चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : आनंदाश्रम
शारदा खिडकीपाशी उभी होती. बाहेर आकाश संध्याकाळच्या रंगांनी काहीसं लालसर झालं होतं. मंद वारा वाहत होता. दूरवर मुलांच्या खेळण्याचा आवाज, एखाद्या पक्ष्याची किलबिल ऐकू येत होती आणि घरात मात्र प्रचंड शांतता पसरलेली.
ती या शांततेकडे पाहत होती. ज्या घरात कधीकाळी आवाज गजबजायचा, हसणं-खेळणं सुरू असायचं, त्या घरात आज इतकी शांतता होती.
शारदा मनाशी पुटपुटली, 'राजेंद्र, तुम्ही गेल्यापासून सगळं बदललं. हेच ते घर आहे का, जिथे आपण दोघांनी एकत्र स्वप्नं पाहिली होती?'
तिच्या नवऱ्याच्या निधनाला दोन वर्षं झाली होती.
घरात दोन मुलं — शिव आणि सत्यम. दोघंही आपल्या करिअरमध्ये रमलेले. दोन सुनाही होत्या — रेवा आणि कृतिका. बाहेरून पाहता घर मोठं, सुखसोयींनी भरलेलं; पण बरेच दिवस शारदाला जाणवत होतं की ती एकटी झाली आहे.
एका संध्याकाळी सगळे जेवणाच्या टेबलावर बसले होते. शारदा जेवत होती.
रेवा हसत म्हणाली, 'आई, भाजी थोडी जास्त मसालेदार झाली की काय?"
शारदा, "हो गं, हात जरा जड झाला बहुतेक. उद्या हलकंसं जेवण करीन."
कृतिका हसत म्हणाली, "हलकीच करा बरं भाजी. कमी मसालेदार... आमच्या तब्येतीकडे लक्ष द्या ना."
हे ऐकून शारदा मनोमन दुखावली गेलेली. तरी ती शांत बसली.
शिव आणि सत्यम मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले होते. आईच्या डोळ्यातलं पाणी मात्र कुणालाही दिसलं नाही.
त्या रात्री शारदा आपल्या खोलीत एकटी पडून होती. तिने डोळे मिटले आणि जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर आल्या...
तिला आठवलं, नवरा आजारी असताना तिने दिवस-रात्र सेवा केली. सत्यमला कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा तिने आपले दागिने गहाण ठेवले होते.
शिवचा ऍक्सिडेन्ट झाल्यावर किती तरी दिवस हॉस्पिटलमध्ये काढले होते.
तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, 'आज या मुलांना माझ्या त्यागाची किंमत नाही राहिली का? मी त्यांच्यासाठी ओझं झालीये का?"
दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत तिने धीर धरला. दोन्ही मुलं हॉलमध्ये बसली होती.
शारदा, "शिव, सत्यम... मला काही बोलायचं आहे."
सत्यम, "काय झालं आई? तब्येत बरी नाही का?"
शारदा ( थरथरत ), "नाही, तब्येत ठीक आहे; पण मन ठीक नाहीये. मला असं वाटतंय मी ओझं झालीये तुमच्यावर. मला वृद्धाश्रमात सोडून या."
रेवा, "का ओ आई असं बोलताय?"
कृतिका, "तुम्हाला काही त्रास आहे का इथे? पण जर तुम्हाला जायचंच असेल, तर ठीक आहे. तिथे तुमच्या वयाचे लोक असतील, तुम्हाला बरं वाटेल."
शिव आणि सत्यम काही बोलले नाहीत. त्यांच्या नजरा टाळणाऱ्या होत्या, ज्या कळून येत होत्या.
शारदाचं हृदय द्रवून गेलं. तिला खात्री पटली की ती आता या घरात नकोशी झालेली आहे.
त्या रात्री शारदा पुन्हा खूप रडली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा वर्षाव होत होता.
दुसऱ्या दिवशी मुलांनी तिला गाडीत बसवले. ती मात्र अगदी शांत बसली होती.
रस्त्यात तिच्या मनात आठवणी दाटून येत होत्या. जसं की शिवचा शाळेचा पहिला दिवस...
सत्यमला पहिल्यांदा नोकरी लागली तेव्हाचा आनंद...
नवऱ्यासोबत केलेल्या यात्रांचा आनंद...
सत्यमला पहिल्यांदा नोकरी लागली तेव्हाचा आनंद...
नवऱ्यासोबत केलेल्या यात्रांचा आनंद...
इतक्यात गाडी वृद्धाश्रमासमोर थांबली.
तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना संपूर्ण जागा दाखवली. स्वच्छ खोल्या, बाग, टीव्ही रूम, लायब्ररी... वृद्धमंडळी हसत तिथे गप्पा मारत होती.
कार्यकर्ता, "ही तुमची खोली. इथे तुम्हाला वेळेवर जेवण, डॉक्टर, औषधं सगळं मिळेल."
यावर शारदा फक्त मान हलवत होती.
शिव, "आई, आज आपण फक्त हे पाहायला आलोय. उद्या सगळं सामान घेऊन येऊ. चल आता घरी जाऊ."
घरी आल्यावर ती रात्री विचार करत होती, 'असं काय झालं की मी ओझं झाले एवढी. कुणालाही कसला फरकच पडला नाही.'
सकाळी शारदाने नवीन साडी नेसली. केस विंचरले. आरशात स्वतःकडे पाहून ती थबकली.
शारदा मनात बोलली, 'आज हा शेवटचा दिवस आहे माझा या घरात. माझं आयुष्य आता इथून, या घरातून संपतंय.'
गाडीत सगळे जण बसलेले. कोणीही तिला थांबवलं नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
वृद्धाश्रमात पोहोचल्यावर तिने पाहिलं की तिची मुलगी साक्षीही तिथे उभी होती.
शारदा मनात विचार करत होती की साक्षी तरी थांबवेल तिला; पण तीही काही बोलली नाही.
यामुळे शारदेचं मन तुटलं.
यामुळे शारदेचं मन तुटलं.
तेव्हाच तिची नात, साईशा आजीचा हात धरून म्हणाली, "अगं आजी, एकदा वर बघ ना! किती सुंदर जागा आहे."
शारदाने वर पाहिलं. तर एका मोठ्या फलकावर लिहिलं होतं — 'शारदा वृद्धाश्रम!'
ती थक्क झाली.
सत्यम हसत म्हणाला, "आई, आम्ही तुला कधीच असं टाकणार नाही. तू आमच्यासाठी जे केलंय ते आम्ही कधीच विसरणार नाही."
शिव म्हणाला, "आज बाबांचा वाढदिवस आहे. त्यांचं स्वप्न होतं की गावात एक वृद्धाश्रम उभा राहावा. आम्ही ते स्वप्न पूर्ण केलंय आणि उद्घाटन तुझ्या हातूनच व्हावं असं आम्हाला वाटतं."
शारदाच्या हातात कात्री दिली गेली आणि तिला रिबिन कापायला सांगितली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
शारदा थरथरत म्हणाली, "राजेंद्र, तुमचं स्वप्न खरं झालं आणि यानिमित्ताने माझी मुलं आज माझ्यासाठी माझा अभिमान ठरली आहेत."
मन दुखरं वाटणाऱ्या शारदाला आता परत आपल्या मुलांचा, आपल्या संसाराचा अभिमान वाटू लागलेला.
समाप्त.
©® निकिता पाठक जोग
©® निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा