेडिमेड शर्ट दिले. बोलल्याप्रमाणे ती खरोखरच पदर खोचून कामाला लागली.

"आई पुरण शिजलं आहे ना मग मी आता पुरणपोळ्या करायला घेते. तू आणि मेघना अजिबात किचनमध्ये यायचं नाही."

आई तिला हाताला धरून बाहेर घेऊन आल्या आणि म्हणाल्या,

"अगं तू सगळं करणार आहेस ते ठीक आहे पण तुझ्यात एवढा बदल कसा काय झाला? तुला कोण गुरु भेटलं ते आधी आम्हाला ऐकायचं आहे. आता तुझ्या सासरचे पण खुश राहतील."

"आई कसं असतं ना आपली माणसं आपल्या पुढच्या भवितव्यासाठी लहानपणापासून
कानीकपाळी ओरडून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु माझ्यासारखी हट्टी मुलगी कोणाचेच काही ऐकत नाही. पण कधीकधी आपण डोळ्याने जे पाहतो ते आपल्यावर खोलवर परिणाम करून जातं."

"ए बाई आता कोड्यात बोलू नको. नक्की काय झालं ते सांग."

(रेवतीच्या बाबतीत असं काय घडलं की तिच्यात एवढं परिवर्तन झालं पाहूया पुढील भागात)