Login

आणि चूक उमगली भाग दोन

मला तुझ्या घरात नाही राहायचं
मागील भागात आपण पाहिलं कि, शोभाताई अमोलला घर सोडून जायची धमकी देतात आता पाहूया पुढे,


इकडे अस्मिता देखील विचारात हरवली होती, शोभाताईना तिचं कोणतंच काम आवडत नव्हतं. चपाती बनवली, तर त्यांना भाकरी हवी असायची, भाकरी बनवली तर भात हवा असायचा. बरं त्यांना विचारून काही कराव तर कर बाई तुला जमेल ते कर असं म्हणायच्या आणि बनवल्यावर तिला परत त्यांना हवं ते बनवायला लावायच्या.,

आजही अगदी शुल्लक कारणावरून त्यांनी वाद घातला, याआधी अमोल कधीच मध्ये पडला नव्हता.  अस्मिताला ताप आला होता, पण झोपून राहिली तर उगाच त्यांची चिडचिड होईल म्हणून तिने नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या. पण नेमक्या त्या त्यांना कडक झाल्या.


"अस्मिता सगळी कामे तू करायची म्हणून करतेस, किती वेळा सांगितलंय तुला पोळ्या लाटताना कडा नीट वळवायच्या. गोल पण येत नाहीत, नकाशे नुसते... किती कडक झाल्यात."

अस्मिता शांतपणे म्हणाली,

"ठीक आहे आई, पुढच्या वेळी लक्ष ठेवीन."

"तू नेहमी असच म्हणतेस, आणि पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी.. आता घराच्या कामांची सवय व्हायला हवी होती पाच वर्षं कमी पडली का तुला?"

अमोलच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने बोलायचा प्रयत्न केला, पण अस्मिताने डोळ्यांनीच त्याला थांबवलं.

शोभा ताई पुढे म्हणाल्या,

"त्या मानसी कडे बघ, एवढी शिकलेली आहे पण सगळं येत तिला. पण तुझं मात्र काही सुधारणा करायची तयारी नाही. आता जा जरा दोन भाकरी टाक.. ह्या कडक चपात्या काही खायला होणार नाही."



अमोल अजूनही आईच्या तोंडून निघणाऱ्या एक एक शब्द आश्चर्याने ऐकत होता. त्याला कळेना, की आजारी असलेल्या अस्मिताला जी सकाळपासून तापात असूनही त्यांच्या सेवेत होती एवढं बोलणं खरंच आवश्यक होतं का? आणि त्याहून महत्वाचे आता परत भाकरी का बनवायच्या????

अस्मिता मात्र शांत होती. गप्पपणे ती भाकरी टाकण्यासाठी उठली तेव्हा थोडंसं डोकं गरगरलं तिचं आणि पाय लटपटले, पण तिने स्वतःला सावरलं. हे शोभा ताईंना कळलंच नाही किंवा कदाचित, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अजून जोरात बोलल्या

"अस्मिता, आता उद्यापासून तूप घालून पोळ्या कर. मला कोरड्या पोळ्या नको आणि ते स्वयंपाकघरात तांदूळ सांडलेत… किती घाण दिसतंय... ते आधी साफ कर...."

ती काहीच न बोलता हळूच साफ करायला वळली.

अमोलला राहवलं नाही. तो उठून आला.

"आई, अस्मिता आजारी आहे. तापात काम करतेय ती. उलट तू तिला थोडं विश्रांती घ्यायला सांगायला हवं, पण तुझ्या तर एवढ्या तक्रारी आहेत? आणि कुठे चपाती कडक आहेत मीपण खातो आहे ना."

शोभाताईने त्याच्याकडे बघितलं त्यांना आश्चर्य वाटलं, ह्याच्याआधी तो कधीच त्यांना असं बोलला नव्हता.


"बाई बाई काय दिवस आले माझ्यावर, मीच वाईट? मीच चुकीची? झाला हा बायकोचा बैल... बायकोच त्रास दिसतो... आईच दुखणं नाही दिसत... देवा हाच दिवस दाखवायला मला जिवंत ठेवलंस का???"

शोभा ताईने पदर डोळ्यांना लावला. त्यांना वाटलं होतं, अमोल कायम त्यांच्या बाजूनेच असेल. पण आज? चक्क त्याने अस्मिताची बाजू घेतली होती.


"अग आई, तू कोणत्या गोष्टीवरून कुठे जातेस..., माझं एवढंच म्हणणे आहे एक दिवस तिला आराम करू दे बस."


अमोल काकूळतीला येऊन बोलला.


"हो.... हो समजतंय मला.....मीच जड झाले तुम्हाला... मला नाहीच राहायचं इथे..."


असं म्हणून त्यांनी त्यांच्या रूम चा दरवाजा लावून घेतला.

हे सगळं आठवून अमोल आणि अस्मिता दोघे ही स्तब्ध झाले होते...

दोन दिवस असेच धुसपुसीचे गेले. शोभा ताईंमुळे अस्मिताला अजिबात आराम भेटत नव्हता. अमोल च्या मागे देखील त्यांनी तगादा लावला होता, मला इथे राहायचं नाही तिकीट काढून दे म्हणून.......त्याने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या काही केल्या ऐकत नव्हत्या.


शेवटी वैताकून अमोलने एक निर्णय घेतला.