Login

अन् ती हसली..... भाग - १२(अंतिम)

When Mother Stays With Her Married Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  : -  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - १२ (अंतिम)

समीरनेही तिला जवळ घेतले.  घराचा दरवाजा उघडता उघडता, वैभवीच्या मनाचा दरवाजा सुद्धा उघडला होता.  याचा समीरला खूप आनंद झाला होता.

सोमवारचा दिवस उजाडला.  वैभवी कालच्या एकंदर सर्वच प्रकारच्या ताणामुळे खूपच थकली होती.  तिच्या अंगात, दिवसभर काम करून नि रडून रडून कणकण सुद्धा आली होती.  समीरने तिला, रात्री एक क्रोसिनची गोळी देऊन शांत झोपायला सांगितले होते.

वत्सलाबाईंना नेहमीप्रमाणे सकाळीच जाग आली होती.  समीरही लवकरच उठला होता.  त्याने " ते दोघेही आज ऑफिसला जात नाहीत." असे वत्सलाबाईना सांगून, त्यांना जबरदस्तीने आराम करायला सांगितले होते.  दरवाज्याची बेल वाजल्यानंतर तो स्वतः दरवाजा उघडत होता.

वैभवी आज उशिराच उठली होती.  तिचा बऱ्यापैकी आराम करून झाला होता.  तिला आता बरेही वाटत होते.  उठल्या उठल्या तिने जवळच्याच नावजलेल्या ऑर्थोपिडीक डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली.  पण दुर्दैवाने तिला आजची अपॉइंटमेंट न मिळता दुसऱ्या दिवसाची अपॉइंटमेंट मिळाली. 

खरतरं तिने उठल्यानंतर, सर्वात आधी आईची माफी मागायचे ठरवले होते.  परंतु आईचा सध्याचा राग पाहता, नुसती माफी मागून, ती माफ करेल याची तिला शंका वाटत होती.  सासू सासरे इथे राहायला आलेले पाहून, कदाचित तिचा राग ओसरेल अन् ती माफ करेल, असे तिला वाटत होते.

ठरल्याप्रमणे समीर, नाश्ता वगैरे झाल्यानंतर, मुलांना प्ले ग्रुप मध्ये सोडून, त्याच्या आई वडीलांना घरी घेऊन आला होता.  त्यांना अचानक आलेले पाहून वत्सलाबाई आश्चर्यचकित झाल्या.  त्या दोघांना बॅगा घेऊन आलेले पाहून त्यांना कमालीचा आनंद झाला.  दोघी विहिणींनी एकमेकींची गळाभेट घेतली.  तब्येतीची विचारपूस केली.  ते दोघे स्थिरस्थावर झाल्यावर, त्यांच्या खुशालीच्या गप्पा सुरू झाल्या.

वैभवीला, आई नॉर्मल झाल्याचे जाणवयाला लागले नाही तोच, बोलता बोलता अचानक वत्सलाबाईं थांबल्या.  डोळ्याला पदर लावून रडू लागल्या.  त्यांना स्वतःला, वैभवीच्या चुकीच्या वागण्यामुळे, त्यांच्या समोर खजिल झाल्यासारखे वाटत होते.  त्या व्याही आणि विहिणबाईंसमोर हात जोडून उभ्या राहिल्या. 

" मला माफ करा.", कसेबसे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

" आई तू कशाला माफी मागतेस?  मीच तुम्हा सर्वांची माफी मागते.  माझे चुकले. " आईला असे, सासूसासंऱ्या समोर लाचार झालेले पाहून वैभवीचे डोळे भरून आले.  ती रडत रडतच पुढे आली आणि आईचे थरथरते हात हातात घेऊन रोखले.

वैभवीने लगेचच समीरच्या आईचे पाय धरले.  " मला माफ करा.  मी खूप चुकीची वागत होते.  मला माझी चूक मान्य आहे, म्हणूनच मी समीरला, तुम्हाला पुन्हा इथे राहण्यासाठी घेऊन आणायला सांगितले.  प्लिज मला माफ करा.  यापुढे मी पुन्हा अशी कधीच वागणार नाही.  तुम्ही मला माफ नाही केले तर, मला माझी आई कधीच माफ करणार नाही."  वैभवीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला होता.

समीरच्या आई, तिला हाताला धरून उभे करत म्हणाल्या.," उठ वैभवी, आधी डोळे पूस.  तुला तुझी चुक कळली नं?  यातच आम्हाला आनंद आहे.  आम्ही तुला माफ केलं.  तुझ्यावर रागावून कसे चालेल आम्हाला?  आमची एकुलती एक सून आहेस तू.  समीरने आम्हाला सगळं सांगितले.  तुझ्यातला हा बदल आम्हाला खूप आवडला.  फक्त हा बदल कायमस्वरुपी राहू दे."

" हो.  यापुढे मी तुम्हाला तक्रार करण्यासाठी जागा नाही ठेवणार.  कधी चुकले तर लगेच बोला मला.  माझे कान पकडा.  मी उलटून नाही बोलणार तुम्हाला.  आणि कामाच्या बाबतीत सुद्धा आळशीपणा नाही करणार.  माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन मी.", वैभवी बोलत जरी होती, तरी तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहतच होते.

" खरं तर मुले संभाळण्यासाठी नवीन बाई न ठेवून, मी खूप मोठी चूक केली होती.  हे मला दोन दिवसात चांगलेच जाणवले.  मला वाटले होते आई मुलांमध्ये रमली आहे.  तिला त्यांचे सगळे करायला आवडते.  मुलंही सारखी आजी आजी करत असतात.  तीही प्रेमाने त्यांचे सर्व करते.  पण दिवसभर इतर गोष्टी करून त्यांच्या मागे धावायला मला थकायला होते.  तर आईला या वयात किती त्रास होत असेल, याची आता मला जाणीव झाली आहे. 

मुळात घरात दोन बायका कामाला असून सुद्धा घरात कितीतरी काम असते.  घरात कामाला येणाऱ्या बाईसाठी कितीही गाढ झोपेत असले किंवा कंटाळा आला असला तरी उठून दार उघडावे लागते.  याचा चांगलाच धडा मला एका दिवसात मिळाला.  एखादी आवश्यक असणारी साधीसोपी गोष्ट वेळेत केली नाही तर, त्याच्यावर अवलंबून असणारी पुढची गोष्ट अडते.  हे मी काल स्वतःच्या अनुभवावरून शिकले. 

तुम्ही बरेच वेळा मला समजावण्याचा प्रयत्न केला होता.  पण एकतर दुर्लक्ष करून किंवा उलट बोलून मी तुम्हाला टाळले होते.  आईला आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी मी फारच गृहीत धरत होते.  खरचं मी तुम्हा दोघींची मनापासून माफी मागते." वैभवीने मनापासून, एक एक करत, सर्व चुका कबूल करून माफी मागितली होती.

तिला अशी रडताना पाहून वत्सलाबाईंचे काळीज तुटत होते.  वाईटही वाटत होते आणि तिला प्रचिती झाली, तिचे डोळे उघडले, म्हणून आनंदही होत होता.  त्यांच्याही डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते.

" वैभवी आता रडणे थांबव.  तुला रडताना बघून तुझ्या आईच्या डोळ्याचे पाणी थांबत नाही.  अग तू अशी एकटी मुलगी नाही आहेस की जिचे सासूशी पटत नाही.  अशा अनेक मुली आहेत.  काही ठिकाणी सून चुकत असते तर काही ठिकाणी सासू, सुनेला समजून घ्यायला कमी पडते.

मुळात माहेरी लाडाकोडात वाढलेल्या मुलीवर, लग्नानंतर जबाबदारी वाढते.  जर ती नोकरी करणारी असेल तर, तिचा त्रास डबल होतो. पण त्यातूनही घरच्या सर्वांनी एकत्र येऊन, समंजसपणे मार्ग काढता येतो.  जशा तुम्ही ऑफीसमध्ये दिवसभर फायली, मीटिंग्ज, टार्गेट, सेमिनार वैगरे सर्व कसे न कुरकुरता, कितीही कंटाळा आला, कोणी सहकारी रजेवर असला तरी मॅनेज करता नं? कारण तिथे तुम्हाला पगार मिळत असतो.  सर्वासमोर वाहवा होत असते.  नाही केले तर तुमचं नाव खराब होण्याचे टेन्शन असते.  स्पर्धेत मागे पडण्याची भीती असते.  डोळ्यासमोर सी.आर, प्रमोशन, इंन्क्रिमेंट सतत दिसत असते.  म्हणून कसेही करून किंवा मन लावून तुम्ही तिथे काम करत असता.

परंतु ज्यांच्या आधारावर तुम्ही हे सगळं करता, किंवा ज्यांच्यासाठी करता, त्यांना मात्र तुम्ही शून्य किंमत किंवा जुजबी महत्व देता.   मला कबूल आहे, दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन, रोजच्या प्रवासात होणाऱ्या दगदगीमुळे तुम्ही थकून जाता.  घरी आल्यावर तुम्हाला आरामाची अपेक्षा असते.  त्यात चुकीचे काहीच नाही.  पण तसेच तुमच्यामागे, घरात राहणारी, मग ती सासू असो किंवा आई असो, संपूर्ण दिवस तुमचं घर, तुमची मुलं संभाळणारी, घरात हवे नको ते पाहणारी, तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी, तिच्या वयामानाने किंवा आजारपणाच्या छोट्या मोठ्या किरकिरीमुळे तितकीच दमते. तिलाही थकवा येतो.  तिलाही समजून घेण्याची, आरामाची गरज असते. सुट्टीची गरज असते.  तिच्या मनाला उभारी मिळवण्यासाठी, नेहमीच्या गराड्यातून बाहेर पडण्याची, तिलाही आवश्यकता असते.  जसे ती, तुम्ही मुली ऑफिसला जाता म्हणून तुम्हाला समजून घेते.  तसे ऑफीसमध्ये जाणाऱ्या तुम्ही मुलींनी सुद्धा घरी राहणाऱ्या तिला समजून घेतले पाहिजे.

घरातले काम, एका अर्थी होम जॉब म्हणजे कॅशलेस, थँकलेस आणि विदाऊट एनी लिव्ह असतो.  म्हणून ते काम करायला, कमी त्रास होतो असे नाही नं.  म्हणूनच घर कामाला कोणी कमी लेखू नये एवढेच मला म्हणायचे आहे.", समीरच्या आईमधल्या प्रोफेसर मिसेस स्मिता वाडकरने आज बऱ्याच दिवसांनी बोलण्याची, लेक्चर देण्याची संधी साधली होती.

" अगं आई, आता किती बोलशील तू तिला?  मागितली नं माफी तिने सर्वांची.  केल्या नं सगळ्या चुका कबूल?  आता पुरे झालं तुझे बोलणे.  तू ही आराम कर, नाहीतर तुलाही बोलून बोलून त्रास व्हायला लागेलं. पहिल्या सारखी एवढं बोलायची सवय नाही राहिली आता तुला." समीरला वैभवीची अवस्था बघून वाईट वाटले होते.

" अरे मी हे जनरल बोलत होते.  तिलाही सांगण्याचा हेतू होताच.  पण आता हा चॅप्टर क्लोज करायचा म्हणून त्याच्या आधी सर्व मुद्दे मांडून मोकळे झालेलं बरे.  म्हणून बोलत होते.  त्यातून मला तिची परीक्षा सुद्धा घ्यायची होती. खरचं तिच्यात बदल झाला आहे का?  ती मला उलट उत्तर देते का?, पहायचे होते.", समीरच्या आईने हसून उत्तर दिले.

" अरे समीर, खरचं हिच्या तब्येतीने दगा दिला नसता तर, अजूनही ही कॉलेजमध्ये मुलांना लेक्चर देत असती आणि परीक्षा घेत बसली असती, जशी आता वैभवीची घेते आहे." इतका वेळ शांत बसलेले समीरचे वडील हसून म्हणाले.

" हो पण मी याआधी दिलेल्या लेक्चरचा म्हणावा तसा फायदा झाला नव्हता, जेवढा वत्सलाबाईंच्या प्रॅक्टिकलचा झाला.", प्रोफेसर स्मिता हसून म्हणाल्या.

प्रोफेसर बाईंच्या बोलण्यावर सर्वजण हसले. वत्सलाबाईं सुद्धा, तोंडावर साडीचा पदर धरत, गालातल्या गालात हसल्या.

" पण आईने मला अजून माफ कुठे केले आहे?  अजून ती माझ्यावर रागावलेलीच आहे." वैभवी खाली मान घालून बोलली.

" अग आई आहे ती.  तिच्या पोटात लेकी विषयी राग, फार वेळ टिकणार नाही.", समीरच्या आई वैभवीला बोलून, तिच्या आईकडे वळून म्हणाल्या," काय वत्सलाबाई मुलीवरचा राग गेला नं?" 

" हो. हो.  लेकीला शहाणपणं आलयं तर कशाला राग धरू? ", वत्सलाबाई खूष होऊन म्हणाल्या.

" बघितलेस वैभवी, माय लेकीचं भांडणं दूध तुपाची उकळी, माय मनाची मोकळी." समीरच्या आई वैभवीला बोलल्या आणि तिच्या आईकडे वळत, " वत्सलाबाई, खरचं तुमच्या सारखी आई सर्व लेकींना मिळो.  मी अशीच देवाजवळ प्रार्थना करेन." त्यांची स्तुती करत स्मिता बोलल्या.

वैभवीने खूष होऊन, खुर्चीत बसलेल्या सासूच्या गळ्यात हात घालून, त्यांना "थँक यू व्हेरी मच " म्हंटले आणि नंतर आईकडे जाऊन," सॉरी आई मी तुला खूप त्रास दिला.  आता पुन्हा कधी-कधीच त्रास नाही देणार.  तुझे गुडघे डॉक्टरला दाखवायला मी उद्याची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली आहे.", म्हणत तिला मिठी मारली.

आई आणि सासू दोघींनी माफ केल्यामुळे वैभवीला डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरल्यासारखे वाटत होते.  त्या तिघांना अश्या मनमोकळ्या गप्पा मारताना पाहून समीरलाही आनंद वाटत होता. 

" मग पॅकिंगला कधी सुरवात करणार आहात?" वैभवीच्या सासूने वत्सलाबाईंना विचारले.

" हो.  घेते आता करायला.  माझ्या फार काही साड्या नाहीत.  मुलाला आजच फोन करून बोलावून घेते.  तो येईल मला घेऊन जायला?", वत्सलाबाईंनी उत्तर दिले.

" आई तू नको नं जाऊस.  तू सुद्धा रहा आमच्या सोबत.  मलाही तुझे माहेरपण करायला संधी देना.  जशी तू वहिनीला, तिची आई आली की तिला सांगतेस." वैभवी काकुळतीला येऊन म्हणाली.

" काय सांगते तुझी आई, वहिनीला? आम्हाला पण कळू दे जरा.", समीरच्या आईने वैभवीला विचारले.

" माझ्या वहिनीची आई घरी आली की, आई तिला सांगत असते, तुझी आई माहेरपणाला आली आहे.  तिची नीट काळजी घे.  तिला हवे नको ते बघ." वैभवीने उत्तर दिले.

" अगदी खरे आहे वैभवी.  एका वयानंतर मुलगीचं, आईची आई होते आणि मुलीचे घर, तिचे माहेर.  पण तुझी आई कुठे आता सासरी निघालीय? ", समीरच्या आई बोलल्या.

" आता तुम्ही आईला पॅकिंग … " वैभवीने चाचरत चाचरतचं विचारले.

त्यांना पॅकिंग करायला सांगितले ते, त्यांना आमच्या सोबत घेऊन जाण्यासाठी.  आम्ही आमच्या ट्रीटमेंटसाठी नॅचरोपथी सेंटरमध्ये दहा दिवस रहाणार आहोत.  समीरने तुझ्या आईचे सुद्धा बुकिंग केलेले आहे.  तुम्हाला सिंगापूरला जायचे आहे नं?  म्हणून त्याने आमची रवानगी तिकडे केलीय.", समीरच्या आईने हसून खुलासा केला.

मुलीच्या सासू -सासऱ्यांचा आणि जावयाचा समजूतदारपणा आणि प्रेमळपणा पाहून, वत्सलाबाई भारावून गेल्या होत्या.

वैभवीने समीरकडे आश्चर्याने बघितले. \" ह्याला कसे जमते सर्वांना आनंदी ठेवायला?\", तिच्या मनात विचार येऊन गेला.

वैभवीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्यचकित झालेले भाव पाहून, समीरने तिच्याकडे पाहून भुवया उंचावत, हळूच डोळा मारला.  नेमके आई आणि सासू सासऱ्यांनी ते पाहिलेले पाहून, वैभवी लाजली अन् गोड हसली.  सगळ्यांनी त्या दोघांना हसून साथ दिली.

वैभवीला, तिच्या हसत्या खेळत्या कुटुंबात, असे मनसोक्त हसताना पाहून, समाधानाने वत्सलाबाई सुखावल्या.  आज खऱ्या अर्थाने त्यांची काळजी मिटली होती.  त्यांच्यातली आई आज मनापासून हसली होती.

समाप्त

रसिक वाचक हो, ह्या कथेत मध्यम वर्गीय घरातील नोकरी करणाऱ्या तरुण स्त्रियांच्या मागे, घरी राहून त्यांचे घर संभाळणाऱ्या वृध्द स्त्रियांच्या कामाची, त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.  कथा आपल्याला आवडली असल्यास, आपण जरूर कमेंट करून दाद द्यावी ही नम्र विनंती.

सूचना : -  ही कथा संपूर्णपणे काल्पनिक असून, यातील स्थळं, पात्रे, घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत.  या कथेतील जागेचा, पात्रांच्या नावांचा, प्रसंगाचा किंवा इतर कोणत्याही घटनेचा कुणाच्याही वास्तविक जीवनाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती.

🎭 Series Post

View all