Login

अनामिका 2

कथेतील कथेची कथा
काजल नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होती. तिच्या कामाची गती तिने मुद्दामच मंद ठेवली होती, कारण कामं संपली तर करणार काय?

सोसायटीच्या इतर बायकांकडे बघून तिला हेवा वाटायचा. त्यांची सकाळची लगबग, घाईघाईने सकाळी दूध आत घेणं, मुलांवर ओरडणं, नवऱ्यावर खेकसणं आणि पटापट आवरून ऑफिसला निघून जाणं..हे सगळं बघून तिला स्वतःचं आयुष्य मागे पडलंय असं सतत वाटायचं. जगण्याच्या स्पर्धेत सर्वजण खूप पुढे जाताय आणि आपण मात्र एखाद्या दगडाप्रमाणे थिजून गेलोय, एकाच ठिकाणी.. असं तिला नेहमी वाटायचं.

ती तशी भरपूर शिकलेली, हुशार..नोकरी सहज करू शकत होती. पण ती का करत नव्हती नोकरी? तर तिचा आजार...

भयानक परिस्थितीतुन ती गेली होती. एक जबरदस्त अपघात..आणि तिचं मन, शरीर सगळं अस्ताव्यस्त झालेलं. देवाची काहीतरी कृपा म्हणून कशीबशी वाचली. तेव्हा नशीब तिचा नवरा सोबत होता. सहा महिने जहाजावर पूर्ण करून तो घरी आला होता. त्या अपघातानंतर तिला सगळ्या जुन्या आठवणी धूसर दिसू लागलेल्या. तो अपघात आणि त्यानंतरचं आयुष्य, एवढंच काय ते तिच्या लक्षात होतं. जबरदस्त खचली होती ती. आई वडील, सासू सासऱ्यांकडे ती बरेच दिवस राहिली होती, पण नंतर तिनेच निर्णय घेतला की असं कुणाच्या कुबड्या घेऊन जगायचं नाही. ती नवऱ्याच्या घरी आली, नवरा जहाजावर, पण तरी मी एकटीने हा संसार सांभाळेल या हिमतीने ती जगण्याच्या युद्धावर आरूढ झाली. तिचं जगणं युद्धच होतं. समोरच्याला तिचं जीवन अगदी सोपं, सरळ वाटत असलं तरी तिच्या आत काय संघर्ष चालू होता हे फक्त तिलाच माहीत होतं. नवरा नसताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं, स्वतःची औषधं गोळ्या वेळेवर घेणं...त्यात मधेच तिचं डोकं भणभण करायला लागे, मानसिक स्थिती पूर्ववत आणायला बराच संघर्ष करावा लागे. हे सगळं त्या अपघातानंतर झालं होतं. या सगळ्यात नोकरी करणं तिला धोक्याचं होतं. ती नवऱ्याच्या घरी राहून स्वतःचा संसार करतेय हीच तिच्यासाठी आणि सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट होती. घरचे अधूनमधून यायचे, तिला बरं वाटायचं. पण शेवटी सर्वांना आपापला संसार...जो तो आपापल्या कामाला परते.

तर असं तिचं जीवन होतं. तिला वाटायचं, तो अपघात झाला नसता तर...तर कदाचित, आपलं आयुष्य वेगळं असतं, पण आपल्याला नवीन आयुष्य मिळालं हीच मोठी बाब नाही का? असा स्वतः ला समजावत ती दिवस ढकले.

तिची कामं आवरून झाली, समोर मोबाईल होता. तिला अचानक आठवलं, अनामिकाची ती गोष्ट तिने वाचायला घेतली होती. पहिला भाग तिला खूप आवडला होता, दुसरा भाग आज आला असेल का? या विचाराने तिच्यात एक उत्साह संचारला आणि तिने पटापट मोबाईल चाळायला घेतला. तिला अशी छोटी छोटी कारणं सुद्धा आनंदी होण्यास कारणीभूत ठरायची, किंबहुना.. ती ठरवायची.

तिने पाहिलं, दुसरा भाग सकाळीच आला होता. ती आनंदली, पण घाई न करता तिने स्वतःला आधी पाय मोकळे करून लोळता येईल अशा ठिकाणी ती बसली आणि हळुवारपणे एकेक शब्द वाचू लागली. पुढे लिहिले होते...

"भाग 2
"अनामिका, अगं त्याच्याशी एकदा बोल तरी.."

"कशाला? कोण आहे तो?"

"माझी अशी प्रचंड ईच्छा आहे की तू त्याच्याशी बोलावंस"

"आणि असं का वाटतं तुला?"

"मला तुम्ही दोघे एकमेकांत दिसतात"

"काय बोलतेय तुला तरी कळतंय का?"

"काहीतरी फिल्मी बोलायचं होतं.. पण गंडलं वाटतं. जाऊदे, मला असं म्हणायचं आहे की तुला पाहिलं की मला त्याची आठवण येते, आणि त्याला पाहिलं की तुझी आठवण येते.."

"मग हा तुझा प्रॉब्लेम आहे.."

"अगं तुला कळत कसं नाही"

"आन...तो फोन आन...एकदाचं बोलून तरी घेतो"

अनामिका आणि तिची मैत्रीण, एकाच कॉलेजमध्ये. मनस्विनी, तिच्या मैत्रिणीचं नाव. नको ते उद्योग करण्यात जगजाहीर. त्यात अनामिका आणि अंगदचं पॅचप करण्याचं तिच्यात खूळ भरलं होतं...आणि ती ते काहीही करून पूर्ण करणार होती.

अनामिका आपली साधी भोळी नाकासमोर चालणारी मुलगी. तिला हे असलं काही आवडत नव्हतं, पण मनस्विनीच्या आग्रहाखातर तिने अंगदसोबत एकदा कॉल वर बोलायचं ठरवलं.

तिला काय माहीत, हा एक कॉल तिच्या आयुष्यात एक विचित्र वळण घेणार होता ते...

मनस्विनी म्हणाली,

"अगं कसला भारी आहे तो, मर्चंट नेव्ही शिकतोय. कूल ना..आणि क्रिकेट असला भारी खेळतो ना. त्याला पाहिलं की मला अभिजित सावंतची आठवण येते"

अनामिकाने दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, पण शेवटी स्त्री मन तिचं. आकर्षण वाटणारच. एक मन नको म्हणत होतं आणि दुसरं मन वेगवेगळ्या कल्पना चितारत होतं.."

काजलने दुसरा भाग वाचून संपवला आणि तिला हसूच आलं. मर्चंट नेव्ही मध्ये तिचाही नवरा होता..आणि वर्णन अगदी त्याच्यासारखं. क्षणभर ती त्याच्या आठवणीत गुंतली. कालच त्याच्याशी बोलणं झालेलं, ती ते रेकॉर्ड करायची आणि ते रेकॉर्डिंग ती ऐकत बसायची. आताही ती तेच करत बसली.