Login

आनंदीकेशव.. अंतिम भाग

कथा कोण्या एका आनंदीची आणि केशवाची
आनंदीकेशव.. भाग १०

मागील भागात आपण पाहिले की केशव घरी सांगतो की त्याला आनंदीशी लग्न करायचे आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" बघितलेत तुमच्या शिक्षणाचे परिणाम? तरी सांगत होते, त्या तुमच्या सुधारणा बाहेरच्या जगात ठेवा. आले ना ते लोण घरापर्यंत? किती स्वप्न होती माझी. इतक्या मुलांनंतर वाचलेला हा माझा लेक. त्याच्या लग्नात वरमाई म्हणून मिरवेन. इच्छा नसताना तुला एवढे शिकवले. तुझे शिक्षण, तुझा हुद्दा बघून थोरामोठ्यांची स्थळं चालून येत होती. पण तू? तू सगळा हिरमोड केलास माझा. कोणाशी लग्न करायचे आहे तुला? त्या आनंदीशी? त्या विधवेशी? अरे आपल्याकडे विधवा बाईचे सावट लग्नसमारंभावर पडू देत नाही. आणि तू लग्न करायला निघालास?" राधाबाई खूप चिडल्या होत्या. त्या चिंतामणराव आणि केशवला वाटेल तसं बोलत होत्या.

" जरा शांत व्हाल का?" पडलेल्या आवाजात चिंतामणराव राधाबाईंना म्हणाले.

" मी तुला म्हटलं होतं ना की मला मान खाली घालायला लावू नकोस म्हणून." चिंतामणराव केशवला म्हणाले. आईबाबांना झालेले दुःख बघून केशवला फार वाईट वाटले. ते होणार याची अपेक्षा होतीच त्याला. पण आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा असा विचार करूनच तो आला होता.

" आईबाबा, अर्धवट बोलून जाऊ नका. मी तुमचं ऐकलं आता तुम्ही माझे ऐका. लहान असल्यापासून मी आनंदीवर प्रेम करतो आहे. तिचे लग्न झाले होते, तिची पाठवणी झाली. मी माझ्या मनाला समजावले. मी दुसरीकडे लग्न करायला तयारही होतो पण तोच तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. तिचा तिच्या सासरी छळ झाला. मी आनंदीला परत घेऊन आलो. आणि तेव्हाच तिच्याशी लग्न करणार असा मी मनाशी निश्चय केला. इतके दिवस मी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी थांबलो होतो. पण मला तुमचे मनही दुखवायचे नव्हते. आई, तुला प्राणत्याग करायची काहीच गरज नाही. तू आनंदीशी लग्नाला नाही म्हणालीस तर मी नाही करणार लग्न.. तिच्याशीच नाही तर इतर कोणाशीच. मी ब्रम्हचारी राहीन आयुष्यभर."

"चांगले पांग फेडलेस आईवडिलांचे." राधाबाई म्हणाल्या. "स्वतःच्या मनासारखे वागू द्या नाहीतर हे ही नाही आणि ते ही नाही."

" बाबा, तुम्हीच नेहमी म्हणायचात ना की आगरकर तुमचे आदर्श आहेत. ते तर नेहमी सांगतात की देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशात समाजसुधारणा झाली पाहिजे. मग ती समाजसुधारणा करणार कोण? त्यांनी, महात्मा फुल्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या कार्याचा तुम्हाला किती अभिमान वाटायचा. तो सगळा व्यर्थ? प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी जन्मावा पण तो शेजारी. तसेच तुमचे झाले आहे. सुधारणा व्हावी पण ती इतरांनी करायची. आम्ही आमच्या रूढी, जुन्या परंपरा सोडणार नाही. बरोबर ना? आणि आई, तू तर लहानपणी कितीदा म्हणायचीस की आनंदी सून झालेली तुला आवडली असती. मग अचानक काय झाले? तिला विधवा म्हणतेस, पण सधवा म्हणून किती आयुष्य जगली आहे ती?" बोलता बोलता केशवचे डोळे पाणावले होते.

" बोलणे सोपे असते केशवा, जगणे अवघड. आनंदी फक्त बाहेर शिकायला गेली तर तिच्या घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. उद्या तिचे लग्न झाल्यावर काय होईल?" चिंतामणराव कसंबसं बोलले.

" तुम्हाला काय वाटतं बाबा, मी हा विचार केला नसेल? आपण सगळेच इथून निघून जाऊ आणि नवीन आयुष्य सुरू करू. जिथे आपल्याला ओळखणारं कोणी नसेल. " केशव बोलत होता. "तुम्ही विचार करा आणि मला सांगा." यापुढे काहीच न बोलता सगळे झोपायला गेले. केशवला स्वतःच्या आणि आनंदीच्या पुढील आयुष्याची काळजी होती तर त्याच्या आईवडिलांना लोकापवादाची.

" ऐकताय का?" पलंगावर पडलेल्या चिंतामणरावांनी राधाबाईंना विचारले.

" दुसरं काय करू शकते? फक्त ऐकतेच आहे. मगाशी लेकाचं ऐकलं आता तुमचे." राधाबाईंचा राग अजून शांत झाला नव्हता.

" केशव म्हणतो ते पटतं आहे मला. बालविवाह करून आपण आपल्याच मुलांच्या आयुष्याशी खेळतो आहोत. त्यातही बायको असेल किंवा नसेल तरिही पुरूषाला दुसरे लग्न करायची परवानगी असते पण स्त्रीला ती ही नाही. तुम्ही नेहमी विचारताना मी समाजसुधारणेच्या पाठी का गेलो म्हणून. तर ऐका. मी खूप लहान होतो. आमच्या वाड्यात एक आत्या होती. जास्त वय नव्हते तिचे. खूपच लहान होती म्हणून ती माहेरीच रहायची. दर महिन्याला तिला केशवपन करण्यासाठी खोलीत जबरदस्ती घेऊन जायचे. तिचा तो विलाप अजूनही कानात गुंजतो. तिच्या बरोबरीच्या सगळ्या मुली नटूनथटून मिरवत असताना तिला मात्र सोवळं नेसून स्तोत्र वगैरे शिकायला लागायची. असह्य होऊन तिने एक दिवस स्वतःला नदीत समर्पित केले. तिचा तो पाण्यात बुडून फुगलेला चेहरा आठवला तरी अंगावर शहारा येतो. तेव्हाच मनाशी ठरवले होते, सुधारणांचा अंगीकार करायचा. मी जे मनाशी ठरवले तेच आज माझा लेक करून दाखवतो आहे. एकीकडे याचा अभिमान वाटतो आहे, दुसरीकडे लोक काय म्हणतील ही भिती आहेच. पण तरिही त्याला साथ द्याविशी वाटते आहे. आता निर्णय तुमचा आहे. संसारात इतकी वर्ष मी निर्णय घेतला आणि तुम्ही तो स्वीकारला. आता तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही." राधाबाई काहीच बोलत नाहीत हे बघून चिंतामणराव गप्प झाले.


"तुम्ही जे कराल त्याला माझी मान्यता आहे." दुधाचा पेला चिंतामणरावांच्या हातात देत राधाबाई म्हणाल्या. त्यांचे लाल झालेले डोळे त्यांच्या मनातील द्वंद्वाची साक्ष देत होते.

" मनापासून बोलताय?"

" नाही. अजूनही त्या केशवपन केलेल्या, आलवण नेसलेल्या मुलीशी केशवचे लग्न होऊ नये असेच मला वाटते." राधाबाई तोंडावर पदर ठेवून हुंदका दाबत म्हणाल्या आणि आत जायला वळल्या.

" आई, इथेच थांब. मी आत्ता आलो." न्याहारी करायला आलेला केशव राधाबाईंना म्हणाला. त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता राधाबाई आत गेल्याच.

" काकू, आत येऊ?" स्वयंपाकघराच्या दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आनंदीने विचारले. राधाबाईंनी तिच्याकडे बघितले. तिच्याशेजारीच केशव उभा होता. दोघांची जोडी शोभून दिसत होती. त्यांच्या डोळ्या समोरील आनंदी आणि मनातील आनंदीची प्रतिमा कुठेच मेळ खात नव्हती. ही हसरी, तेजस्वी मुलगी आपली सून होणार? स्वतःच्या नकळत त्या उठल्या आणि आनंदी जवळ जाऊन त्यांनी तिची अलाबला घेतली. आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून तिच्या हातात ठेवल्या.

" आमच्या अंहं आपल्या घराण्यातल्या बांगड्या आहेत. सासूकडून सुनेला दिल्या जातात." राधाबाई आनंदीला जवळ घेत म्हणाल्या.

" काकू, या सोन्याच्या बांगड्यांपेक्षा सोन्यासारखी माणसे माझ्यासाठी जास्त मौल्यवान आहेत." आनंदी त्या दोघांना नमस्कार करत म्हणाली.

" तुमचं आधीच ठरलं होतं का लग्न करायचे?" आनंदीच्या उत्तराने आश्चर्यचकित होऊन राधाबाईंनी विचारले.
यावर काहीच न बोलता आनंदी मान खाली घालून उभी राहिली.

" चला, आत्ताच्या आत्ता हिच्या घरी जाऊ." चिंतामणरावांना उद्देशून राधाबाई बोलल्या.

" कशासाठी?"

" हिच्या आईवडिलांना सांगायला नको?" हसत राधाबाई म्हणाल्या.


आनंदीच्या घरची परवानगी होतीच लग्नाला. त्यामुळे दोघांचेही साधेपणाने लग्न झाले. दोघांच्याही कुटुंबांना या सगळ्याचा खूप त्रास सहन करावा लागला. पण तरिही लोकनिंदेला न घाबरता ते गावातच राहिले. आनंदीकेशव मात्र केशवच्या कामाच्या ठिकाणी राहू लागले. कालांतराने लोकांचा राग बोथट झाला. दोन्ही कुटुंबांवर असलेली निर्बंध कमी झाली. इथे आनंदीकेशवचा संसार सुद्धा वाढत होता. ते दोघे जुन्या घरी जाऊन येऊन असायचे. संसार वाढत असतानाच आनंदीने आपले जनसेवेचे व्रत मात्र सोडले नव्हते. जसे तिला नवीन आयुष्य मिळाले होते तसेच इतरांनाही मिळावे यासाठी तिचा प्रवास केशवच्या साथीने चालूच राहिला.. आयुष्याच्या अंतापर्यंत..


ऐतिहासिक कथेच्या निमित्ताने दोन शब्द.

ऐतिहासिक म्हटले की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ते फक्त आणि फक्त शिवाजीमहाराज. त्यांचे कार्यच एवढे विशाल , दैदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे की दुसरा विचारच मनात येऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर मनात आले की एका अश्या विचारावर कथा लिहावी जी ऐतिहासिक तर असेल आणि तिचा समाजावर दूरगामी परिणाम सुद्धा झाला असेल. विधवा पुनर्विवाह ही घटना त्यापैकीच एक. जुन्याकाळी होत असलेल्या चुकीच्या गोष्टींपैकी एक म्हणजे बालविवाह आणि त्यातून उद्भवणारे लहान विधवांचे प्रश्न. आजही पुनर्विवाह म्हटलं की लोकांच्या कपाळावर आठ्या असतात. अशा परिस्थितीत साधारण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी मुलींची काय अवस्था असावी.. या रूढी परंपरांचे परिणाम काय होत असावेत हे मांडायचा केलेला हा छोटासा प्रयत्न. तो कसा वाटला हे सांगायला विसरू नका.

कथेत रमाबाईंच्या आलेल्या उल्लेखाबद्दल थोडेसे. पंडिता रमाबाई यांनी विधवा स्त्रियांसाठी शारदासदन नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. पण त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या हेतूबद्दलही शंका घेतली जायची. त्याच गोष्टीचा आधार इथे घेतला आहे.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all