आनंदीकेशव.. भाग ३
मागील भागात आपण पाहिले की पुण्याला शिकायला गेलेला केशव सुमीच्या पाठवणीसाठी घरी आला आहे. आता बघू पुढे काय होते ते.
" केशवा.." राधाबाई बोलता बोलता थबकल्या.
" काय आई?" केशवने विचारले.
" केशवा.. आनंदीचे लग्न झाले आहे. ती आता न्हातीधुती झाली आहे, सासुरवाशीण आहे. तिच्याशी बोल. पण मर्यादेने. ती आता फक्त तुझी सवंगडी राहिली नाही." राधाबाई समजावत होत्या. ते ऐकून केशवचे तोंड उतरले. राधाबाईंना ते समजलं. पण इलाज नव्हता.
" समजतय ना?" त्यांनी विचारले.
"हो.." केशवने उत्तर दिले.
"सुमीला भेटलास का? कधीची वाट बघते आहे. उद्याचा गर्धादान विधी झाला की पोर जाईल सासरी. तू तिथे. मग मी आहे एकटीच या घरात." डोळ्यातलं पाणी पुसत राधाबाई बोलल्या. आईचं ते हळवं रूप बघून केशव गलबलला.
" मी कुठे कायमचा राहणार आहे तिथे. शिक्षण पूर्ण झाले की येणारच."
" त्याच आशेवर आहे रे मी. चल आता आत जाऊ. कामे पडली आहेत बरीच."
संध्याकाळी केशव त्याच्या भावंडांबरोबर गप्पा मारत बसला होता. दुपारची उदासीनता कुठल्याकुठे पळून गेली होती. केशव पुण्याच्या गमतीजमती मुलांना सांगत होता. मुले अचंबित होऊन ऐकत होती. केशव रंगात आला होता, तोच कोणीतरी म्हणाले,
" ये ग, आनंदी. तू ही बस इथेच." केशवने दरवाजाकडे बघितले आणि बघतच राहिला. त्याच्या डोळ्यासमोर होती लग्न झाले तरी परकर पोलक्यात फिरणारी आनंदी. समोर आलेली ही किती वेगळी दिसत होती. किरमिजी रंगाची नऊवारी हातात भरलेला चुडा, कपाळावरचे मोठे कुंकू, नाकातली ती नथ.. केशव बघतच राहिला.
" ए दादा, पुढे काय झाले ते सांग ना लवकर." मुलांचा गलका सुरू झाला. केशव भानावर आला. पण गोष्ट मगाशी जशी रंगली होती तशी काही रंगली नाही. मुलांनी मग हळूहळू काढता पाय घेतला. मोठी माणसे गप्पा मारू लागली. ते बघून केशव न राहवून आनंदीशी बोलायला पुढे झाला.
" कशी आहेस?" त्याने विचारले.
" कशी दिसते?" आनंदीने हळू आवाजात विचारले.
" अगदी लग्न झालेल्या बाईसारखी. पोक्त आणि गंभीर." केशव म्हणाला. ते ऐकून इतकावेळ गंभीरपणाचा आव आणलेला टाकून आनंदी खळखळून हसली.
" आता आली माझी आनंदी." केशव म्हणाला. ते ऐकून आनंदीने नजर चोरली.
" तू परत पत्र का नाही पाठवलंस?" केशवने विचारले.
" कसं पाठवणार? आता मी सासुरवाशीण आहे. साधं मंदिरात जावयाचं म्हटलं तरी सासूबाईंना विचारावे लागते." आनंदी सांगत होती. केशव तिचं बोलणं ऐकत होता. ते दोघे बोलत असताना पाठून केशवच्या मामी आल्या.
" जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची. लग्न झाले ना ग तुझे? तरी परपुरूषाशी बोलतेस? आणि केशवा तू रे? पुण्यास गेलास म्हणजे काय आभाळाला हात टेकले की काय रे तुझे? तरी नशीब विलायतेस जाऊन बॅरिस्टर होऊन आला नाहीस." मामींनी तोंडाचा पट्टा सोडला होता. आनंदी आणि केशव दोघेही गर्भगळित झाले होते. शेवटी सुमीच्या सासरची माणसे आली म्हणून या दोघांची सुटका झाली. पण त्यानंतर एकमेकांशी बोलायचेच काय बघायचेही धाडस त्या दोघांचे झाले नाही.
सुमीचा गर्भादानाचा सोहळा थाटामाटात पार पडला. तो होताच सुमी सासरी गेली. त्याच्या दुसर्याच दिवशी अभ्यासाचे कारण देऊन केशवही तिथून निघाला. त्याला आनंदीला बघावेसे खूप वाटत होते पण परत आदल्या दिवशीसारखे व्हावे असे मात्र वाटत नव्हते. तो उदासपणे तिथून निघाला. निघताना त्याने स्वतःशीच एक निर्णय घेतला, जोपर्यंत शिक्षण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो परत गावी येणार नाही.
दिवस जात होते. केशव जीव तोडून अभ्यास करत होता. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होता. इतके दिवस त्याचे वडील शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न नको म्हणत होते. पण आता केशवच सध्या कर्तव्य नाही असे सांगत होता. मॅट्रिक झाल्यानंतर मात्र त्याच्याकडे काही कारणच उरले नाही. सुमीच्या मंगळागौरीचे उद्यापन धरून त्याने गावी जायचे ठरवले. त्यानिमित्ताने आनंदीची नजरभेट तरी होईल ही अपेक्षा होतीच मनात.
होईल का केशवची इच्छा पूर्ण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा