Login

अन् त्यांना प्रेम झाले ( भाग - ६ )

प्रेमाची सुरवात
भाग - ६     

नवऱ्या मुलाने मांडवा बाहेर पाय ठेवून दहा मिनिटे ही झाली नव्हती की लग्न मोडलं ही गोष्ट प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत होती. 

सोबत आपापल्या परीने चर्चेला उधाण ही आलं होतं. कुणी जयदीप भाऊच्या बाजूने बोलत होतं तर कुणी विरोधात.

" जयदीपने आधीच सोय करायला हवी होती. कसली हायतं म्हणते ही पोराकडची??" " कोण करील  लगीन रेवाशी?"

अश्या अनेक वाक्यांची कुजबुज मांडवभर घुमत होती.

तीच कुजबुज ऐकत जयदीप आणि मी जड झालेल्या पावलांनी स्टेजवर आलो. समोर रेवा स्टेजच्याच एका कोपऱ्यात शून्यात बघत बसली होती. 

तिचा पांढरा फिकट पडलेला चेहरा बघून जयदीप भाऊच अवसानच गळून पडलं. अन् त्याचा तोल जाणार तितक्यात तिथे विकी आला. त्याने भाऊला सांभाळून घेतले.

त्या क्षणी खूप अभिमान वाटला मला आपल्या विकीचा. 

विकीला जर एक इशारा केला असता तर त्या मुलाची काय हिम्मत होती रेवाला असं मांडवात सोडून जाण्याची. 

पण, नाही. मी नाही बोलावलं त्याला. 

आणि बरं झालं, ते लग्न मोडलं. आपली मुलगी अशा स्वार्थी माणसांत जाण्यापेक्षा ती आपल्या घरीच असलेली कधी ही बरी.

भरुन आलेल्या हृदयाचा भार सोसत जयदीप भाऊ स्वतःला सावरत हात जोडून " हे लग्न मोडलं" सांगत सगळ्यांशी माफी मागून लागला.

इतकं ऐकताच सगळ्यांच्या कुजबुजला जणू शिक्कामोर्तबच झाला.

जो तो जयदीप भाऊजवळ येत त्यांना शाब्दिक सांत्वना देऊ लागला. पण, सोबत त्याच गर्दीतून खोचक असे बोलणे ही ऐकू येत होते.

" जन्माला येताच आईला गिळून बसली. आणि आता बापाला ही गिळून बसते वाटतं."

ते शेवटचे काही शब्द ऐकून पोटात गोळा आला माझ्या. आता काय करावे विचार करतच होते की, समोर  विकी दिसला.

हीच ती वेळ होती जयदीप भाऊसाठी काही करण्याची.

माझं ठरलं. रेवाला सून करुन घ्यायचं मनोमन मी ठरवलं. म्हणूनच, " थांबा ss" समोरच्या गर्दीला बघत उद्देशून म्हणाले. 

तसे,
सगळे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या अगदी जयदीप भाऊची सुद्धा.

अन्,
दीर्घ श्वासा सोबतीला घेत मी बोलून गेले.

" रेवाचं लग्न याच मांडवात होणार अन ते ही आताच."

नवरा मुलगा मांडव सोडून गेल्यावर , लग्न मोडलेलं असताना ही रेवाचं लग्न अन् ते ही याच मांडवात कसं शक्य आहे. हाच प्रश्न घेऊन सगळे माझ्या पुढच्या शब्दांकडे कान देऊन होते.

जयदीप भाऊ ही आश्चर्य होतं माझ्याकडे बघत होता. त्याच्या नजरेला नजर देऊन थोडंसं स्मित हास्य करत त्याला विचारले.

" भाऊ ss
माझ्या मुलाला तुझा जावई म्हणून स्वीकारशील?"

अन्,
त्याचे डोळे आनंद मिश्रित वाहू लागले. तर, विकीचे डोळे सताड उघडे होते. कदाचित मी असं काही बोलेन याची त्याला कल्पना ही नव्हती.

मला ठाऊक होतं तो एकटक माझ्याकडे बघत होता. पण, त्या क्षणी माझ्या संस्कारावर विश्वास ठेवून मी पुन्हा एकदा जयदीप भाऊला विचारुन बसले.

" बोल ना.
तुझ्या मुलीला माझी मुलगी म्हणून माझ्या घरी पाठवशील?"

जयदीप भाऊसह मांडवातला प्रत्येक माणूस आश्चर्यात पडला होता. भाऊच हित पाहणाऱ्या व्यक्तींना माझं बोलण पटलं होतं. तर काही जणांच त्यांच्या विचारांप्रमाणे तोंड वाकडं झालं होतं. 

भाऊंनी हो म्हणावं अशी तिथल्या वडीलधाऱ्यांची इच्छा होती.

मात्र,
जयदीप भाऊ रेवाकडे पाहू लागले. ती अजूनही शून्यात नजर गढवून बसली होती. अन्, त्याने एकाएकी होकारार्थी मान हलवली.

त्या होकारामागे लगेच दुसऱ्या प्रश्नाने उभा टाकले होते.

" कृष्णाई ss
मला वाटतं , तू एकदा विकीला विचारावं."

मी हलिकिशी मान वळवून विकीला पाहिले. पुढे काही बोलणार तितक्यात विकी पुढे येत बोलू लागला.

" मामा ss
मी लग्नाला तयार आहे. माझ्या आईचा शब्द हा शेवटचा शब्द असेल."

आपल्या मुलाच्या तोंडून हे ऐकून कुण्या आईचं उर भरुन येणार नाही. माझं ही आलं. तुम्ही हे बघायला तिथे हवे होता.

आईच्या एका शब्दाखातर मुलगा त्याच आयुष्य जसं घडत होतं तसं घडू देत होता.

एक दीर्घ श्वास घेत डोळे मिटले अन् तुम्हाला आठवले. अन् , पुन्हा सुटकेचा निःश्वास टाकत हळू हळू डोळे उघडले.

नक्कीच,
माझं चुकलं असेल. 

विकीला न विचारता त्याच्या आयुष्यासाठी खूप मोठा निर्णय घेतला होता. असं असलं तरी कुठेतरी आतल्या आत अंतर्मनाचा एक सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.

जरी मी विकीच मत जाणून न घेता त्याच्यासाठी आयुष्याची जोडीदारीन निवडली असली तरी रेवा त्याच्यासाठी अगदी योग्य असणार याची खात्री होती.

रेवाच्या सोबतीने त्याचा संसार सुखाचा होईल एवढं पक्क ठाऊक होतं माझ्या मनाला.

कारण,
रेवा जयदीप भाऊच्या संस्कारात वाढली होती. शिवाय, तिला नात्यांच्या महत्वाचे शिकवण चांगले दिले गेले होते.

आईची छाया तिच्यावर नव्हती म्हणून काय झालं जयदीप भाऊ तिच्यावर आई वडील दोघांचे छत्र घेऊन खंबीरपणे उभे होते.

अन्, अखेर  
ते दोघं लग्न बंधनात अडकले.