Login

अन् त्यांना प्रेम झाले ( भाग - ८ )

प्रेमाची सुरवात
भाग - ८

पण,
मोकळ्यापणाने बोलणारी रेवा आज खूप शांत शांत होती. शांततेचं कारण ही कदाचित माहीत होते माईंना.

मात्र,
ही शांतता भंग करणं खूप गरजेचं होतं. कारण, रेवाच्या न बोलण्याने तिच्या आतल्या आत खूप काही साचत होतं जे तिच्यासाठी अजिबात चांगले नव्हते.

म्हणूनच, 
या शांततेला चिरण्याचा प्रयत्न करीत त्या बोलू लागल्या. 

" झोपलीस का?"

त्यावर रेवाने हलकासा चेहरा वर करुन पाहिले. तिचे डोळे आसवांनी गच्च भरले होते. रडून रडून तिच्या डोळ्यांना हलकीशी सूज ही आली होती.

अन्,
पुन्हा ती जैसे थे तैसी झाली.

तिचा फिका पडलेला चेहरा बघून माईंच्या डोळ्यात टचकन पाणी आल्या शिवाय राहिले नाही. अन् पुन्हा त्या मायेने तिच्या केसांवरून हात फिरवू लागले.

" मी समजू शकते.
या क्षणी तुझ्या मनात काय सुरु आहे. हेच ना, हळद एकाच्या नावाची लागली तर गळ्यात मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावाचं.

पण, एक सांगू जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. यावर माझा विश्वास आहे आणि बाळा तू ही कर. खूप साधा आहे गं माझा विकी. खूप गुणी संस्कारी आहे.

हुशार तर आहेच तो पण एक जबाबदार व्यक्ती सुध्दा आहे. आणि मन तर लहान मुलांप्रमाणे स्वच्छ व निर्मळ आहे त्याचं.

मी त्याची आई आहे म्हणून हे सगळं बोलत नाहीय तर त्याच्या मनाचा, स्वभावाचा आरसा दाखवतेय तुला. जेणेकरुन तू त्याला समजू शकशील.

ऐकतेयस ना? "

रेवाची कसलीच हालचाल होत नसल्याने माईंनी बोलता बोलता मुद्दामूनच रेवाला हटकले. तरी ही रेवा एक नाही की दोन नाही.

पुन्हा माईंनी हळूच वाकून पाहिले, तर रेवा लहान मुलांप्रमाणे शांत झोपी गेली होती. याचा अर्थ विकी बद्दल तिने काही ऐकलेच नव्हते.

माईनी गाली स्मित हास्य केले. व् रेवाच्या डोक्यावर वाकून अलगद तिच्या कपाळी" गुड नाईट" म्हणत किस केले.

रेवाच लग्न मोडलं होतं या गोष्टीचं माईंना जरा ही वाईट वाटत नव्हते. कारण, त्यांचं ठाम मत होतं, अशा व्यक्तीच्या घरी आपली मुलगी देण्यापेक्षा ती घरीच असलेली बरी.

शिवाय,
रेवा आता त्यांच्या घरची सून झाली होती. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हंटले तर, माईंना रेवाच्या रुपात मुलगीच मिळाली होती.

ती आपल्या घरी नेहमी हसत राहील याची खात्री त्यांना होतीच. म्हणूनच, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या अन् चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या. हे माईंना ठरवले होते.

" चला,
हे ही बरं झालं. विकी बद्दल ऐकण्याआधीच तुला झोप लागली. कदाचित तुम्हा दोघांचं एकमेकांना हळू हळू समजून घेणंच योग्य असेल."

" गुड नाईट, बाळा."

पायाजवळचं पांघरून रेवावर टाकून माईंनी ही अलगद पाठ बेडवर टेकवली.

..

..
  वर्तमान काळात

अन् अखेर,
त्यांचे लग्न झालेच. दोन अनोळखी व्यक्ती लग्न बंधनामुळे एकमेकांशी जोडले गेले. आज पासून त्यांच्या आयुष्याची नवी सुरवात होणार होती.

सूर्य नारायण नेहमीप्रमाणे या जगी अवतरले होते. सर्वत्र पसरणाऱ्या त्यांच्या किरणांनी सगळ्यांना जीवन देण्याचे काम ते आज ही चोख पार पाडत होते.

त्याच किरणांनी खिडकीच्या परद्यांशी जणू पकडा पकडीचा खेळ खेळून माईंच्या खोलीत प्रवेश केला. त्या किरणांनी रेवाचा चेहरा झोपेतही तेज उजळून आला होता.

पण,
त्यामुळे रेवाची झोप मोड ही झालीच. कधी उजव्या कुशीवर तर कधी डाव्या कुशीवर कुस बदलत तिची हालचाल होऊ लागली. की, तिच्या कानांना कसलीतरी कुजबुज ऐकू आली.

अन्,
तिचे कान टवकारले. थोडीशी अस्वस्थता ही तिच्या मनी जाणवू लागली.

झोप व् जाग यांच्या मध्य स्थितीत असूनही रेवा त्या आवाजाचा आढावा घेत होती. पुन्हा तिच्या कानांना काही आवाज ऐकू आले.

पण या वेळी तो आवाज हळूवारपणे कुजबुजण्याचा नसून मन मोकळ्याप्रमाणे खळखळून हसण्याचा, बोलण्याचा होता. या आवाजाने अस्वस्थ झालेल्या रेवाचं मन थोडं शांत झालं. तिने अलगद डोळे उघडले अन् एक क्षण दचकली.

तिने घाबरून इकडे तिकडे पाहिले. अन् तिथेच बेड शेजारी ठेवलेल्या टेबलावर माई अण्णांचा फोटो  दिसला. ज्यात त्यांच्यासोबत विकी ही होता.


अन्
एकाएकी काल मांडवात घडलेला सगळा प्रकार रेवाच्या डोळ्यासमोरुन फिरु लागला.

" सजलेला मांडव , मांडवातली ती गर्दी , हातात वरमाला घेऊन उभी असलेली रेवा, अचानक नवऱ्या मुलाचं लग्नासाठी नकार देणं, जयदिपचं हात जोडणं, नवऱ्या मुलाचं मांडव सोडून निघून जाणं अन् अखेर विकी सोबत लग्न होणं.

एखाद्या पिक्चरमधल्या सिनप्रमाणे एक एक दृश्य पुन्हा जशास तसं तिच्या नजरेसमोर तरळत होतं. अन् ती वास्तवात आली जेव्हा पुन्हा काही हसण्याचे आवाज तिच्या कानांना धडकले.

तिच्या मनी जाणून घेण्याची कुतूहल निर्माण झाली. अन्, ती बेड वरुन उठली.

( क्रमशः )