Login

आमुलाग्र बदल _ भाग ३

एका स्त्रीमध्ये दुसऱ्या स्त्रीचे वागणे पाहून झालेले परिवर्तन
आमुलाग्र बदल _भाग ३(अंतिम)

जलद लेखन स्पर्धा
विषय _नणंदबाई येता घरी

"अगं आई काय झालं माहितीये का! तुला माझी ती मैत्रीण ठाऊक आहे ना नीलम! इथे मुंबईपासून जवळच तिचं माहेर आहे. ती मला म्हणाली दोन दिवस येतेस का माझ्या घरी राहायला! दोन दिवस सुट्टी होती म्हणून मी तिच्याबरोबर गेले."

"नीलम म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये तुझी खास मैत्रिणी तीच ना! तिच्या घरी असं काय घडलं?"

"आम्ही तिच्याकडे गेलो आणि नेमकी तिच्याकडे तिची मुंबईहून नणंद येणार होती. तिने सांगितलं की बरं झालं तू आज आलीस आता तुला माझ्या सुमन ताईला भेटता येईल."

"सुमन ताई म्हणजे तुझी बहीण का?"

"अगं नाही! सुमन म्हणजे माझी मोठी नणंद. माझ्याहून दोन-तीन वर्षांनी मोठी आहे पण लग्न झाल्याबरोबर तिने मला सांगितलं की मला ताई नाही म्हणायचं, फक्त घरातले सगळे म्हणतात तसेच सुमा म्हणायचं. आम्ही दोघी अगदी मैत्रीण म्हण, बहिण म्हण अशा वागतो एकमेकींशी. कुणाला खरंच वाटत नाही की आम्ही नणंद भावजय आहोत."

"अरे वा म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच तुमचं मेतकूट जमले की."

इतक्यात घरासमोर रिक्षातून सुमनताई उतरली. तिच्या खांद्यावर एक कपड्यांची बॅग होती आणि हातात दोन पिशव्या होत्या. बाहेर ओसरीवर मी आणि नीलमच होतो. आल्याबरोबर पिशव्या खाली ठेवून तिने नीलमला मिठी मारली. मग घरातले सगळे बाहेर आल्यावर आई-बाबांना नमस्कार केला. नीलमने माझी ओळख करून दिल्यावर मला सुद्धा जवळ घेतलं."

"अच्छा म्हणजे त्या सुमाला आम्हाला पण भेटायलाच हवं."

"अगं ऐक तर पुढे. ती आल्यावर तिने व्यवस्थित तिच्या चप्पल स्टैंड वर ठेवल्या. बाहेर जाऊन हातपाय धुवून आली. नीलम तिला पाणी आणायला आत जायला निघाली तेव्हा तिला पलंगावर बसवून ती स्वतः जाऊन पाणी घेऊन आली. इतकंच काय तर आल्या आल्या तिने सर्वांना भेटवस्तू दिल्या. तिच्या आई-बाबांना आवडतात म्हणून रव्याचे लाडू स्वतः करून आणले होते. चहा पिऊन झाल्यावर लगेचच ती म्हणाली,

"आज मी तुमच्या सर्वांसाठी भरली वांगी आणि तांदळाच्या भाकऱ्या करणार आहे. आई तू आणि नीलम या रेवतीशी गप्पा मारत बसा. तिने मला काय आवडतं ते सुद्धा विचारलं. नीलम म्हणाली की तिला बासुंदी आवडते. जेवणात बासुंदी सुद्धा केली."

"वा म्हणजे तुझा अगदी झक्कास पाहुणचार झाला."

"अगं आई इतकच नाही तर ती येताना एक दोन भेटवस्तू नेहमी जास्त आणते समोर कोण आलं तर पुढे करायला. तर तिने मला सुद्धा एक सुंदर पर्स दिली. मी नीलमला म्हटलं की सुमनच्या सासरी बहुतेक तिला आराम असेल म्हणून माहेरी आल्यावर ती सर्व काम करत असेल."

"अगं सुमाच्या सासरी ती सर्वांच्या गळ्यातला ताईत आहे. मुख्य म्हणजे ती तिथे सुद्धा अशीच काम करते, सर्वांशी खूप प्रेमाने वागते. कधीही हेवेदावे करत नाही. सुमा म्हणजे आमच्या सर्वांचा अभिमान आहे." नाना म्हणाले,

"खरं आहे रेवती. आम्ही लहानपणापासून तू म्हणशील ती पूर्व दिशा असेच वागत आलो. मी तर कधीच तुझ्यावर रागावलो नाही किंवा तुला शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही. तुझी आई तरी तुला शिस्त लावायचा प्रयत्न करायची पण तू काही तिला दाद द्यायची नाहीस."

"बाबा लहानपणापासून तुम्ही मला तोफखाना म्हणायचे. आता ही मेघना दुसऱ्या घरातून आली आहे पण तिने तिचं स्थान निर्माण केले आहे. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर माझ्याशी कचाकचा भांडली असती. आता मला कळतंय की हेकेखोरपणा करून माणसे जोडता येत नाही तर आपुलकीने, प्रेमाने सर्वांशी वागायला हवं. इथे आले की मी अपेक्षा करायची की मला सर्व हातात मिळालं पाहिजे." शेखर मिश्किल हसत म्हणाला,

"म्हणजे ती सुमन तुझी गुरू झाली. तिला आता काहीतरी गुरुदक्षिणा नेऊन दे."

"उशिरा का होईना मला उपरती झाली. आता मला कळतंय मी तुम्हाला सर्वांना नेहमी दुखवत आले. तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलं. मेघना तू मला माफ कर."

"अहो ताई माझी माफी काय मागता. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. आपण पण दोघी मैत्रिणीच आहोत."

आई रेवतीला जवळ घेत म्हणाल्या,

"माझी लेक पन्नाशीत तरी शहाणी झाली. तुझ्यातला हा बदल सुखावणारा आहे. नाहीतर काही जणांचे "गिरे तो भी टांग उपर" असतं."

"आता तुझं नाव मला बदलावे लागेल." नाना मिश्किलपणे म्हणाले.