Login

अंगणी सुखाचा पारिजात फुलला भाग 2

एका हळव्या मुलीची तितकीच हळूवार कथा
अंगणी सुखाचा पारिजात फुलला भाग 2

मागील भागात आपण पाहिले की नयन उदास असते .
तिला चक्कर आल्याने वत्सलाबाई घरी सोडायला येतात . त्यांचा चष्मा तिथे विसरतो आणि अमेय तो द्यायला जातो . आता पाहूया पुढे .


बेल वाजवून अमेय उभा राहिला . दोनेक मिनिटांनी दरवाजा उघडला आणि समोर एक गोरीपान , सोनेरी केसांची आजी उभी होती .
अमेयला पाहून वत्सलाबाई गोंधळल्या . तितक्यात अमेयने चष्मा पुढे केला आणि मग वत्सलाबाई खोखो हसत सुटल्या .

" आमच्या जाईने तुमच्या गळ्यात मारले वाटत हे काम ." अमेयला आत बोलवत वत्सलाबाई बोलल्या .

" आजी एक विचारू का ?" अमेय बोलायला संकोचत होता .

" एक का शंभर विचारा . तसाही वेळ आणि किस्से यांचा भरपूर स्टॉक असण्याच्या वयात आहे मी . "
वत्सलाबाई दिलखुलास हसत म्हणाल्या .

" आजी तुमचा चष्मा आमच्या घरी कसा ? " अमेयने विचारले .

" म्हणजे नयनने तुम्हाला काहीच सांगितलेले दिसत नाही ." वत्सलाबाई जरा चिंतेने बोलल्या .

" नक्की काय झाले होते ? काही गंभीर नाही ना ? " अमेय थोडा घाबरला .

" काल नयन चक्कर येऊन पडली आणि मग मी तिला घरी घेऊन गेले ."
वत्सलाबाई अमेयचा अंदाज घेत होत्या .

" तरीच ती मला इथे येऊ देत नव्हती ."
अमेय हताश स्वरात म्हणाला .

"आपली काही फार ओळख नाही . पण मला हा प्रकार सामान्य वाटत नाही ."
वत्सलाबाई म्हणाल्या .

" खरय , माझी नयन अशी नव्हती . दहा वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले तेव्हा ती खूप उत्साही , ऊर्जेने भरलेली आणि एक छान गायिका होती . "
अमेयचे डोळे हे सांगताना चमकत होते .
तितक्यात त्याला फोन आला .


" काय ! नयन बरी आहे ना? "
अमेय जोरात ओरडला आणि बाहेर पडला .

त्याच्यापाठोपाठ वत्सलाबाई दार लावून निघाल्या . अमेय जवळपास धावतच तिथे पोहोचला . दूधवाला बाहेरच उभा होता .

" सर कितीतरी वेळ झाला मी बेल वाजवत आहे . "
त्याने उत्तर दिले .


दूध देऊन तो वेगाने बाहेर पडला . अमेयने आपल्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य बघताच तो सुन्न झाला . नयन सोप्यावर पडली होती आणि तिच्या हातातून रक्त वहात होते .


पाठोपाठ वत्सलाबाई पोहोचल्या . त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला आणि काहीच मिनिटात अँब्युलन्स पोहोचली . पुढे सगळे उपचार वेगाने सुरू झाले आणि नयन वाचली .

सकाळपासून हॉस्पिटल लॉबीत सुन्न बसून असलेला अमेय आता थोडा सावरला होता . पोलीस चौकशी वगैरे सगळे संपायला रात्रीचे दहा वाजले होते .


" अमेय,थोडे खाऊन घे ."
वत्सलाबाई मृदू आवाजात म्हणाल्या .
" आजी तुम्ही घरी जा . सकाळपासून माझ्यासोबत तुम्हीही धावपळ करत आहात . "
त्याने वत्सलाबाईंना जायला सांगितले .

" अरे जाई आहे घरी . तू दोन घास खाऊन घे . घरी कळवले का ?"
वत्सलाबाई काळजीने बोलल्या.

" नाही , घरी काय सांगू आजी ? माझी नयन कधी बरी होईल ?" अमेय रडत होता.

" अमेय शांत हो . नयन नक्की बरी होईल ." त्यांनी अमेयला समजावले.

" शरीर बरे होईलच पण मनाचे काय ? " अमेय हताश सुरात बोलला .

" नक्की काय झाले आहे तिला ? तुमच्या आयुष्यात असे काय घडले आहे ?"
वत्सलाबाई हळूवार आवाजात म्हणाल्या.


" सांगतो , माझा आणि नयनचा प्रेम विवाह . दहा वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले . नयन तेव्हा शास्त्रीय संगीताचे वर्ग घेत असे . माझे आई बाबा आणि तिचे छान जमायचे . ती खूप भरभरून जगत होती . आम्ही एकमेकांचा सहवास आणि प्रेम असे सुखी आयुष्य जगत होतो .

त्यावर नयनने एक सुंदर गाणे रचले होते .
अंगणी सुखाचा पारिजात फुलला . असे सगळे छान चालले होते . आम्ही खूप सुखी होतो . बघता बघता वर्ष होत आले. आमचे छान चालू होते . त्यादिवशी संक्रांत होती . शेजारच्या काकू आमंत्रण करायला आल्या .

" काय मग नयन गोड बातमी कधी ? " त्या सहज हसत म्हणाल्या .

" काकू,अजून लहान आहेत पोरं आता कुठे वर्ष झाले लग्नाला ." आईने विषय बदलला .

परंतु तो प्रश्न नयनच्या मनात घोळत होताच . आम्ही कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते . त्यामुळे प्रेगनन्सी का नाही ? हा विचारांचा भुंगा नयनचे मन पोखरत होता . तिच्या समाधानासाठी सगळ्या चाचण्या केल्या . सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. हळुहळू दिवस पुढे सरकत होते . तसे लोकांचे प्रश्न उत्सुकता वरून टोमणे ह्या प्रकारात बदलत होते .


एक दिवस नयन शिकवणी संपवून निघाली तितक्यात तिची एक विद्यार्थिनी जवळ आली .

" बाई, देवांश आजारी आहे . त्याची आई म्हणत होती माझ्या गोऱ्या गोबऱ्या मुलाला नजर लागली . नजर लागणे म्हणजे काय ?"

"दिया,तुला नाही समजणार आता . मोठी झाल्यावर कळेल . " नयन झालेला प्रकार विसरून गेली .


परंतु त्यानंतर हळूहळू शिकवणी वर्गाला मुले कमी यायला लागली . नक्कीच काहीतरी घडत असल्याचे जाणवत होते . एक दिवस आम्ही दोघे खरेदीला गेलो होतो . तिथे नयनची विद्यार्थिनी भेटली .

" प्रिया अग क्लास का बंद केला ? तुझा आवाज किती छान आहे ."
नयन तिला विचारत होती .
आसपास कोणी नाही असे बघून प्रिया म्हणाली," बाई,तुम्ही चेटकीण आहात . तुमची नजर लागते लहान मुलांना . असे मम्मा म्हणाली ."
तितक्यात तिची आई मागून आली.. पोरीच्या पाठीत धपाटा घातला .

" कार्टे,काहीही काय बोलते ? आम्ही आता दुसरीकडे राहायला गेलो ."
त्या बाईने सावरायचा प्रयत्न केला . नयन खरेदी न करता तशीच घरी निघून आली .



त्यानंतर नयनने बाळ होणे हा एकच ध्यास घेतला . जसजसे दिवस पुढे जाऊ लागले ती डीप्रेस राहू लागली . गाणे,बाहेर जाणे सगळे तिने सोडून दिले . आजूबाजूच्या बायका आपली मुले आमच्या घरी पाठवत नसत . आजच्या आधुनिक युगात माणसे अशी वागतात ? माझा विश्वास बसत नव्हता .

मग त्या वातावरणातून दूर जावे म्हणून मी गेल्या महिन्यात इथे बदली करून घेतली ."
अमेय थांबला .

" मिस्टर अमेय पेशंट शुद्धीत आला आहे . तुम्ही भेटू शकता ." नर्स बाहेर येऊन म्हणाली .

अमेय आत गेला . परंतु वत्सलाबाई तिथेच उभ्या होत्या . मनाशी काहीतरी ठरवत .


नयन यातून बाहेर पडेल का ?
वत्सलाबाई तिला मदत करतील ?
वाचा पुढील भागात .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा


🎭 Series Post

View all