Login

आनंदीकेशव.. भाग ८

कथा कोण्या एका आनंदीची आणि केशवाची
आनंदीकेशव.. भाग ८

मागील भागात आपण पाहिले की आनंदी सेवासदनमध्ये पुढील शिक्षणासाठी जाते. ती शिकत असल्यामुळे तिच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. आता बघू पुढे काय होते ते.


" आनंदीने म्हणे केस वाढवले आहेत." गावात चर्चा सुरू होती.

" हो ना..सोवळेही पाळत नाही म्हणे."

" घराबाहेर पडल्यावर कसले ओवळं आणि कसलं सोवळं? बाटली नाही म्हणजे झालं. या शिकणाऱ्या बायकांचा काय भरोसा?"

" आपल्याला काय? पण हिचा आदर्श ठेवून आपल्या मुलीबाळी बिघडू नयेत म्हणजे झालं."

" तुम्ही जाणार आहात का दामोदरच्या लग्नाला?"

" हो.. जाईन म्हणते. बघूया तरी शिकलेल्या बायका कश्या दिसतात ते. त्यांना काय वेगळी शिंगे फुटलेली असतात का?"

गावातल्या सगळ्यांनाच आनंदीला बघायचे होते. दामोदरचे लग्न दुसर्‍या दिवसावर आले तरी ती आली नव्हती. लोकांची थोडी निराशा झाली होती.

" आली नाहीच का आनंदी?" राधाबाईंनी विचारले.

" नाही.. येते म्हणून निरोप तर पाठवला होता." उदास होत सावित्रीबाई उत्तरल्या. "पण एका दृष्टीने ती आली नाही हे बरेच झाले. "

" का हो? असं का बोलताय?"

" मग काय? सगळं गाव मजा बघायला टपलं आहे. त्यात ती आल्यावर तिला ना करवली म्हणून मिरवता येणार ना काही करता येणार. येऊन तरी काय फायदा?" डोळ्यातलं पाणी पुसत सावित्रीबाई बोलल्या. यावर राधाबाईंना काय बोलायचे ते सुचत नव्हते. त्यांनी फक्त त्यांच्या हातावर थोपटले.

" फार आधार आहे हो वहिनी तुमचा. अख्खं गाव फटकून वागत असताना फक्त तुम्हीच आमच्याशी प्रेमाने वागायचात. आनंदीचा जीव तर फक्त केशवमुळेच वाचला आहे. तुमचे कसे आभार मानू तेच समजत नाही. आमच्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला दिले तरी ऋण फिटणार नाही तुमचे." सावित्रीबाई बोलत होत्या. राधाबाई काहीच न बोलता शांतपणे ऐकत होत्या.

सकाळी नवऱ्या मुलीच्या घरी लग्नासाठी जायचे होते. घरी कोणीच आले नव्हते. अगदी जवळचे नातेवाईक थेट मुलीच्या घरी येणार होते. सावित्रीबाईंची नजर वारंवार दरवाजाकडे जात होती. शेवटी त्यांनी आनंदीचा विचार मनातून काढला. आणि देवाला नमस्कार करायला वळल्या.

" आई." आनंदीचा आवाज ऐकून त्या बाहेर आल्या आणि बघतच राहिल्या. माघारी आलेली, खंगलेली, कष्टाने पिचलेली, केशवपन केलेली, आलवण केलेली आनंदी जणू मध्ये त्यांनी पाहिलीच नव्हती. समोर दिसत होती ती तेजस्वी, स्वतःवर विश्वास असलेली आनंदी. वाढलेल्या केसांचा बांधलेला खोपा, फिकट रंगाचे नेसलेले लुगडे, डोक्यावरून न घेता खांद्यावरून घेतलेला पदर, कपाळावर दिसेल न दिसेल असे लावलेले कुंकू. आली तेव्हा अंगावर फुटका मणीही नव्हता. पण आता अगदी छोटे छोटे घातलेले दागिने. सावित्रीबाईंनी न राहवून आनंदीला मिठीच मारली.


" आई, हे काय? आल्या आल्या थेट मिठी? तुझं ओवळंसोवळं?" आनंदी हसत म्हणाली.

" तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचे काहीच नाही. सोन्यासारखी पोर माझी सुकून गेली होती. आता कशी टवटवीत दिसते आहे. इतर कोणाची नाही, माझीच दृष्ट लागेल माझ्या लेकीला. " डोळ्यातलं काजळ काढून आनंदीच्या कानामागे तीट लावत सावित्रीबाई बोलल्या. पाठीमागे उभे असलेल्या विनायकरावांनी डोळे पुसले. त्यांना बघून आनंदी पुढे झाली.

" बाबा, नमस्कार करते."

"सुखी हो.. एक बाप आपल्या लेकीला अजून काय आशीर्वाद देणार?"

" तोच पुरेसा आहे. तुमच्यामुळे दुसऱ्यांदा जीवन लाभले आहे मला." आनंदी विनयाने बोलली.

" माझ्याकडे तर कोणीच बघत नाही." दामोदर तोंड फुगवून म्हणाला.

" असं कसं रे? तू तर उत्सवमूर्ती आहेस. बरं तुम्ही निघा आता लवकर. नाहीतर ती नवी नवरी वाट बघून थकून जाईल."

" तू ना खरंच त्या शहरातल्या मुलींसारखे बोलायला लागली आहेस." कौतुकाने सावित्रीबाई बोलल्या.

" हे काय? लग्नघर आहे आणि घरात बाकी कोणीच नाही? काकूही नाही आल्या?" आनंदीने आश्चर्याने विचारले. ते ऐकून सगळ्यांनी तिच्यापासून नजर चोरली. ते बघून आनंदी समजून गेली.

" माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला." रडवेली होत आनंदी बोलली.

" आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात पाणी नको. आणि तुझ्यामुळे काही झालेलं नाही. ही गोष्ट पदराला गाठ मारून लक्षात ठेव. आम्ही येतोच." सावित्रीबाईंनी तिचे डोळे पुसले.

" थांबा. मी गोमूत्र शिंपडते." आनंदी बाजूला होत म्हणाली.

" काही गरज नाही. तुझे अश्रू हे गंगाजलासारखे पवित्र आहेत आमच्यासाठी." ठामपणे विनायकराव म्हणाले. समाधानाची एक लकेर आनंदीच्या चेहर्‍यावर झळकली.


जसं आनंदीच्या शिक्षणासाठी तिचे कुटुंबिय तिच्या पाठिशी उभे राहिले, तसेच पुढे पण राहतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all