Login

अन् त्यांना प्रेम झाले

प्रेमाची सुरवात


अन्, त्यांना प्रेम झाले.

भाग - १

अन्,
अखेर त्यांचे लग्न झाले.

कुणाच्या ही ध्यानी मनी नसता ते दोघं लग्नबंधनात अडकले होते. ते म्हणतात ना, जे येई देवाच्या मनी त्याला कोण टाळी?

याचा परिचय विकीला चांगलाच आला होता. 

ज्यांनी एकमेकांना या आधी कधी पाहिले ही नव्हते. एकमेकांबद्दल ज्यांना एक ओळ ही माहित नव्हती. ते आज नवरा बायकोच्या पवित्र बंधनात एकमेकांशी जोडले गेले होते. 

अन्,
ते ही सात जन्म.

योगायोग म्हणावा? की अजून काही. पण, सत्य हेच होते. ती मुलगी जिचं नाव ही साधं त्याने कधी ऐकलं नव्हतं. आज तीच मुलगी तिच्या नावासमोर त्याच नाव लावणार होती.

कायमच!

लग्नसराईत नातेवाईकांच्या लग्नाला जाणं हे अपेक्षित असतंच. पण, जर थेट बाहुल्यावर चढायला लागलं तर??

हे जरा जास्तच अनपेक्षित होईल ना? 

..

..

एका दिवसाआधी

" विकी ss
अरे, अजून किती वेळ लागणार आहे तुला? हल्ली मुली पण इतकं वेळ लावत नाहीत रे. "

अंगी काठा पदराची साडी नेसलेल्या कृष्णाई सारंग म्हणजे विक्रांतची आई ( माई ) भिंतीवरलं घड्याळ बघत जरा वैतागून बडबडल्या.

अन्,
पुन्हा त्या स्वतःकडे बघत साडीच्या निऱ्या, पदर,सगळं व्यवस्थित आहे ना याची खात्री करु लागल्या. पण  राहून राहून माईंची नजर हॉलमधल्या कोपऱ्यात जात होती. जिथे माधव सारंग म्हणजे विकीचे वडील ( अण्णा ) वर्तमानपत्र चाळत बसले होते.

मुद्दाम त्यांना ऐकू जावं म्हणून माई यावेळी जरा मोठ्याने म्हणाल्या. 

" विकी ss
झालं का तुझं? उशीर होतोय आपल्याला."

त्या आवाजाने अण्णाचं लक्ष वेधून घेतले. अन्, पुन्हा त्यांनी वर्तमानपत्राला पाहिलेच नाही.

आता ही माई चोरट्या नजरेने अण्णांना पाहत होती. ते आपल्याकडेच पाहतायत या जाणिवेने माईने पुन्हा एकदा आवाज लगावला.

" तू येतोयस. 
की जाऊ मी एकटी?? असं ही माझ्या माहेरचं लग्न आहे. तुम्हाला कुठे यावंस् वाटणार तिथे." 

हा टोमणा पूर्णतः त्यांच्यासाठीच होता हे अण्णांना कळून चुकले. म्हणूनच, वर्तमान पत्र समोरच्या टी पॉटवर टाकून स्मित हास्य करीत ते जागचे उठले. 

अन्,
माईंचं साधं सोज्वळ रुप बघतच अण्णा त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले.      

अण्णां त्यांच्या मागे असल्याची कल्पना होती माईंना म्हणूनच चेहऱ्यावर खूप रागाचा खोटा आव आणण्याचा त्या प्रयत्न करत होत्या.

पण,
त्यांचा हा प्रयत्न तेव्हा निष्फळ ठरला, जेव्हा एकाएकी त्यांच्या खांद्यावर अण्णांच्या हातांचा स्पर्श झाला.
   
" व्वा !
आमच्या सौभाग्यवती आज जरा जास्तच सुंदर दिसतायत."

अण्णांच्या तोंडून कौतुक म्हणजे माईंसाठी सर्वकाही. असं ही एखाद्या स्त्रीला शेवटी काय हवं असतं आपल्या माणसांकडून कौतुकाचे दोन शब्द.

जे माईंना भेटले होते.

म्हणूनच,  
त्या क्षणी माईंच्या चेहऱ्यावर थोडा राग तर खूप सारं हसू होतं. तरी अण्णांच्या त्या शब्दांकडे माईंनी सपशेल दुर्लक्ष केले. व् खोटा राग शब्दात आणत त्या पुटपुटल्या.

" म्हणजे??
वेळ आहे तर तुमच्याकडे? पण, फक्त लग्नाला यायला वेळ नाही? हो ना."

या ही वेळी माईंनी टोमण्याचा सुर लावून अण्णांना खडे बोल सुनावले. त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता अण्णांनी आधी माईंना शांत होऊ दिले.

अन्,
मग समुजतीच्या शब्दात माईंना समजावू लागले.

" तू आधी बस बघू इथे."

माईंच्या हाताला धरुन अण्णांनी त्यांना आराम खुर्चीत बसविले.

माईंनी हात हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण अण्णाच्या हातून हात सोडवून घेणं इतकं सोपं नाही, अन् हे माईंना ही चांगलंच ठाऊक होतं.

अण्णांच्या सांगण्यावरुन माईं आराम खुर्चीत बसल्या खऱ्या पण त्यांची नजर मुद्दामून खिडकी बाहेर डोकावित होती.

थोडक्यात काय तर त्यांना अण्णांच अजिबात ऐकून घ्यायचं नव्हतं. अन् याचं मूळ कारण म्हणजे माईच्या दूरच्या भावाच्या मुलीच लग्न ज्यात येण्यासाठी अण्णांनी नकार दिला होता.

याच एका कारणामुळे माई अण्णांवर सकाळपासून नाराज होती. म्हणूनच, माई मुद्दाम अण्णांकडे दुर्लक्ष करीत होती.

पण,
अण्णा ही काही कमी नव्हते. हळूच माईच्या हनुवटी धरुन त्यांची मान स्वतःकडे वळवली. अन् पुन्हा त्यांना प्रेमाने बघत समजावू लागले.

" तुझ्या प्रत्येक शब्दातला टोमणा लक्षात योतोय बरं का?

पण, मी तरी काय करु? अचानक खूप महत्वाचं काम आलंय. आणि तिथे मीच असणं गरजेचं आहे. कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे गं." 

अण्णा खूप जीव तोडून हे सगळं माईंना सांगत होते. त्यांच्या बोलण्यातला ओलावा माईंनी हेरला होता.  अन् म्हणूनच त्या पट्कन बोलून गेल्या. 

" जा तुम्ही.
तुमची तिथे जास्त गरज आहे. मी इथे सगळं सांभाळून घेईन."

अन्,
दोघं ही हातात हात घेत स्मित हास्य करु लागले. गप्प राहून ही ते दोघं नजरेने बरंच काही बोलत होते. तितक्यात, आतून बाहेर येणारा विकी म्हणाला.

" माई ss
चल , आवरलं माझं. "