Login

अन् त्यांना प्रेम झाले - भाग - २

प्रेमाची सुरवात


भाग - २

संध्याकाळची वेळ होती.


अण्णा ही त्यांच काम जमेल तितक्या लवकर संपवून घरी आले होते. दार उघडताच त्यांना आठवलं ते म्हणजे सकाळचा माईंचां उदास चेहरा.

अण्णांनी लग्नाला न येण्याचं कारण सांगता माईंनी चेहऱ्यावर उसणं हसू आणलं खरं पण त्या हसू मागची त्यांची सल त्यांनाच ठाऊक. 

म्हणूनच,
घरी आल्या आल्या त्यांनी स्वयंपाक घरावर काबीज केले अन् माईच्या आवडीचा गोड पदार्थ बनविण्यात  व्यस्त झाले. अण्णा अधून मधून विकीला फोन करीत होते, पण त्याचा फोन कधी लागत नव्हता तर कधी स्विच ऑफ येऊ लागला. 

बऱ्याच वेळा ट्राय करुन अखेर अण्णांनी फोन करण्याचा विषय सोडून दिला. अन् पुन्हा ते स्वयंपाक घरात रुजू झाले.

..

..

थोड्या वेळाने

दारावरली बेल वाजली. नक्कीच, माई अन् विकी आले असतील म्हणून अण्णांनी मोठ्या उत्साहाने दार उघडले.

तर,
समोर माई एकटीच उभी होती.

विकी घरी न येता पुन्हा सवयीप्रमाणे परस्पर बाहेरुनच मित्रांना भेटायला गेला, हाच विचार करुन अण्णा माईंकडे बडबडू लागले. 

" तो गधद्या कुठेय?
त्याचा फोन ही लागत नाही की तो उचलत नाही.

तुम्ही दोघं कुठंपर्यंत पोहचलात हे कसं कळणार होतं मला. ऍडव्होकेट महेश सारंग यांचा मुलगा आणि तो ही असा बेजबाबदार."

मुलाची नेहमीचीच तक्रार आपल्या बायकोकडे करत अण्णा माघारी फिरले. त्यांच्या पाठोपाठ माई ही आत येऊ लागली.

पण,
त्या गडबडीत दार लावायचे मात्र राहून गेले.

" अहो ss
मला काही सांगायचे आहे तुम्हाला. "

आत येताच माईंनी काही सांगण्याचा प्रयत्न केला. पण, माईंचा एक ही शब्द न ऐकता अण्णा सरळ   स्वयंपाक घरात निघून गेले. 

एकीकडे अण्णा काही ऐकायला तयार नव्हते तर दुसरीकडे माई " कसं सांगू? काय होईल?" असे प्रश्न घोकत कसल्यातरी विचारात गढली होती.

" कृष्णाई ss "

माईंच्या कानी हाक ऐकू आली अन् त्या गडबडून त्यांच्या विचारातून बाहेर आल्या. समोर अण्णांच्या हातात भरलेल्या पाण्याचा ग्लास होता. 

" घे.
आधी पाणी पिऊन घे, मग हवं तर बोल."

अण्णांनी त्यांच्या समोर पाण्याचा ग्लास धरला. तसे, माईंनी तो भरलेल्या पाण्याचा ग्लास काही मिनिटातच संपवून टाकला.

दमल्यामुळे माईंचा चेहरा जरा काळवंडून ही गेला होता. 

" कृष्णाई ss 
तू ही माहेरच्या माणसांत इतकी रमली की एक साधा फोन ही केला नाहीस. ह्मम ss माहेरची माणसं भेटली की हे असच होणार. "

गोड शब्दात का होईना पण अण्णांनी सकाळचा टोमणा जशाच तसा माघारी केला होता. आता वेळ त्यांची होती.  

अण्णांचा टोमणा ऐकून ही माई गप्प होत्या. कसलीच प्रतिक्रिया देत नव्हत्या. माईंच हे वागणं अण्णांसाठी थोड वेगळं होतं.  

" कृष्णाई ss 
काही झालंय का? तुझी तब्बेत ठीक नाही का?"

माईंच्या कपाळावरल्या आठया बघून काळजीच्या सुरात अण्णांनी विचारले.  

" अहो ss
जे..... झालं ..... त्यात.... " 

माई तुटक शब्दात काही सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण , त्यांची वाचा साथ देत नव्हती.

पेशेने वकील असणाऱ्या अण्णांनी कुठेतरी पाणी मुरतंय हे ओळखून घेतले होते. पण, नेमके कुठे?? ते फक्त माईंकडून ऐकून घ्यायचे होते.

म्हणूनच,
विषय बदलत त्यांनी विचारले.

" विकी कुठेय? "

अण्णांचा प्रश्न ऐकता माईंनी फक्त दाराकडे पाहिले. माईंच्या नजरेचा पाठलाग करीत अण्णांची नजर ही दारावर येऊन थांबली.

अन्,
पुढच्याच क्षणी दारात विकी दिसला.

त्याला सुखरुप समोर बघून अण्णांची अर्धी काळजी मिटली होती. त्यात सहज अण्णांची नजर माईवर गेली तर अजूनही माईच्या चेहऱ्यावर फुसुटशी काळजी होती.

लगबगीने अण्णांनी विकीला पाहिले. त्याचा ही चेहरा पडला होता. मान खाली तर नजर शून्यात हरवली होती. पहिल्या नजरेत ठीक वाटणारा विकी जरा निरखून पाहता उदास वाटत होता.

" विकी ss
काय झालंय , तू तरी सांग."

आधी माईकडे तर नंतर विकीला बघून अण्णांनी विचारणा केली. अन् पुन्हा ते एक नजर माईला बघू लागले.

..

अण्णांनी प्रश्न विचारुन ही बराच काळ लोटून गेला तरी अजूनही उत्तर आलं नव्हतं. माई घरात तर विकी दारातच स्तब्ध उभा होता.

अखेर,
अण्णांचा संयम शिगेला पोहोचला.

" कुणी सांगेल का??

काय झालंय?? काय चाललंय??"

त्यांच्या चढत्या आवाजाचा सुर ऐकून माई अन् विकी वास्तवात आले. त्यांनी एकमेकांना पाहिलं अन् माईंनी पापण्या पाडून त्या असल्याचं आश्वासन देऊ लागल्या.

अण्णांची नजर अजूनही गप्प असलेल्या माईंवर स्थिरावली होती. अन् , तितक्यात माईंनी आवाज लगावला.

" रेवा sss sss"

अन्,
एक सडपातळ बांध्याची एक मुलगी हळूच येऊन विकी शेजारी उभी राहिली. जिच्या भांगेत तर गळ्यात मंगळसूत्र होतं.

( क्रमशः )