Login

अन् त्यांना प्रेम झाले ( भाग - ४ )

प्रेमाची सुरवात
भाग - ४


" मी आहे ना."

माईच्या या एका वाक्यामुळे रेवा जराशी स्थिरावली. पुढे येणाऱ्या वेळेला सामोरं जाण्याचं जणू तिला बळंच मिळालं होतं. 

साधं शब्दाने तिला बळ देणाऱ्या माईला ती एकटक मोठ्या आशेने बघत होती. की, तिची तंद्री भंग होत माईचे शब्द पुन्हा तिच्या कानांना धडकू लागले.

" रेवा s s 
बाळा खूप दमली असशील ना?

जा थोडा आराम कर. इथून पुढे गेली की उजव्या हाताला माझी खोली आहे. तू हो पुढे , मी आलेच. नको काळजी करु."

रेवाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माईंनी तिला दिलासा दिला व् आराम करण्यासाठी आत खोलीत पाठवून दिले. तसं ही तिला आरामाची गरज होतीच.

जरा घाबरत जरा चाचपडत रेवा एक एक पाऊल पुढे टाकत माईंच्या खोलीत निघून गेली.

.

.

अन्,
अखेर तो क्षण आला. ज्याची माई वाट बघत होती. 

अण्णांचे शब्द जरी गप्प असले तरी त्यांची नजर खूप काही प्रश्न विचारुन जात होती. ज्याची उत्तरं देणं माईला आता भाग होतं.

माईला ही अण्णांशी बोलायचंच होतं. त्यांच्या तोंडून काही शब्द फुटणार त्या आधीच अण्णा बोलू लागले.  

" कृष्णाई  ss 
तुझ्यावर , तुझ्या निर्णयांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तू कधीच न विचार करता वागणार नाहीस हे ही मला चांगलंच ठाऊक आहे. फक्त असं काय झालं. ज्यामुळे तुला असा निर्णय घ्यावा लागला तितकं जाणून घ्यायचं आहे. "

अन्,
माई बोलू लागल्या.

" जयदीप रणदिवे "

हे नाव अण्णांना खूप ओळखीचं वाटत होतं. " जयदीप " या नावाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत अण्णा आठवू लागले.

नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना?

अन्, त्यांना आठवले.

" हे तेच ना ज्यांनी "

अर्ध वाक्य बोलत उरलेल्या वाक्यासाठी अण्णांनी माईंकडे पाहिले. तर, माईंनी डोकं वर खाली करीत होकरात उत्तर दिले.

" अगदी बरोबर. 
हा तोच ज्याने आपल्याला पळून जाऊन लग्न करायला खूप मदत केली होती. 

माझ्या दूरच्या नात्यातला भाऊ.

जिथे आपल्या लग्नाला सगळ्या घरच्यांचा विरोध होता. तिथे हा एकटा होता ज्याने सगळ्या नातेवाईकांचा रोष पत्करुन आपल्या प्रेमाला पाठिंबा दिला होता.

इतकंच काय तर, आपल्या लग्नासाठी त्यानेच घरच्यांना मनवलं होतं. आपलं लग्न त्यानेच करुन दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आज तोच संकटाच्या भोवऱ्यात सापडला होता. अन् त्याच्यासाठी उभं राहण्याची वेळ ही आता माझी होती."

सांगता सांगता माई अचानक गप्प झाल्या. जणू त्या पुन्हा त्याच क्षणात पोहचल्या होत्या. 

" म्हणजे?"

अण्णांची जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती.

" आज त्याच्याच मुलीचं म्हणजे रेवाचं लग्न होतं. लग्न मांडव फुलांनी सजला होता. सारं अंगण पाहूण्यांनी गजबजलं होतं.

लग्नाच्या आधीच्या काही विधी पार पडल्या होत्या. नवरी नवरेदवाच्यामध्ये अंतरपाट धरण्यात आलं होतं. मुला मुलींच्या घोळक्याने अख्खा स्टेज काबीज केला होता.

लग्न मुहूर्ताची वेळ ही जवळ आली होती. जिथे जागा भेटेल तिथे बसून उभे राहून सारी वऱ्हाडी मंडळी हातात अक्षदा घेऊन सज्ज होती.

मंगलाष्टका सुरु होणार इतक्यात स्टेजवरच्या गर्दीतून एक व्यक्ती पुढे येत नवरदेवाच्या कानी काहीतरी कुजबुजली.

की,
नवरदेवाने गरकन् मान वळवून गर्दीत उभ्या असलेल्या जयदीपला पाहिले. या क्षणापर्यंतच्या त्याच्या हसऱ्या नजरेत एकाएकी राग उफाळून आला.

कसलाच विचार न करता दोन पावलं तो मागे सरला.

अन् 
" मला हे लग्न मान्य नाही." इतकंच बोलून तो तिथून तडक तिथून निघून जाऊ लागला. 

" लग्न मान्य नाही."

त्या वाक्याची लांबी जरी बारीक असली तरी धार अन् रुंदी फार खोल होती. अगदी काळजाला ही चिरेल इतकी. मुलीचं कल्याण होईल यासाठी धडपडणाऱ्या बापाच्या हृदयाला हे वाक्य खोलवर टोचत होतं.

गर्दीतून वाट काढीत जयदीप वाढलेल्या श्र्वासांसह नवरदेवाच्या मागे मागे जाऊ लागला. त्याच्याच मागावर आपल्याकडची थोर पुरुष मंडळी ही गेली.

पण,
नवरदेवाने मांडवात यायला स्पष्ट नकार दिला. कारण, काय तर?? नवरदेवाने मागितलेली गाडी जयदीप वेळेत देऊ शकला नाही.

जवळ जवळ तास भर त्या नवरदेवाची समजूत काढून ही तो काही एक ऐकायला तयार नव्हता. एकीकडे तो नवरदेव हट्टाला पेटला होता.

तर, दुसरीकडे
नवरदेव असा अचानक नवरीला मांडवात सोडून गेल्याने बघणारा प्रत्येक जण पेचात पडला होता. काय  व्हायला हवं होतं अन् काय झालं होतं. खरं तर, हे कुणाच्याच मनाला पटत नव्हतं. 

गोड संसाराची नवी स्वप्न उराशी बाळगून अंतरपाटाच्या पलीकडे हातात वरमाला घेऊन उभी असलेली रेवा एकटक त्या दिशेला बघत होती. 

क्षणात होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय?? हे कदाचित त्या क्षणी तिला कळले असावे.