Login

अनघाची तप्तपदी ( भाग 9 )

मम्मीनी या गोष्टीचा नेहेमीप्रमाणे कांगावा करून गोंधळ सुरू केला . " देवा देवा काय ही मुलगी ? म्हाताऱ्या सासऱ्याला आजारी नवऱ्या सोबत सोडून स्वतः गेली भटकायला . कुठल्याच गोष्टीची काळजी नाही . माझंच चुकलं . मीच माझ्या मुलाच्या गळ्यात ही धोंड बांधली . ही आयुष्यात आल्यापासून वाटोळे झाले त्याचे . ते काही नाही विनू तू चल आपल्या घरी परत . मी आता तुला त्या अवदसे बरोबर आजिबात राहू द्यायची नाही . तू आणि परी आपल्या घरी चला . माझी शपथ आहे बघ तुला . " विनयचा नाईलाज झाला . यावेळी परीलासुद्धा सोबत नेऊन मम्मीने आपला डाव खेळला . अनघा परत आली आणि तिला सगळं समजलं . तिच्या काळजावर पुन्हा एकदा दगड कोसळला .


अनघाची पी.एच.डी. पूर्ण झाली . आता तिला हायस वाटत होतं . पुढे काय ? हा मोठा गहन प्रश्न पुढे आ वासून उभा होता . परीलासुद्धा सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून दोघी मायलेकी अनघाच्या माहेरी आल्या .
अंजू बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती . तिच्या बाळासोबत परीची मस्त गट्टी जमली होती . अनघा आईच्या कुशीत विसावली .

" अनु बाळा , आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस ? आता तू विनयच्या घरी परत जावंस अशी आमची आजिबात इच्छा नाहीये . तुझी पी.एच.डी पूर्ण झालीय तेव्हा आता तुला छान नोकरी मिळेल . मग बघू पुढे काय करायचं ते . मी परीच्या एडमिशन च बघतो . आपण जाऊन तुझ सामान आवरून येऊ लगेच . विनयला फोन करून बोलावून घेऊ इकडेच . आता एक घाव दोन तुकडे करून टाकणार आहे मी . बास्स आता नाही सहन होत माझ्याच्याने ." बाबा पोटतिडकिने बोलत होते .

" खरयं बाबांचं , अनु आता तुला आम्ही नाही पाठवणार परत . आणि इथेच बघ काय ती नोकरी बघायची ते . आमच्या डोळ्यासमोर राहिलेली बरी ग तू . आणि परीचीही चिंता राहणार नाही . अंजू आणि जावईबापू सुद्धा आहेत आपल्याबरोबर . अहो तुम्ही जाऊन अनुच सामान घेऊन या . घर मोकळं करून या . आता तिला आजिबात पाठवायची नाही मी त्या घरात . विनयराव काय म्हणतायेत ते बघू ते जर इथे येऊन राहायला तयार असतील तर ठीकच नाहीतर बघू मग . लताबाई काही त्यांना सहाजा सहजी येऊ देणार नाहीत आणि तुलाही सुखाने राहू देणार नाहीत . तुझं काय म्हणणं आहे ग बेटा ? " आईने सुद्धा बाबांची री ओढली .

अनघाला सुद्धा परत जावसं वाटत नव्हतच पण तिचा जीव विनयमध्ये अडकला होता . त्याच्या मनात काय होतं कोणास ठावूक ? पण परीसाठी तरी दोघांनी एकत्र राहणं महत्त्वाचं होतं . अनघा काही बोलणार इतक्यात विनयचा फोन आला .

" अनु , अगं माझी तब्येत ठीक नाहिये . मी हॉस्पिटल मध्ये आलोय . मम्मी पप्पा लग्नाला गेलेत . मला तुझी गरज आहे ग ये ना प्लीज ." विनय काकुळतीला येऊन म्हणाला .

अनघाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता बॅग घेतली आणि ती विनय कडे जायला निघाली . बाबासुद्धा सोबत निघाले पण अनघाने त्यांना येऊ दिलं नाही . परीला मात्र आईने स्वतःकडेच ठेवून घेतलं .

अनघा पोचली . विनय हॉस्पिटल मध्येच तळमळत होता . अनघाला बघताच तो हवालदिल झाला . त्याच्या डोळ्यात पाणी होतं . अनघा त्याला अश्या अवस्थेत बघून खुप घाबरली . तिने ताबडतोब डॉक्टरला " नक्की काय झालं ? " म्हणून विचारलं .
डॉक्टरने सांगितल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली .
विनयची एक किडनी अनेक वर्षांपासून फेल झालेली होती . सध्या एकाच किडनीवर लोड आल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होत चालली होती . त्यामुळे विनयच्या हार्टला सुद्धा त्रास होऊ लागला होता . कोलेस्ट्रोल वाढलं होतं . खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली होती . काही दिवसातच डायलिसिस करावं लागणार होतं . आणि किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा करावी लागणार होती. अनघा मनातून खूप घाबरली होती . पण तरीही आता विनयला धीर देणे खूप गरजेचं होतं . पैसेही खूप लागणार होते .

दोन दिवसांनी विनयला डिस्चार्ज मिळाला . मम्मी पप्पा सुद्धा घरी आले होते . अनघाला बघून त्यांच्या चेहेऱ्यावर उमटलेली अढी तिला स्पष्ट दिसली पण अनघाने त्याकडे दुर्लक्ष केलं .

डॉक्टरने विनयच्या तब्येतीबद्दल जे सांगितलं ते ऐकून तर मम्मी चिडल्याच . " काही कळत नाही त्या डॉक्टरला . काहीही सांगतात ते . इतकं काही झालं नाहीये विनुला . आणि सगळं काही या या अनघामुळेच . हीचाच पायगुण हा . ही घरात आल्यापासून शांतता गेलीय घराची. नुसते एक झाले की एक प्रॉब्लेम येतच आहेत . पार वाट लावली आहे हिने घराची . आणि त्यात तिची ती पोरगी सुद्धा अवदसाच . " मम्मीने डोळ्याला पदर लावला .

" मम्मी आता बास करा . आणि माझ्या परीला काही बोललात तर याद राखा . इतकी वर्ष मला बोलत आहात ते मी सहन केलं पण माझ्या पोरीला कोणी काही बोललेल मी सहन करणार नाही . आणि विनयची ही अवस्था फक्त तुमच्यामुळेच झालिये . लहानपणापासून त्याला पोटाचा त्रास आहे , त्याने अनेकदा सांगितलं तुम्हाला पण तुम्ही लक्षच नाही दिलं त्याच्याकडे . आता मात्र हे इतकं भोगावं लागतंय त्याला . तुमचा नेहेमीचा शहाणपणा नडलाय दुसरं काही नाही ." अनघा पोटतिडकिने बोलली .

इतके दिवस काहीही न बोलता सहन करणारी अनघा आज मात्र गप्प बसू शकली नाही . विनयसुद्धा आता अनघाच्या बाजूने बोलत होता . त्यालाही तिचं पटत होतं .

" विनय काही चुकीचं बोलले का मी ? मी आता इथे राहू शकत नाही . फार मोठी चूक केली मी परत येऊन . तुझी खूप काळजी वाटते मला . इथे राहिलो तर मानसिक शांतता कधीच मिळणार नाही . आणि इतके दिवस मम्मी मला बोलत होत्या ते मी सहन केलं पण तुला आणि परीला बोललेल मी कदापी सहन करणार नाही . आपण एखाद भाड्याचं घर घेऊया आणि शिफ्ट होऊया तिकडे . आपला जो फ्लॅट आहे तो विकून टाकूया . तुझ्या ट्रीटमेंटला भरपूर पैसे लागतील . आपण सोय करून ठेवलेली बरी . आपल्याकडून कसूर होता कामा नये . बघ काय वाटतं तुला ? " अनघा निर्वाणीच बोलली .

" नाही ग अनु , तू बोललीस ते योग्यच होतं . आजवर गप्प बसलीस त्यामुळेच हे इतकं सगळं घडलं . पण आता नाही . परीला बोललेल मलाही चालणार नाही . मला माफ कर अनु मी तुला ओळखू शकलो नाही . मम्मीने मला नेहेमीच तुझ्याबद्दल नाही नाही ते सांगितलं आणि मी भावनेच्या भरात वेड्यासारखा वागलो . पण यापुढे नाही . मी तुला आणि परीला कधीच अंतर देणार नाही . आणि यापुढे मी बिझनेस सुद्धा अगदी मन लावून मेहनतीने करेन . यापुढे नेहेमी तुला सुखच देईन . मला माफ कर तुला हा सगळा त्रास भोगावा लागतोय तो फक्त माझ्याचमुळे . पण आता मात्र नाही . मी लगेच एखादा भाड्याचा फ्लॅट बघतो आणि आपलाही फ्लॅट विकायला काढतो . परीला घेऊन येऊया लगेच ." विनयने अनुचा हात हातात घेऊन वचन दिलं .

अनघा विनयच्या मिठीत विसावली . कितीतरी दिवसांनी आज तिला खूप बरं वाटत होतं .

अनघाच्या कॉलेज पासून जवळच त्यांना एक छानसा फ्लॅट भाड्याने मिळाला . दोघेही तयारीतच होते त्यामुळे लगेचच नवीन जागेत छोटीशी पूजा करून शिफ्ट झाले . मम्मीने गोंधळ घातलाच पण यावेळी कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही . सोसायटी खूप चांगली होती . परीला नवीन मित्र मिळाले आणि अनघालासुद्धा चांगली सोबत मिळाली .

विनय प्रॉमिस केल्याप्रमाणे धंद्यात लक्ष घालू लागला . अनघा मदतीला होतीच . आता सगळं सुरळीत सुरू होतं . कितीतरी वर्षांनी दोघेही आनंदाचा संसार करू लागले होते . मम्मी पप्पा अधून मधून यायचे . पप्पा त्यांचा संसार बघून खुश होते पण मम्मी मात्र अनघाला सतत दोष देत होत्या . एकुलता एक मुलगा आपल्यापासून दुरावला याची खंत त्यांना होती . पण स्वतःचे दोष त्यांना जाणवत नव्हते फक्त अनघा या सगळ्याला कारणीभूत आहे असच त्यांचं मत होतं . सरीतालासुद्धा भावाचं वागणं पटलेलं नव्हतं .

मम्मी आणि सरिता अनघा विनयकडे यायच्या पण अनघाशी आणि परीशी जेवढ्यास तेवढं बोलायच्या . फक्त विनयशी मात्र अगदी प्रेमाने बोलायच्या . अधून मधून पैशांची मागणीही करायच्या . विनय जरी पैसे देत असला तरी कमाई तर अनघाची होती पण तरीही कर्तव्य म्हणून ती काही बोलत नव्हती . विनय बदलला असला तरी त्याच्या हाताला म्हणावे तसे यश नव्हते . अनघाची मात्र प्रगती अगदी छान होत होती .

पप्पा मात्र विनय अनघाच्या बाजूनेच होते . त्यांनी अनेकदा मम्मीला समजावले होते पण \" पालथ्या घड्यावर पाणी \" या म्हणीप्रमाणे त्यांचे बोलणे मम्मीवर काहीच परिणाम करत नव्हते . उलट आता दोघी मायलेकी अजूनच कारस्थाने करून अनघाचा त्रास वाढवत होत्या . अनघाकडे गेल्या की ती घरी नाही हे बघून कामवाल्या बायकांचे कान भर , त्यांना जास्तीची कामे देऊन ती नीट केली नाही म्हणून बोल लाव , परीच्या मनातही वाईट गोष्टी भरवण्याची सुरुवात त्यांनी केली होती .

अनघाची चिडचिड वाढत होती . पण आता विनय तिच्या साथीला असल्यामुळे मम्मीची डाळ काही शिजत नव्हती . मदतनीस बायकाही अनघाच्या चांगल्या स्वभावामुळे आणि परोपकारी वृत्तीमुळे तिला सोडून जात नव्हत्या . माणसे जोडण्याची कला अनघाला चांगलीच अवगत होती त्यामुळे सगळेच तिला आनंदाने मदत करत असत . फक्त आपल्या घरातलीच माणसे आपल्याशी अशी का वागतात हे तिला न सुटलेलं कोडं होतं .

सरिता परदेशी शिफ्ट झाली त्यामुळे मम्मी आता एकदम एकट्या पडल्या होत्या.

विनयची तब्येत पुन्हा बिघडली . त्याला आता पुन्हा सगळ्या टेस्ट करून घ्याव्या लागणार होत्या . अनघाने त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले . परीला तिच्या मैत्रिणीकडे सोडले .नेमकी त्या दिवशी तिची खुप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तिला कॉलेजमध्ये जाणं भाग होतं . तसही तिथे थांबण्याची काही गरज नव्हती दिवसभर विनयला ऑब्जर्वेशन खाली ठेवणार होते . तरीही विनयच्या मित्राला आणि पप्पांना तिथे थांबायला सांगून अनघा थोडावेळ कॉलेजला गेली . पप्पांनी त्यांची औषधे घेतली नव्हती आणि अनघाने सांगूनही काही खाल्ले नव्हते त्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला .

मम्मीनी या गोष्टीचा नेहेमीप्रमाणे कांगावा करून गोंधळ सुरू केला . " देवा देवा काय ही मुलगी ? म्हाताऱ्या सासऱ्याला आजारी नवऱ्या सोबत सोडून स्वतः गेली भटकायला . कुठल्याच गोष्टीची काळजी नाही . माझंच चुकलं . मीच माझ्या मुलाच्या गळ्यात ही धोंड बांधली . ही आयुष्यात आल्यापासून वाटोळे झाले त्याचे . ते काही नाही विनू तू चल आपल्या घरी परत . मी आता तुला त्या अवदसे बरोबर आजिबात राहू द्यायची नाही . तू आणि परी आपल्या घरी चला . माझी शपथ आहे बघ तुला . "

विनयचा नाईलाज झाला . यावेळी परीलासुद्धा सोबत नेऊन मम्मीने आपला डाव खेळला .

अनघा परत आली आणि तिला सगळं समजलं . तिच्या काळजावर पुन्हा एकदा दगड कोसळला . यावेळी मात्र परीही तीच्यासोबतीला नव्हती याचं मोठं दुःख तिला झालं . तिने प्रयत्न सोडला नाही . मम्मीच्या डावाला विनय पुन्हा एकदा बळी पडला होता

" विनय , अरे कधी येताय तुम्ही दोघं घरी ? या लवकर . मला करमत नाहीये ." अनघाने विनयला फोन केला.

" अग अनु , तूच ये ना इकडे राहायला . माझी तब्येत अशी आणि त्यात तुला रोज कॉलेजला जावं लागतं ना . मग मला आणि परीला कोण बघणार ? त्यापेक्षा मम्मी म्हणत होती इकडेच राहिलेलं बरं होईल .ये तू सामान घेऊन " विनय म्हणाला . मम्मीने त्याला व्यवस्थित पढवलं होतं .

अनघाच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या . पुन्हा एकदा ती हतबल झाली . हताश होऊन तिने मनाला आवर घातला . आता तिकडे गेलं की पुन्हा मम्मी पाहिल्यासारखं वागणार . तिला सगळ्यात जास्त काळजी होती ती परीची . विनयच्या वागण्याचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं .

आता निर्णय घ्यावाच लागणार होता . तिने मन घट्ट केलं . आजवर कधीही न केलेला विचार तिने मनाशी पक्का केला .
0

🎭 Series Post

View all