Login

अनघाची तप्तपदी ( भाग 3 )

दादा काल रात्री गडबडच झाली . वहिनीला तुझ्या आजाराबद्दल सगळं कळलं . सध्या तरी ती शांत आहे . मम्मी सोबत किचन मध्ये आहे . तू बघ आता कसं काय करायचं ते . पण सावध रहा . तिला कोणाला काही सांगू देऊ नकोस नाहीतर इतके दिवस आपण जपून ठेवलेलं सगळीकडे होईल . किती बदनामी होईल आपली . मी थोड्या वेळात तिला काहीतरी कारण काढून इथे पाठवते . तू बोल तिच्याशी . " ' शिट ! हे काय झालं ? पहिल्याच दिवशी नको ते समजलं तिला . आता कोणत्या तोंडाने तिच्या समोर जाऊ मी ? पण नाही मी जर असा अपराधी वाटून घेत राहिलो तर आयुष्यभर मला तिची हाजी हाजी करावी लागेल . नाही नाही ते काही नाही . तिला चांगली मुठीत ठेवली पाहिजे . ' विनय मनोमन अनघाला ताब्यात ठेवण्याचे ठरवतो .



रडत , स्वतःवर चिडत आणि नशिबाला दोष देत कधीतरी अनघाचा डोळा लागला .सकाळी जरा उशीराच जाग आली .पटकन फ्रेश होऊन ती समान आवरायला लागली . इथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची तिची इच्छा होती . 


तितक्यात आईचा फोन आला 


" कशी आहेस बाळा ? सगळं छानच असेल , इतकं मोठं घर , इतकी चांगली माणसं , आता आमची आठवण येत नसेल तुला .आणि यायलाच कशाला हवी ग . तू तिथे आनंदात असणं हेच आमच्यासाठी सुखाचं आहे . जावई बापू कसे आहेत ग ? आणि बाकीचे सगळे ? पाहुणे गेले की आहेत अजून ? " आईने विचारले .


आईला लेकीशी किती बोलू आणि किती नाही असे झाले होते . पण अंजुने आईच्या हातातून फोन घेतला आणि बोलू लागली .


" काय ग तायडे , फोनही केला नाहीस गेल्यापासून ? जीजू सोडत नाहीत वाटतं ? आता तर \" मुझे एक पल चैन ना आये साजना तेरे बिना \" हेच सुरू असेल तुझं . अजून सांग ना काय काय म्हणतायेत आमचे जीजु ? ए फोन दे ना त्यांना मला बोलायचं आहे ." अंजू म्हणाली .


" अंजू अग काय हे , तिकडे कोणी असेल समोर , दे फोन मला बोलू दे . अनु बेटा कसं आहे माझं सोनूलं ? फार आठवण येतेय बाळा तुझी . घर अगदी सूनं सूनं वाटतं . तुझी आई मला आजिबात चांगलं काही करून देत नाही खायला , नुसती तुझी आठवण काढून झुरत असते . ये बरं लवकर . मी बोलतो जावई बापुंशी पाचपरतावण्यासाठी कधी येताय तुम्ही ? काळजी घे पोरी . आमची आजिबात काळजी करू नकोस . तू मस्त रहा .तुला इतकं छान स्थळ मिळालं आता माझी अर्धी काळजी मिटली. आता अंजुलाही चांगलं स्थळ बघतील बघ ते , पप्पा म्हणाले मला तसं. ठेवतो आता फोन ,आणि जमेल तसा फोन करत रहा . " बाबांच्या बोलण्यात लेकीची आठवण आणि त्यासोबत आनंदही होता .



अनघाला काहीच सुचत नव्हतं . त्या तिघांचं तिच्यामुळे आनंदी असणं हे तिला बोचत होतं . शेवटी " सगळं छान आहे , काही काळजी करू नका . नंतर बोलते मी निवांत मम्मी बोलवत आहेत मला " असं बोलून तिने फोन ठेवला .


हतबल होऊन ती बसून राहिली .


\" आपण परत गेलो तर आई बाबांच्या मनावर किती आघात होतील ? बाबा , बाबातर स्वतःला किती त्रास करून घेतील ? आणि अंजू ? तिने डोक्यात राग घेऊन काही बरंवाईट केलं तर ? बाहेरचे लोकही जगणं असह्य करतील त्यांचं . त्यांना हे कदापि सहन होणार नाही , त्यांना काही झालं तर ? नाही नाही मी असं होऊ देणार नाही . माझ्यामुळे आई बाबांना आणि अंजुला कुठलाही त्रास मी होऊ देणार नाही .\" मोठ्या प्रयासानं अनघाने मनावर दगड ठेवला . देवाला हात जोडून या संकटाशी सामना करण्यासाठी शक्ती आणि हिम्मत मागितली . आणि एक नवं आव्हान स्वीकारण्यासाठी ती तयार झाली .


विनय रूम मध्ये आला . 


" सॉरी डियर , काल रात्रीबद्दल खूप खूप सॉरी . पण आज मात्र आपण कालचीही कसर भरून काढूया ." विनय तिच्याजवळ येत म्हणाला . 


पण अनघा पटकन बाहेर निघून गेली . विनयला वाटलं की लाजली . \" अजून सगळं नवीन आहे . तिलाही वेळ लागेल इथे .आपण तिच्या कलाने घेऊया \" विनय असा विचार करत असतानाच सरिता रूम मध्ये आली . दबक्या आवाजात बोलू लागली . 


" अरे दादा काल रात्री गडबडच झाली . वहिनीला तुझ्या आजाराबद्दल सगळं कळलं . सध्या तरी ती शांत आहे . मम्मी सोबत किचन मध्ये आहे . तू बघ आता कसं काय करायचं ते . पण सावध रहा . तिला कोणाला काही सांगू देऊ नकोस नाहीतर इतके दिवस आपण जपून ठेवलेलं सगळीकडे होईल . किती बदनामी होईल आपली ? मी थोड्या वेळात तिला काहीतरी कारण काढून इथे पाठवते . तू बोल तिच्याशी . " सरीता म्हणाली .


\" शिट ! हे काय झालं ? पहिल्याच दिवशी नको ते समजलं तिला . आता कोणत्या तोंडाने तिच्या समोर जाऊ मी ? पण नाही मी जर असा अपराधी वाटून घेत राहिलो तर आयुष्यभर मला तिची हाजी हाजी करावी लागेल . नाही नाही ते काही नाही . तिला चांगली मुठीत ठेवली पाहिजे . \" विनय मनोमन अनघाला ताब्यात ठेवण्याचे ठरवतो .



घरात सगळेच सगळं नॉर्मल असल्याचं दाखवत होते आणि अनघासुद्धा शक्य तितक्या शांतपणे राहण्याचा प्रयत्न करत होती . तिला शांत बघून मम्मी पप्पांना सुद्धा बरं वाटलं होतं .


" अनघा हे बघ हे तुझंच घर आहे . इथे तुला काहीच कमी पडणार नाही .आणि कोणाचाच संसार परिपूर्ण नसतो . काहीतरी कमतरता तर असणारच ना .आता तुझ्या रुपाबद्दल , घराबद्दल आम्ही ऍडजस्ट केलंच ना तसच तुलाही थोडफार ऍडजस्ट करावच लागेल . ते प्रत्येकालाच करावं लागतं . त्यामुळे आता सगळं विसर आणि सुखाने संसार करा . जा विनयला नाश्ता देऊन ये ." मम्मी म्हणाल्या . 


अनघाच्या डोळ्यात पाणी तरळल . तोंडातून शब्द फुटत नव्हता .ती प्लेट घेऊन रूम मध्ये आली . विनय तिची वाटच बघत होता .


ती काही न बोलता प्लेट देऊन परत जाऊ लागली तसा विनयने तिचा हात पकडला . गोड शिरशिरी येण्याऐवजी तिला रागच आला . विनयने तिला जवळ बसवलं .


" अनु हे बघ आता आपलं लग्न झालंय . माझा छोटासा प्रोब्लेम आहे हे तुला कळलंच आहे पण त्याने आपल्या आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही . मी तुला खूप प्रेम देईल . इथे तू ऐश करशील . तुझ्या बाबांकडे राहिलीस तसं इथे काहीच कमी नाही . फक्त माझ्याबद्दल कोणाकडे बोललीस तर खबरदार . आता सगळं विसर आणि माझी हो . " 


अनघाचा पारा चढला.


 " ही शुद्ध फसवणूक आहे . आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नसलो तरी काही रस्त्यावर पडलेलो नाही . मी इतकी शिकलेली आहे , संस्कारी आहे . आमच्याशी खोटं बोलून फार मोठी चूक केली आहे तुम्ही लोकांनी . माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा , मी का गप्प बसू ? " अनघा म्हणाली .


अनघाचा आवाज ऐकून सगळे धावत आले .


" हे बघ अनघा या घरात माझ्या मुलाशी असं बोललेलं आम्हाला चालणार नाही . इतकं काही तुझं आयुष्य बरबाद वगैरे झालेलं नाहीये . त्याचा आजार काही फार मोठा नाही . औषध व्यवस्थित घेतले की कोणालाही काही समजणार नाही . आता या विषयावर चकार शब्द बोलशील तर याद राख .चला सगळेजण बाहेर . विनय तू आणि तुझी बायको काय ते बोला पण आज शेवटचं . यापुढे हा विषय घरात निघायला नकोय . " मम्मीने निक्षून सांगितलं आणि सगळे बाहेर निघून गेले .


अनघा मूकपणे अश्रू ढाळत राहिली . तिने विनयकडे बघितलं . त्याच्या डोळ्यात तिला लाज , शरम असं काहीच दिसलं नाही .त्यामुळे तिची अजूनच चीड चीड झाली . 



अनघा काहीच बोलत नाही असं बघून विनय तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन बसला . अनघाला त्याचा स्पर्श आश्वासक वाटला . खरंच आपण ओव्हर रिॲक्ट तर करत नाही ना ? दोष कोणात नसतात ? आपण आततायीपणा केला तर आई बाबांना त्रास होऊ शकतो म्हणून थोडं सयमान घ्यायचं तिने ठरवलं .



विनयचा हात तिने हातात तसाच राहू दिला . विनयने हसून तिला शिर्याचा घास भरवला. तिनेही विनयला घास भरवला . सरिताने गुपचूप बघितले आणि आनंदाने मम्मीला जाऊन सांगितले . मम्मी सुद्धा खूप खुश झाली .



अनघा खूपच सावरली होती . चार दिवसानंतर तिला माहेरी जायला मिळणार होते .अर्थात विनय सोबत असणार होता .


दोघांच्या मनाच्या तारा पूर्ण जुळल्या नव्हत्या तरी हळू हळू ते दोघे जवळ येत होते . विनय अगदी नॉर्मल वाटत होता त्यामुळे अनघा मनातून निश्चिंत होती . 


चौघेही अनघाच्या माहेरी आले . तिथे त्यांचं थाटात आगत स्वागत झालं . पूजा झाली . अनघाच्या आई बाबांनी रीतीप्रमाने सगळं केलं होतं . विनयच्या आईला त्यांनी केलेला मानपान आवडला नव्हता पण तरीही त्या गप्प बसल्या . 


अनघाला बघून आई , बाबा , अंजू सगळे खूप आनंदले . अनघाच्या सगळ्या मैत्रिणी जमल्या . सगळ्यांनी मिळून पुन्हा अनघाची आणि विनयची चेष्टा करायला सुरुवात केली .



उगीच विनयच्या घरच्यांना काही वाटेल म्हणून सुधाबाईंनी मुलींना दटावले . तश्या सगळ्या गप्प झाल्या . त्यांनाही लेकिशी भरभरून बोलायचे होते पण तिच्या सासरच्या माणसांपुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत . संध्याकाळी सगळे आत्याकडे गेले आणि फक्त अनघा तेव्हढी राहिली .

पाहुणे जातच अनघा आईच्या कुशीत शिरली . तिला रडू कोसळलं . आईचेही डोळे पाणावले . अंजुही बिलगली . बाबा एकटे दूर उभे राहून डोळे पुसत होते .



" पुरे आता , तिघी मिळून पुर आणाल आता गावात . आणि मलाही भेटू द्या माझ्या लेकीला . आणि तिची हाल हवाल विचारू द्या की . कशी आहेस माझ्या सोन्या ? किती वाळलीस ग पोरी . खूप काम पडत का ग " बाबा म्हणाले .



अनघा बाबांना बिलगली " मी खूप मजेत आहे बाबा . पण तुम्हा सर्वाची खूप आठवण येते मला . मग रडू आवरत नाही ." 


" ह्या म्हणे वाळलीस , काही नाही उलट वजन वाढलं तायडीच . तिकडे काय बाबा किती नोकर कामाला , मॅडम नुसत्या ऑर्डर सोडणार आणि नवऱ्यासोबत रोमान्स करणार . हो ना ग , कुठे जाताय हनिमूनला ? " अंजुने अनघाला चिडवत विचारलं .


" गप ग , या मुलीला ना काहीच कळत नाही . दिवसेंदिवस आगाऊ होत चालली आहे .कोणासमोर काय बोलावं काही कळत की नाही ? जा आत जाऊन छानसं सरबत करून आण बरं . अनु बोल बाळा . सगळं ठीक आहे ना , जावईबापू , सासूबाई सगळे नीट वागवतात ना तुला ? सवय नाही तुला आम्हाला सोडून राहायची . पण जनरीत आहे पोरी सवय करावीच लागेल आता . पण रुळाशिल लगेच . " अनघा आईच्या कुशीत शिरून शांतपणे डोळे मिटून पडली . 


किती छान समाधानी वाटत होतं तिला . आणि कोणाला काही कळलं नाही याचाही बर वाटलं होतं . 

तितक्यात विनयचा फोन आला . तो येणार होता .अनघा उठून तयार होऊन बसली .



" आई आम्ही दोघं थोडं फिरून येतो . आल्यावर लगेच निघू परत जायला ." विनय म्हणाला .



" मी काय म्हणते जावईबापू , पोरिशी पोटभर गप्पाही झाल्या नाहीत , अनुला चार दिवस राहू द्या ना इथे . " आईने विनंती केली.



" अहो आई नंतर येईल ना ती . आता आम्ही जाणार आहोत आठ दिवस मनालीला . आल्यावर मग बघुया . आता निघायला हवं ." विनय म्हणाला तसा आई बाबांचा नाईलाज झाला .


 पण त्यांना बरही वाटलं . दोघं चार दिवस मोकळ्या वातावरणात गेले तर एकमेकांच्या अजून जवळ येतील आणि शिवाय मुलगी सासरी सुखात असावी हेच प्रत्येक आई बाबाला वाटत असत ना . 

आई , बाबा आणि अंजुचा निरोप घेऊन अनघा आणि मंडळी परत घरी आली .

खरंच जावं की नाही हनिमूनला ? अजूनही अनघा साशंक होती


क्रमश...

🎭 Series Post

View all