Login

अन् त्यांना प्रेम झाले ( भाग - ९ )

प्रेमाची सुुरवात
भाग - ९

बाहेरून येणाऱ्या आवाजांनी रेवाच्या मनी कुतूहलता निर्माण होऊ लागली. तिच्या ही नकळत ती बेडवरून उतरु लागली.

अन्,
सरळ रूम बाहेर पडली.

जसं जशी ती पाऊल पुढे पुढे टाकीत होती तसं तसे खळखळून हसण्याचा आवाजाचा स्तर उंचावत होता. अधून मधून काही शब्द अस्पष्टसे ही ऐकू येत होते.

" तुम्ही ना.  काय करू तुमचं मी "

" माई ss" 
आवाज ओळखीचा वाटून रेवाच्या तोंडून आपसूक माईचे नाव निघाले. फक्त आवाजावरून रेवाने ओळखले होते. अन् ते खरे ही ठरले.

तो आवाज माईंचाच होता. कारण, रेवा हॉलमध्ये पोहचता तिने पाहिले. समोर डायनिंग टेबलावर माई अन् विकी एकमेकांना टाळी देत हसत होते.

तर,
अण्णा स्वयंपाक घरातून चहाचा ट्रे बाहेर आणीत होते.

समोरलं दृश्य पाहून रेवाला आश्चर्य वाटले. अन् तिच्या ही अपरोक्ष तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू पसरले. कारण तिथे हसूच हसू पसरले होते.

त्या ठिकाणचं वातावरण इतकं हलकं झालं की रेवाला पुढे जाण्याचे काही भानच उरले नाही.

समोर माई विकी अण्णा हसून, मस्करी करत, गप्पा मारत चहाचा एक एक घोट घेत होते. त्या क्षणीच ते दृश्य म्हणजे सुखी परिवराचं सुखद चित्रच जणू. पण, आता ती ही या सुखद चित्राचा भाग झाली होती हे तीच्या लक्षातच आले नव्हते.

आपल्यामुळे त्या चित्रात व्यथ्य नको म्हणून रेवा जागीच उभी राहून त्यांना फक्त बघत होती.

..

..

" नाही नाही.
आज माझ्या आवडीची भरली भेंडी बनणार. हो ना आई?"

मुद्दाम माईंना मिठी मारून विकी अण्णांना जवळजवळ चिडवित होताच सोबत माईना मस्का ही मारत  होता.

एकीकडे मुलगा असल्याचं विकीने ट्रम्प कार्ड वापरलं होतं तर दुसरीकडे अण्णांनी ही नवरा असल्याचं पुन्हा अधोरेखित करीत भारदस्त आवाजात फर्मान सोडला.

" अजिबात नाही.
माझी बायको माझ्या आवडीची म्हणजे अळूच फदफद बनविणार."

त्यांच्या भारदस्त आवाजाला माई व् विकी न घाबरता उलट ते दोघे ही पोट धरुन जोरजोराने हसू लागले. तेव्हाच विकिच लक्ष मागे उभी असलेल्या रेवाकडे गेलं.

आता ही तिच्या चेहऱ्यावर हसू होते.

ना एक पाऊल पुढे आली होती ना एक पाऊल मागे सरकली होती. तिथेच उभी राहून ती ते क्षण जणू नजरेत टिपून घेत होती.

तिचा हसरा चेहरा बघता विकीला ही हायसे वाटले. कालचा ताण ग्रस्त झालेला चेहरा त्या क्षणी हलका फुलका भासत होता. वास्तवाचं भान येता त्याने लगेच माईंला खूनाविले.

अन्,
माईंनी वळून पाहिले. व् आवाज लगावला.

" रेवा ss
इकडे ये बाळा. तिकडे काय करतेयस?"

तशी,
हळूवार पाऊल उचलत रेवा डायनिंग टेबलाच्या शेजारी जाऊन उभी राहीली.

" उभी का आहेस? ये. इथे बस माझ्या शेजारी. "

रेवाच्या हाताला धरुन माईंनी तिला डायनिंग टेबलावर बसवले. तशी, ती ही गप गुमान बसली. माईंच्या पलीकडून विकी बसला होता तर अण्णा समोर बसले होते.

" गुड मॉर्निंग, बाळा." 

अण्णांनी स्वतः हून बोलण्याची सुरवात केली. त्यावर रेवाने ही स्मित हास्य करत गुड मॉर्निंग विश केले. मग काय? अण्णां मागोमाग विकीने ही बोलण्याची संधी शोधली.

" गुड मॉर्निंग, रेवा. "

विकीच्या आवाजाने तिचं लक्ष विकिकडे गेलं. विकी ओठी हसू घेऊन तिच्याकडे बघत होता. मात्र, रेवा तितकी न हसता विकिला प्रती उत्तर म्हणून हळूवार आवाजात गुड मॉर्निंग विश केले.

" थांब,
मी रेवाला चहा आणतो."  म्हणत, अण्णा स्वयंपाक घरात निघून गेले. त्यांना रेवाचा ऑकवर्डपणा कमी करायचा होता.

विकी अधून मधून तिला बघत होता हे रेवाला जाणवत होतं. म्हणूनच रेवाची नजर ही इकडे तिकडे सैर बैर होत संचार करु लागली.

तितक्यात,

" कुणी आहे का घरात?" 

तिच्या कानांना आणखीन एक खूप ओळखीचा आवाज ऐकू आला. तिने गरकन मान वळवून दाराकडे पाहिले.

दाराच्या पल्ल्याड जयदीप उभे होते.

जयदीप त्यांना बघून रेवा लहान मुलांप्रमाणे पळत सुटली. पण, काही पाऊल पुढे जाता अचानक थांबली.

तिला असं थांबलेलं बघून तिच्या थांबण्यामागचं कारण माईंना कळून चुकले.

" अगं,
तुझं हे सासर फक्त नावाला सासर आहे बरं का. या घरात काल ही सासरवास नव्हता पुढे ही नसेल. पुढे पाऊल उचलेलं मागे घेऊ नकोस."

तशी,
रेवा पळत जाऊन जयदीप यांना बिळगली.

तितक्यात,
त्यांच्या मागून बायकांच्या घोळक्यातून एक कणखर आवाज आला. " आम्ही पहिल्यांदा तुझ्या घरी आलोय. आत बोलवते का नाही? का इथंच पाहुणचार करशील?"  

तो गोड टोमणा ऐकून रेवा खुदकन हसू लागली.

कारण,
तिला ठाऊक होते इतका गोड टोमणा तिच्या शकू मावशी शिवाय दुसऱ्याला देणं जमणार नव्हतं.

" असं कसं शकू. 
दारातच पाहुणचार करु. चांगलं आत बोलवून चहाची आंघोळ घालू तुला आम्ही दोघी माय लेकी. काय गं रेवा." 

माईंनी ही लगेच प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले.

" हो. आत्तू. "

रेवाने ही माईंच्या सवालाला उत्तर दिले. तिचं उत्तर ऐकून मुलगी रमतेय हे बघून सगळ्यांना च बरे वाटले. विशेषतः जयदीप ला.

( क्रमशः )