आनंदीकेशव.. भाग १
" ए केशव, चला ना रे भातुकली खेळायला." आनंदी केशवचा हात पकडत म्हणाली.
" मी नाही येणार. आज आम्ही सगळे सूरपारंब्या खेळायला जाणार आहोत." केशव भाव खात म्हणाला.
" असं रे काय करतोस? आमच्यासोबत खेळायला कोणीच मुलगा तयार नाही. मी तर कमी, यमी सगळ्यांना सांगून आले आहे बाकी कोणी नाही आले तरी तू येशीलच म्हणून.." आनंदी अपेक्षेने केशवकडे बघत होती.
" मी येईन. माझ्या सवंगड्यांनाही आणीन. पण माझी एक अट आहे." केशव खट्याळ हसत म्हणाला.
" मंजूर, मंजूर, मंजूर.. तुझ्या सगळ्या अटी मंजूर. " आनंदी खुश होत म्हणाली.
" अट तर ऐकून घे."
" पटकन सांग. मला अजून आईकडून खाऊ घेऊन यायचा आहे."
" भातुकलीच्या खेळात तू माझी बायको व्हायचेस."
" हट्.. मी आणि तुझी बायको? माझे लग्न झाले आहे विसरलास का?" बारा वर्षांची आनंदी त्याला गळ्यातले डोरलं दाखवत वेडावत म्हणाली.
" जा बाबा.. मग आम्ही नाही येत खेळायला." केशव हिरमुसला होत म्हणाला.
" चिडतोस काय असा? आपण आधी खेळायला तर जाऊ नंतर बघू." विनंती करणाऱ्या आनंदीचा विरस करणे केशवला जमणारच नव्हते.
" जशी तुमची इच्छा. चला.." केशव येतो आहे हे बघून आनंदीचा चेहरा फुलला होता.
सगळे रंगून अंगणात भातुकली खेळत होते. बाहुली आनंदीच्या हातात होती तर बाहुला केशवच्या. बाहुलाबाहुलीचे लग्न लागले. मुलांचा चाललेला खेळ दरवाजात उभ्या राहून राधाबाई आणि सावित्रीबाई बघत होत्या.
" मुलं किती रमली आहेत नाही भातुकलीमध्ये?"
" हो ना.. कधी कधी वाटतं आनंदी आमच्याच घरची सून व्हायला हवी होती हो." राधाबाई बोलून गेल्या आणि त्यांनी जीभ चावली.
" मलाही तेच वाटतं. आनंदीचं पाळण्यातच लग्न लागले नसते ना तर केशवालाच जावई करून घेतले असते हो आम्ही. केशवाच्या लग्नाचे बघताय की नाही?" सावित्रीबाईंनी विचारले.
" तो एक वेगळाच विषय आहे. आमच्या स्वारीवर समाजसुधारणेचे भूत स्वार झाले आहे. म्हणतात कसे त्याचे शिक्षण पूर्ण होईतो त्याच्या लग्नाचा विषयही काढायचा नाही. त्याला चौदावे वरीस लागले तरी लग्नाचे नावही घेऊ देत नाहीत. आणि यांच्यापुढे बोलायची कोणाची टाप तरी आहे का?" डोळ्याला पदर लावत राधाबाई बोलल्या.
" कोणाचे काय तर कोणाचे काय? तुम्ही केशवचे लग्न होत नाही म्हणून काळजीत. तर मी लग्न झालेली पोर सासरी जात नाही म्हणून." सावित्रीबाई बोलल्या.
" तेच विचारणार होते. कधी करताय आनंदीची पाठवणी?"
" माझ्या मनात लाख आहे हो.. पण पोर न्हातीधुती होईपर्यंत कसं पाठवणार? हिच्या बरोबरीच्या मुलींना न्हाण येऊन त्या सासरी गेल्यासुद्धा. बघू हिच्याच नशीबात काय वाढून ठेवले आहे ते." सुस्कारा सोडत सावित्रीबाई बोलल्या.
" केशव, तुला लवकरात लवकर पुण्याला शिकायला जायचे आहे. तयारीला लाग." चिंतामणराव म्हणाले.
" हो बाबा.." खालमानेने केशव म्हणाला.
" इकडून ऐकणे होईल का?" माजघराच्या दाराआडून राधाबाईंनी विचारले.
" बोला.. आम्ही ऐकतो आहोत."
" पोराला शिकण्यासाठी एवढ्या दूर पाठवायचे ठरवता आहात. पण त्याआधी दोनाचे चार हात झाले असते तर?" राधाबाई घाबरत बोलत होत्या.
" तुमचे म्हणजे ना हरदासाची कथा मूळ पदावर.. शिकू दे की मुलाला जरा."
" अहो पण.. शिक्षण होईतो त्याचे वय नाही का वाढणार? परत येईपर्यंत त्याला साजेशी मुलगी मिळायला नको का?"
" हा विचार आमच्या डोक्यात आला नसेल असे वाटते का तुम्हांस? पण आपले सुधारक म्हणतात ते पटते मनास. कशासाठी एवढ्या लहान वयात मुलांची लग्ने लावून द्यायची? खेळण्याबागडण्याचे वय त्यांचे."
" यावर बोलणेच खुंटले की मग. त्याचं नाही करायचे म्हणत आहात. मग सुमीचं काय? दहावं वरीस पूर्ण होईल तिस. की आता तिच्यासाठीही तिला नहाण आल्यानंतरच स्थळं बघायची? म्हणजे आजूबाजूची लोकं तोंडात शेण घालतील." काहीश्या त्राग्यानेच राधाबाई बोलल्या.
" अरे बापरे.. मामला फारच गरम दिसतो आहे. करतो स्थळं बघायला सुरुवात. नाहीतर आमचं काही खरं नाही. केशवराव , तुमच्या मातोश्री तुमचे लग्न लावून द्यायचे म्हणत आहेत. मग हा पहिला धडा.. नेहमी बायकोचे ऐकावे."
" इश्श्य.. काहीतरीच असते तुमचे." तोंडावर पदर घेऊन लाजलेल्या राधाबाई आत गेल्या. ते बघून चिंतामणराव जोरात हसले.
काय असेल आनंदीकेशवच्या पुढील आयुष्याची वाट? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा